Wednesday, December 30, 2009

सुकावे लागले

नव्यासाठी नवे काही मला घडवायचे होते
जुन्या पर्वातले संदर्भही बदलायचे होते

तुझ्यासाठीच बहराच्या ऋतूंना रोखले होते,
तुला आनंदयात्रेचे निमंत्रण द्यायचे होते

किती सांभाळल्या होत्या नव्या आशा, नवी स्वप्ने,
मनापासून आयुष्या तुला सजवायचे होते

जिथे माझे कुणी होते, तिथे मन गुंतले नाही
(कधीकाळी मला माझ्यात गुंतुन जायचे होते!)

ऋणातुन मुक्त झाले मी, तरी कळले कधी नाही,
कुणाचे कर्ज होते, जे मला चुकवायचे होते?

जगावेसे जरासे वाटता मरणा तुझी घाई,
सुकावे लागले; जेव्हा मला उमलायचे होते!

Wednesday, December 23, 2009

ओल्या हळदीची सांज




माझ्या सुरांत गुंफून तुझी लडिवाळ  गीते
ओल्या हळदीची सांज रोज अंगणात येते ||

क्षण मोहरून जाती तुला साद मी देताना
मन रेंगाळते मागे तुझ्या वाटेने जाताना
हात धरून मला ती तुझ्या घराकडे नेते ||

आसमंत गंधाळतो जाईजुईच्या फुलांनी
उंबरठा ओलांडते  कुंकवाच्या पावलांनी
तुळशीच्या वृंदावनी नंदादीप उजळते ||

वा-यावर घुमतात मंद सुरांच्या लकेरी
हलकेच डोकावतो चंद्र कोवळा  रुपेरी
मावळतीच्या हातात हात चांदण्याचा देते ||

Thursday, December 17, 2009

रिती पोकळी

रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?

प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची

कुठे कालच्या  उन्मादाचा कैफ उडाला?
कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?

Saturday, December 5, 2009

काजवा

कसा कातरवेळेला घुमे मनाचा पारवा
हवे आभाळ मुठीत, चंद्र ओंजळीत हवा

किलबिलणारी सांज, ओढ मनी कोटराची,
निळ्या नभाचे गोंदण, तसा पाखरांचा थवा

वृंदावनात तुळस, मंजि-यांची दाट नक्षी
प्रकाशाची फुले झाली, उजळता सांजदिवा

वेल जाईची सजली चांदण्यांच्या बहराने,
मस्त गंधाच्या धुंदीत निशिगंधाचा ताटवा

देव्हा-यातल्या ज्योतीने घरदार प्रकाशले,
मन माझे उजळतो तुझ्या भासाचा काजवा

Tuesday, December 1, 2009

कविते तुज शोधित आले

मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी
हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी
त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले
कविते, तुज शोधित आले

इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे,
झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे
ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले
कविते, तुज शोधित आले

मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची,
कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची,
मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले
कविते, तुज शोधित आले

तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची,
तू भावुक  मीरा दासी हरिचरणाची,
तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले,
कविते, तुज शोधित आले

तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले

Friday, November 27, 2009

ते जीवच वेडे होते

ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे
झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे


त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी,
कैदेतुन निसटुन जाती अक्षम्य गुन्हे करणारे


आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे,
म्हणती गजराज स्वत:ला मुंगीला घाबरणारे


वादंग जरी वरवरचे, आतून सारख्या खोडी,
ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे


त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या,
अन पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!"

कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया,
निश्चिंत, सुखी झाले ते; मरतील, मरो मरणारे!

ठेव

काळोखाच्या गर्तेत मी भोवंडत होते जेव्हा,
खुले होत गेले तेव्हा अंतर्मनाचे झरोके

दृष्टीहीनतेचे होते काही मोजकेच क्षण,
अनुभव विलक्षण, अंत:चक्षु उघडले

मनावेगळ्या मनात शांत, कृतज्ञसे भाव,
खोल अंधाराचा ठाव घेता वृत्ती प्रकाशल्या


काळोखाशी माझे नाते होते निमिषभराचे
तुझ्या प्रकाशघराचे दार खुले जन्मासाठी

हळूहळू फाके तेज आणि लोपला अंधार,
जसा स्वयंभू गंधार मूर्तरूप दृष्टीपुढे !

तुझ्या दिव्य देणगीचे कळो आले मोठेपण,
देवा, माझे खुजेपण फुका देई दोष तुला

हळुवार, अलगद जपल्यास नेत्रज्योती,
तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यात

माझ्यापाशी तुझी ठेव, तिची काळजी वाहीन,
नेत्ररूपाने राहीन माझ्या माघारी इथेच!

Wednesday, November 18, 2009

बळ

किती, कसे उपकार तुझे मानू मी अनंता?
सृजनाचा कल्पवृक्ष मला दिला भगवंता!

असो भले की वाईट, इथे जे काहीही होते,
तुझ्या इच्छेने, आज्ञेने, तुझ्या मर्जीने ते होते

माझ्या चुका, तुझी क्षमा; माझी हाव, तुझे देणे,
तुझी आभाळसाउली माझ्यासाठी भाग्यलेणे


तुझ्या अगाध लीलांना नाही आदि, नाही अंत
तूच सखा, पाठीराखा, मला कशाची रे खंत?

नाही माघार घेणार, येवो वादळे कितीही,
संकटांचे भय नाही, झुंजण्याचे बळ देई!

Saturday, November 14, 2009

नकोसे वाटते

पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते
कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते


देत गेले दैव, मीही घेतले जे लाभले,
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?


सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते !"

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गा-हाणे नकोसे वाटते

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी?
संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

Thursday, November 12, 2009

स्वप्नात


स्वप्नात स्वप्नाचे स्वप्नाशी खेळणे
तुझ्या स्वप्नातच माझे घोटाळणे

भाळी कुंकवाचा चंद्र रेखताना,
माझ्यातले तुझे बिंब पाहताना
माझ्या रूपावर माझेच भाळणे !

एकांतात आठवणी जपताना,
लाजून डोळ्यांत तुझ्या लपताना,
दीपशिखेपरी माझे तेजाळणे

तुझ्या सावलीचा हात धरताना,
रानीवनी मनमुक्त फिरताना,
सांज सरताना मागे रेंगाळणे

लटके रुसून तुला छेडताना,
तुझा श्वास श्वास मला वेढताना,
तुझ्या दिठीनेच माझे गंधाळणे !

खुल्या पापण्यांनी स्वप्न शोधताना,
सत्याशी स्वप्नाचा मेळ साधताना,
उतावीळ मला तुझे सांभाळणे !

Friday, November 6, 2009

कोडी

प्रत्येक वादळाला केली बहाल होडी
तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी


साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला
आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला
पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी

एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"

मौनात राहण्याने नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
माया अजून उरली का काळजात थोडी?

या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते?
जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते?
मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!

Thursday, November 5, 2009

करार

माझे कधी तुझ्याशी काही करार होते
ते मोड जीवना, ते फसवे, चुकार होते!

श्वासांसवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते!

वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते

रात्री तुझ्या स्मृतींनी स्वप्ने लुटून नेली,
गाफील पापण्यांचे उघडेच दार होते!

विरल्या कशा दिशा? मी जाऊ कुठे कळेना
काळोख पांगताना चकवे हजार होते!

हातून सावलीचा निसटून हात गेला,
आयुष्य मी उन्हाचे शाकारणार होते!

Sunday, November 1, 2009

शिक्षा

शिक्षा नवी तरीही आरोप जुना आहे
काही न बोलणे हा, इतकाच गुन्हा आहे

आम्ही असे अनोख्या मस्तीत झिंगलेले,
गेले घडून त्याचे सुख-दु:ख कुणा आहे?

घायाळ जरी झाले झेलून शर विषारी,
हे पाखरू भरारी घेणार पुन्हा आहे

गाईल वसंताची गाणी पुन्हा नव्याने,
हा कंठ कोकिळेचा, जो आज सुना आहे

ही सिद्धता कशाची? हे सोहळे कशाला?
आत्मा नव्या जगाचा, हा देह जुना आहे!

"उन्मत्त नको होऊ", त्या वादळास सांगा,
"नौकेकडे किनारा येणार पुन्हा आहे!"

Thursday, October 29, 2009

वेडी आशा


स्वप्नातल्या गावाची वाट शोधत
भिरभिरणारी वेडी आशा
हिरव्या अवखळ पाउलवाटा,
वळणावरचा देखणा पळस,
इंद्रधनू पंखांची फडफड
मावळत्या सूर्याचा लामणदिवा
चुकार ढगाला सोन्याची झालर,
डौलदार राजहंस चंदेरी तळ्यात
आणि -----------
आणि अचानक आलेली वावटळ
धुळीचं वादळ, पिसाट वारा
बेभान पाऊस भरकटलेला
उदास धुक्याचे गहिरे पडदे,
कोंदटलेल्या दाही दिशा
उरी दाटून आलेले श्वास,
आसवांनी भरलेले काजळकाठ
-------------------
पायांखालची वाट कुठे
हरवून गेली, कळलंच नाही !
भिरभिरणारी वेडी आशा
अजून तिथेच, त्याच वळणावर
स्वप्नातल्या गावाची वाट शोधतेय!

Tuesday, October 27, 2009

मनाला

धरू कसे बेबंद मनाला?
नकोच होते पंख मनाला!

इथे-तिथे फिरते, भरकटते
कसा नसे निर्बंध मनाला?


दिले तुझ्या प्राजक्तफुलांनी
नव्या ऋतूचे रंग मनाला


सळाळणा-या रात्रनागिणी,
अन् स्मरणांचे दंश मनाला


तिथे तुझी लाटांवर होडी,
इथे छळे आतंक मनाला


कसे, कधी तू सांग वाचले
खळाळत्या स्वच्छंद मनाला?


अजून छळती कधीकाळच्या
जुन्या चुकांचे डंख मनाला


खुणावती वाटा परतीच्या,
अता करू नि:संग मनाला!

Sunday, October 25, 2009

अज्ञात

अज्ञाताच्या प्रवासातल्या धूसर धूसर वाटेवर
अकल्पिताच्या गूढ़ प्रदेशी मला खुणविते माझे घर


उन्हात भिजला श्रावण हसतो, गहि-या डोहावर झरतो,
सारंगाच्या घेत लकेरी, तनमन भिजवी हलकी सर

निळाशार हा शांत जलाशय, इंद्रधनूचे रंग नभी,
हलके हलके नाव डोलते चमचमणा-या लाटेवर

गहन, अनाकलनीय दिशांच्या आवर्तातुन फिरताना
धुक्यात हरवुन जाते मीही भिरभिरणा-या वा-यावर

ओढ अनावर कुठे नेतसे अंतराळ भेदून मला?
अखंड का हे झुरणे अन फिरणे स्वप्नांच्या वाटेवर?

Thursday, October 22, 2009

बहुधा

त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे
त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे

शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे,
भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे


भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !

त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे


मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे


येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !


कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले,
त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे !


पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

Thursday, October 8, 2009

नेणार काय मी?

माझे माझे किती म्हणावे? जाताना नेणार काय मी?
काहीही ना जगात माझे, कोणाला देणार काय मी?


देण्यासाठी तुझे हात अन् मी घेण्यासाठीच जन्मले,
माझ्यासाठी तुला मागते, तुझ्याविना घेणार काय मी?


जाण्याआधी चुकती केली जन्मभराची सारी देणी,
काही वचने, शपथा उरल्या, पुन्हा इथे येणार काय मी?


देता-घेता जीवन सरले, दिले-घेतले इथेच विरले
मुठी झाकल्या, रित्या ओंजळी, दिले काय? घेणार काय मी?


जाता जाता तुझ्या अंगणी शब्दांचा प्राजक्त लावते,
तीच संपदा माझ्या हाती, तुला दुजे देणार काय मी?

Tuesday, October 6, 2009

खुशाली

एकेक स्वप्न मातीतुन उगवत जाते
मी आठवणींचे वावर तुडवत जाते

तू समोर येता गीत नवे रुणझुणते,
शब्दांत तुझ्या स्पर्शांना रुजवत जाते

टाके कधि तुटती, कुठे निसटतो धागा,
नात्यांची विरली वाकळ उसवत जाते

काही न बोलता गुन्हेगार ठरलेली
मी, मान तुकवते, मलाच फसवत जाते

पोटिची भूक चंद्रात भाकरी बघते,
व्याकुळ मन त्यातुन कविता फुलवत जाते

प्रतिबिंबाआडुन काळ खुणावत जातो,
की पिसाट नियती हासुन रडवत जाते?

कधितरी तुला लिहिलेले पत्र बिचारे,
माझीच खुशाली मलाच कळवत जाते

Sunday, October 4, 2009

जळाविण मीन

जिवावीण जीवनाचा अर्थ किती अवघड
जळावीण मीन तशी जीवघेणी तडफड


जीव होई कासावीस, कसा सोसावा दुरावा?
तृषा वाढते मनाची, वाटे आषाढ झरावा
अंतर्घट तृप्त व्हावे, अशी कोसळावी झड


वाटे सर्वस्व त्यागून रूप अरुपाचे घ्यावे
नदी जशी सागरात, तसे एकरूप व्हावे
नको क्षणाचे अंतर, संग रहावा अखंड

असे आयुष्य सरेल खुळ्या ध्यासात, भासात
श्वास आत्म्याचा विरेल परमात्म्याच्या श्वासात
जगावेगळी ही भक्ती, जगावेगळे हे वेड

Saturday, October 3, 2009

भैरवी

एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही
परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही


विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी,
कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही


तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले,
वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही


संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले,
रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही


पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना,
भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही

Tuesday, September 29, 2009

तिजोरी

तू सांभाळ तिजोरी मिटली
तुझी खरी दौलत रे लुटली


तुझ्या घरीही गोकुळ होते
तुझ्याचसाठी व्याकुळ होते
तुला न त्याची ओळख पटली


पिले पाखरे उडून गेली
नवी पालवी झडून गेली
अखेरची फांदीही तुटली


रिता माळ अन एकाकी तू
शून्याचीच वजाबाकी तू
आस तुझी ना अजून सुटली

Friday, September 25, 2009

आधाराचा हात

दोन शब्द सांत्वनाचे, एक आधाराचा हात
हलका मायेचा स्पर्श हवा होता वादळात


झाले काही भलतेच, सारे सोबती पांगले,
फुंकरीने कोसळावे जसे पत्त्यांचे बंगले
जसा वणवा पेटावा उभ्या, भरल्या घरात

संकटांचे काळे ढग भोवती, जरी अदृश्य,
उसन्या आनंदावर कसे तरावे आयुष्य?
घर फिरता घराचे वासे सुद्धा फिरतात


रोज माझ्यासाठी एक नवं दिव्य घडणार
रोज मरे त्याला कोण किती काळ रडणार ?
सावलीही देत नाही साथ कधी अंधारात!

तसा माझा कुणावर आहे काय अधिकार?
जगू देऊन जगाने केले मोठे उपकार
आता मरणाने घ्यावा हाती हलकेच हात

Wednesday, September 23, 2009

रान

ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास
विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास
जळला मोहर, झडली पालवी,
दिसे रिता, पर्णहीन तो भकास

विषवल्ली तरारली, फोफावली,
वाढत चालली; वेढत चालली
घनदाट गर्द हिरव्या रानाला,
एकेका वृक्षाची गिळत सावली

रान कुठे आता? उध्वस्त स्मशान
घोंघावतो वारा एकटा बेभान
उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे
फांदीफांदीवर भुतांचे थैमान

क्षणात अवघे चित्र पालटेल
वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल
मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा,
पुन्हा रानात या गारवा दाटेल


मन रान, विषवल्ली अहंभाव
वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव
जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या,
आणि जिंकून घे आयुष्याचा डाव

Monday, September 21, 2009

भोंडला

सयेबाई संसार मी भुलाबाईचा मांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


रांगोळीनं पाटावर हत्ती रेखला देखणा
सेवा स्वीकाराया आला दारी गणेश पाहुणा
खेळ ऐलमा पैलमा गणरायानं मांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

कमळाच्या मागे राणी, हन्मंताची निळी घोडी,
धाडू माहेरी करंज्या, त्यांची आगळीच गोडी
मन भरून आनंद गाण्यांतून ओसंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


कसं माहेर साजिरं, कसं सासर ते द्वाड
माहेरानं दिलं प्रेम, केली माया जिवापाड
सासरच्या वाटे काटे, श्वास उरात कोंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


बालपणीचा भोंडला हरपला थोरपणी
कुठं शोधू ते अंगण ? कुठं वेचू आठवणी?
विखुरल्या खिरापती, डबा कधीचा सांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला


सोळा वर्षं भोंडल्याची गेली कधीची सरून
आता कोरडेच हस्त, गाणी गेले विसरून
फेर संपता संपेना; देह, प्राण भोवंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

Thursday, September 17, 2009

पुन्हा केव्हातरी

संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी
काही तराणेही नवे, छेड़ू पुन्हा केव्हातरी

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या
सांगायच्या गोष्टी आशा, सांगू पुन्हा केव्हातरी!

झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे,
तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी

दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे,
आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी!

सांगून नाही भेटलो तेव्हा, कधी भेटूनही
हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी"!

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

Monday, September 14, 2009

मंजूर नाही

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही!


हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही?


तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही


मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही


लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही!


अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
"तुझी भेट आताच मंजूर नाही!"

Thursday, September 10, 2009

निमंत्रण

हिरकणीला स्वर्णकोंदण
चैत्रबहराचे निमंत्रण


या मनी डोकावला तो
एक क्षणभर थांबला तो
आणि हसुनी बोलला तो
"घे तुला आभाळ आंदण!"


उमलल्या चैतन्यवेली
अमृताने बाग न्हाली
बहरली वेडी अबोली
अंगणी प्राजक्तशिंपण


लाभल्या दाही दिशाही
घ्यायचे उरले न काही
तो तरीही देत राही
स्फूर्तिचे सौभाग्यगोंदण


भाव मनिचे व्यक्त झाले
मी ऋणातुन मुक्त झाले
धन्य झाले, तृप्त झाले
लेवुनी हे स्रृजनकंकण

Wednesday, September 9, 2009

अंतरा

शह प्रतिशह माझ्याच मनाचे, वजीर मी अन् मीच मोहरा
अविरत दिसतो जुन्या दर्पणी मलाच माझा नवा चेहरा

खोल विवर मन, गूढ़ विलक्षण, अथांग गहिरे, ठाव न लागे
शांत नदीच्या पात्रामधला गहन, अनाकलनीय भोवरा

कुठे अता त्या नात्यामधला ओलावा जपणा-या भिंती ?
अदृष्टाची काळी छाया थांबविणारा कुठे उंबरा ?

खुणा कालच्या विध्वंसाच्या जपुन आज का शाप भोगणे ?
आज जगा मस्तीत, उद्याचे कोसळणारे स्वप्न सावरा

किती रंग चढवले, उतरले, जशा भूमिका बदलत गेल्या,
रोज बदलले किती मुखवटे, कुणास ठाउक कोणता खरा ?

मनात नसता कसे जुळावे लय तालाशी सुरेल नाते ?
स्थाईला ना स्पर्श सुरांचा, सांग कसा गाणार अंतरा ?

Thursday, September 3, 2009

समिधा

उभ्या जन्मात मी बहुधा
तुझ्या यज्ञातली समिधा

कधी मी सावली झाले
तुला ग्रीष्मात जपणारी
तुझ्या बहरात मी झाले
कळी गंधात रमणारी
बहरले धुंद मी कितीदा
तुझ्या यज्ञातली समिधा

कधी अभिसारिका झाले,
प्रिया झाले, सखी झाले
रमा नारायणाची,
शंकराची पार्वती झाले
कधी कृष्णा तुझी राधा
तुझ्या यज्ञातली समिधा


तुला पाहून माझ्या अंतरी
प्राजक्त दरवळतो
कुठेही जा, तुझ्यासाठीच
माझा जीव घुटमळतो
प्रिया, तू सूर्य मी वसुधा
तुझ्या यज्ञातली समिधा

Wednesday, September 2, 2009

आयुष्या

सुरांनी मांडली दारी तुझ्या आरास आयुष्या
अरे, आता तरी सोडून चिंता हास आयुष्या !


कधी काट्यापरी सलणे, कधी गंधाळणे, फ़ुलणे
दिले तू वेदनेला चांदण्यांचे श्वास आयुष्या !


तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले,
जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या


जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी
तसे माझे तरी उरले कितीसे श्वास आयुष्या ?


कधी जन्मांतरीचे आपले नाते खरे होते ?
कधी होतास तू माझ्याचसाठी ख़ास आयुष्या ?


दिवे मंदावता येशील माझ्या सोबतीसाठी
मला तू एवढा देशील का विश्वास आयुष्या ?

Sunday, August 30, 2009

करून झाले

त्याने जे जे सांगितले ते करून झाले
वा-याशी लावून शर्यती फिरून झाले

ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते,
झाले तितके विरोध सारे घरून झाले

माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ?
त्याचे माझे वाद एवढ्यावरून झाले

काटयांतहि फुलण्याचा त्याने वसा दिलेला,
झाले बहरुन पुन्हा, पुन्हा मोहरून झाले

काहीही दिसले नाही, जे नकोच होते,
आठवणींचे कपाटही आवरून झाले

आता सावर केवळ थकल्या श्रांत जिवाला,
कोसळणारे डोलारे सावरून झाले

Tuesday, August 25, 2009

कर्ज

उपकाराचे तुझ्या जीवन कर्ज जुने सांभाळत आले
चुकवाया मी तुझी तारणे, किती बंधने पाळत आले

किती टाळले तरिही त्यांना माझ्यावाचुन थारा नव्हता
तुझे भास सावलीसारखे पायांशी घोटाळत आले

नभछाया वा मळभकाजळी निष्प्रभ का करते सूर्याला ?
ग्रहण क्षणाचे सुटता त्याचे किरण पुन्हा तेजाळत आले

भलते होते वेड जिवाला राखेतुन अवतार घ्यायचे
अतिरेकी हट्टापायी त्या सर्वस्वाला जाळत आले

कुणी द्यायची साथ कुणाची, कधीच त्यांचे ठरले होते,
तुझी वाट शोधली सुखाने, मला दु:ख धुंडाळत आले

Wednesday, August 19, 2009

राधा

त्या सावळ्या सख्याच्या रंगात रंगले मी
त्या साजि-या सुखाच्या स्वप्नात दंगले मी


ते स्वप्न सत्य होते, की सत्य स्वप्न होते?
जाणीव-नेणिवेच्या गुंत्यात गुंतले मी


त्या रम्य संभ्रमाची जडली अनाम बाधा,
वृंदावनात राधा होऊन गुंगले मी


त्याच्या करात मुरली, मुरलीत सूर झाले,
त्या अधररससुधेला प्राशून झिंगले मी

हे गोड गुपित माझे सांगू कसे कुणाला?
त्या चित्तचोरट्याचे मन आज जिंकले मी

तो अंतरात वसतो, तो स्पंदनात घुमतो,
त्या सगुण निर्गुणाशी आयुष्य बांधले मी

तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा,
अद्वैत हे युगांचे शब्दांत मांडले मी

न्यास

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता

रंगलेल्या मैफली उधळून जाणे,
हा कुणाचा सांग अट्टाहास होता ?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता!

पुन्हा

वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा ?
वाहती वारे विनाशाचे पुन्हा

यायचे नव्हते तुला येथे कधी
का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा ?

वादळाहातीच ज्याचे होडके,
कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा ?

कोरडे रडणे, उमाळे बेगडी,
दु:ख का फसवे उसाशाचे पुन्हा ?

सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा ?

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा ?

Friday, July 31, 2009

निष्प्राण

निष्पर्ण मी, वैराण मी, निर्जीव मी, निष्प्राण मी
माझे मला ना उमगले अभिशाप की वरदान मी


मी सावल्यांची सावली, अस्तित्व मज नाही दुजे
आवेग माझा पोरका, आभाळही माझे खुजे
माझीच ओंजळ कोरडी, देऊ कशाचे दान मी ?


माझ्याचसाठी उघडली दारे सुखाची नियतीने
माझ्याच पायी घातली बेडी भयाची नियतीने
त्या शृंखलांनी बांधले, पेलू कसे आव्हान मी ?

का वंचना आलोचनांनी विश्व माझे घेरले ?
का रिक्त एकाकीपणाचे बीज दारी पेरले ?
शोधू कुठे मी आसरा ? मागू कुणा वरदान मी ?

प्रारब्ध

मालवत्या ज्योतीला मी पुन्हा उजळले नाही
कधी मंदावले दीप मलाही कळले नाही

ता-यांनी फुलांना दिले, फुलांतून ओघळले
पापण्यांनी साठवले, मोती उधळले नाही

किती वैशाख पेटले, किती सोशिली काहिली
काळजात गोठलेले दु:ख वितळले नाही

ओठांवर नाही आले हुंकार मुक्या कळीचे
मनी दाटलेले भाव सुरांना कळले नाही

दैवदत्त दान भोगण्यात सारा जन्म गेला,
भाळावर गोंदलेले प्रारब्ध टळले नाही

विठू

पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

संतसंगती सदा घडो
अता कुठे ते दिवस विठू ?

नित्य तुझा सहवास हवा,
तुलाच करते नवस विठू


तुझ्या दयेचे अमृत दे
जळते माझी तुळस विठू


घराकडे जा, नको करू
रखुमाईचा विरस विठू

Tuesday, July 21, 2009

वाट स्वप्नांची

सांग का होते असे रे?
वाट स्वप्नांची दिसे रे

थेंब झेलुनि चिंब ओले
पाखरू धुंदीत डोले
कूजनी गंधार बोले
गीत ते लावी पिसे रे

सांडते आभाळ खाली
गंधवारा साद घाली
की तुझी चाहूल आली ?
बावरे मन का फसे रे ?


पावसाचा धीट दंगा
दामिनी खेळीत पिंगा
छेडिते मनिच्या अनंगा
मी मला रोखू कसे रे ?

नवे ऋतू

जेव्हा नव्या ऋतूंनी बोलावले मला
माझ्याच सावल्यांनी वेडावले मला

जेव्हा दिल्या फुलांनी जखमा अजाणता,
हलकेच वेदनांनी जोजावले मला

घरट्यात ऊब, दाणा चोचीत घातला
फुटताच पंख त्यांनी धुडकावले मला

मी का, कसे, कधी अन् कोठून जायचे
ते मार्ग प्राक्तनाने समजावले मला

आताच वादळांशीं झुंजून थांबले
वा-यावरी पुन्हा का भिरकावले मला ?

कित्येकदा सुखाच्या मागून धावले
प्रत्येकदा सुखाने हुलकावले मला

मी संभ्रमात अजुनी शोधीत उत्तरे
आयुष्य हे कसे अन् का भावले मला?

Wednesday, July 15, 2009

भूमिका

पाठ वा-याने फिरविली ती दिशा माझीच होती
मूक, हळवी दीन, शापित नायिका माझीच होती

दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी,
राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती

एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही,
चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती

भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे ?
वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती

संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या
जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती

काळजाला विंधणा-या आप्तस्वकियांच्या विषारी
बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती

ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती

राख झाल्या भावना फासून पिंगा घालणा-या
सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती

मला

बांध बंधनात मला
ऐक स्पंदनात मला

जडवुन घे मानसिच्या
रत्नकोंदणात मला

वेढतात सूर तुझे
मालकौंस गात मला

दे दंवात भिजलेली
रिमझिमती रात मला

जग फसवे, हे चकवे
छळती दिनरात मला

प्रीत लपेटून तुझी
ठेव काळजात मला

भिजुन चिंब होऊ दे
रंगपावसात मला

कुंचले नको नुसते,
दे तुझेच हात मला

Sunday, July 5, 2009

अलिप्त

का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही?
परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ?

दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?

पातकी, पतित, पथभ्रष्ट, पापाची मूर्ति जरी मी ,
कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ?

रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे
एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ?

का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

दान

मी दिवस मोजते सरते
पण जगणे मात्र विसरते

तू इतरांसाठी झटसी,
मी माझ्यापुरती उरते

कितिही तू दिले तरीही
ते मला कसे ना पुरते ?

जे मला न मागुन मिळते
तितक्याने मन ना भरते

का हाव ? कशी अतृप्ती ?
मिळुनही सर्व मी झुरते

तू देउन विसरून जाशी,
मी घेउन दान विसरते

कसे झाले

मी तुला फुले दिलेली, त्यांचे काटे कसे झाले ?
माझ्या भाबड्या शब्दांचे शस्त्रसाठे कसे झाले ?

थोडी तुझी, थोडी तुझ्या घराची, थोडी पिलांची,
एका माझ्या अस्तित्वाचे लाख वाटे कसे झाले ?

माझ्या-तुझ्या मुक्कामाचा काल एक मार्ग होता,
चालता चालता त्याचे दोन फाटे कसे झाले ?

केव्हा लुटली वा-याने वेड्या मनाची तिजोरी ?
चोहिकडे गुपितांचे हे बोभाटे कसे झाले ?

जीव ओतून केली मी विदुषकाची भूमिका
आयुष्याचे हसे झाले, कुणा वाटे कसे झाले ?

Sunday, June 28, 2009

पाऊस

असा भन्नाट पाऊस, अशी गर्द हिरवाई
ओल्या मातीच्या गर्भात रुजलेली नवलाई
अशा भिजल्या क्षणांत, गर्द हिरव्या रानात
हाती गुंफुनिया हात कुठे दूरवर जावे
वाट सरली तरीही नवी वाट शोधताना
घन निबीड वनात धुंद पाऊस झेलीत
एकमेकांच्या मनात असे हरवून जावे
इन्द्रधनूच्या पिसांचे सप्तरंग लपेटून
कधी कौतुक पहात धरतीच्या अंकुराचे
हळुवार स्पर्शाने त्या सारे जग विसरावे
जागेपणी आठवून स्वप्नातल्या गुजगोष्टी
प्रीत मनात जागता, देही रोमांच फुलता
थेंब मिसळे मातीत, तसे एकरूप व्हावे

अजूनही

ठाव ना तुझा तुला अजूनही
काय शोधसी मला अजूनही?

जागल्या कळ्या; सुकून चालल्या
गंध मात्र राहिला अजूनही

ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
जाणले न मी मला अजूनही

लांब जात सावल्याहि पांगल्या
तू दिवा न लावला अजूनही

सावळा न राधिका, न गोपिका
एकटा रिता झुला अजूनही

मीच जिंकले तरी हरायचा
डाव का न संपला अजूनही


तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही ?

Wednesday, June 24, 2009

अमृताच्या धारा

झाली शांत, तृप्त धरा,
अशा बरसल्या धारा
सांगे गंधाचा निरोप
तुझ्या अंगणीचा वारा

गर्द सावळे आभाळ
राशी रूप्याच्या सांडते
सौदामिनी उजळते
तुझा गगनगाभारा


झेलताना तनूवर
हिरेमोती आनंदाने
लाख डोळ्यांनी फुलतो
मनमोराचा पिसारा


तुझ्या करुणेचा मेघ
माझ्या दारी झरताना
जागेपणी पापण्यांत
स्वप्न येतसे आकारा


माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा,
तुझ्या अमृताच्या धारा

पूर्वसंचित

काळाच्या मनात काय? कधी कळले ना कुणा
अवचित गवसल्या पूर्वसंचिताच्या खुणा

काही शब्द, काही सूर, नवखीच हुरहूर,
दारी फुलून आलेल्या मोग-याच्या गंधखुणा

काही चुकलेल्या वाटा, ओहोटीच्या मंद लाटा,
जशा ओल्या वाळूवर दिसती पाऊलखुणा

मन घेतसे चाहूल, वाजे कुणाचे पाऊल?
पुनवेच्या दारी येई चंद्र रात्रीचा पाहुणा

ओली हातावर मेंदी, एक आगळीच धुंदी
जन्मजन्मिचा सखा का साद देई पुन्हा पुन्हा?

एक जग

क्षितिजाच्या पलिकडे एक जग तुझे माझे
इंद्रधनू रंगविते जिथे चित्र मीलनाचे


सोनसळी किरणांनी सजलेल्या आभाळाला,
जिथे बांधले तोरण किलबिलत्या पंखांचे

गोधुलीच्या पावलांनी सांज हलकेच येते,
ताल घुंगुरमाळांचा, हंबरणे वासरांचे


जिथे रात्र बहरते बकुळीच्या सुगंधाने,
फांद्यांतुन बरसती कवडसे चांदण्यांचे


सागराची गूढ़ गाज जिथे घुमतसे कानी,
तुझे सूर गाती जिथे गीत माझ्या भावनांचे


थोडे तुझे, थोडे माझे, थोडे ऊन- पावसाचे,
जग आपले दोघांचे, जगावेगळ्या स्वप्नांचे

Saturday, June 20, 2009

तुझ्यासाठी

एक वेडं मन
फुलांनी जखमी होणारं, काट्यांवर झुलणारं
तुला पाहून फुलणारं


एक इवली कळी
हसता हसता फुलणारी, फुलता फुलता सुकणारी
सुकतानाही हसणारी


एक भावुक गाणं
हिरव्या मातीत रुजलेलं, कोवळया दंवात भिजलेलं,
तुझ्या सुरांत सजलेलं

एक हळवा श्रावण
अंतरंगी वसणारा, अविरत बरसणारा
तुझ्याही डोळ्यांत दिसणारा


एक नाजुक कविता
तुझं बिंब असलेली, माझ्या मनी ठसलेली
तुझ्यासाठी सुचलेली


हे सारं तुझ्यासाठी
फुललेला मोरपिसारा, रानभरी गंधवारा
माझ्या मनाचा देव्हारा

सुप्रभात

दंवात चिंब भिजलेली पायाखालची हिरवळ
बकुल, जाई, सोनचाफ्याचा मंद, नाजुक दरवळ

इवल्या पाखरांना झुलवणारा लेकुरवाळा औदुंबर
जरतारी शेला पांघरलेला लोभस गुलमोहर

मोती पोवळे प्राजक्त रांगोळी, कोवळं सोनेरी ऊन
पानांची रुण्झुण, वा-याची गुणगुण वेळूच्या बनामधून

हलके हलके धुक्याची शाल विरते कोवळ्या उन्हात
जुईची कळी फुलता फुलता हळूच हसते मनात

काळोखाचा पडदा सारून तेजाळतं लख्ख आभाळ
रोजच उगवते तरी नवी रम्य प्रसन्न सकाळ

कारण

आयुष्याचा अर्थ नेमका
काय असावा? केवळ दडपण?
की नियतीच्या उंबरठ्यावर
छिन्न जिवाचे आत्मसमर्पण?

मी वाकावे, मीच झुकावे,
मलाच मी घालावे कुंपण
अन् माझे सर्वस्व लुटावे,
जपण्यासाठी तुझे थोरपण

किती जपू मी? किति सांभाळू?
तुझ्या मनाचे दुभंगलेपण
मनात काही, जनात काही,
कृत्रिम अन् फसवे मोठेपण


तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?

Friday, June 19, 2009

स्फूर्ति

तूच ध्यानी, मनी, स्वप्नी, तुला कसे विसरावे?
तुझ्या चिंतनी रमावे, तुझ्या ध्यासात झुरावे

तुझे ध्यान माझी पूजा, तुझी भक्ती माझी शक्ती
तुझ्या दर्शनाने मिळे सा-या दु:खातून मुक्ती

तुझ्या चरणांची धूळ रोज मस्तकी लावावी
माझ्या भावनांची फुले तुझ्या चरणी वहावी

पंचप्राणांची आरती लोचनांच्या निरांजनी
जळे कापूर देहाचा, धूप मनाचा चंदनी

माझ्या श्रद्धेच्या मंदिरी सदोदित तुझी मूर्ती
तूच आयुष्याचे सार, तूच जीवनाची स्फूर्ति

Wednesday, June 17, 2009

आज का

आज का मुरलीधराच्या पावरीची साद नाही?
आज का राधे तुझ्याही पैंजणांचा नाद नाही?

शब्द झाले मूक; जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा,
मौन झाले बोलके, मग सांग हा संवाद नाही?

हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली
आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही

निर्गुणी भजने कुमारांची कधी ना ऐकिली तू
भीमसेनांच्या स्वरांचा घेतला आस्वाद नाही

सोड हे सुकणे, फुलांची पालखी दारात आली
स्वागताला हो पुढे, यासारखा आल्हाद नाही

या तुझ्या असण्यास वा दिसण्यास का जगणे म्हणावे?
खोलली त्याने कवाडे अन् तुझा प्रतिसाद नाही !

आज छेडू या सुरांना, विसरुनी चिंता उद्याच्या
आजचे गाणे खरे, येथे उद्याला दाद नाही

स्वप्न

अवसेस चांदण्याचे का स्वप्न पाहिले मी?
काळोखल्या क्षणांना आयुष्य वाहिले मी

नाही कधीच कळले अपराध काय माझा?
माझ्याच सावल्यांच्या कैदेत राहिले मी

दाही दिशांत आली दाटून वादळे ही
आवर्त यातनांचे किति काळ साहिले मी

हरवून एकटी या गर्दीत भोवतीच्या,
आधार आपल्यांचा शोधीत राहिले मी

अस्तित्वशून्य जगण्याचा शाप भोगताना,
उध्वस्त या जिवाला दिनरात पाहिले मी

आजन्म वेदनांचा हा दैवदत्त ठेवा
जपुनी मनात माझे सर्वस्व वाहिले मी

सांज - राधा

त्या सांजकोवळ्या उन्हात सजल्या वाटा
गुणगुणती गीते तुझी निरागस लाटा


मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे
पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे


माडांच्या छाया झुलती वा-यासंगे
जणु कृष्णसख्याचा रास आगळा रंगे

आसमंत भारित सूर मुरलीचे आले
कालिंदीचे जल थबके, कदंब डोले

तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखाचा
दरवळतो हलका भास मधुर गंधाचा

या चराचराला जडली त्याची बाधा
श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा

Thursday, June 4, 2009

आकांत

प्राण झाला शांत आता
संपला आकांत आता

यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रांत आता

तोडले सारेच धागे,
का पडावी भ्रांत आता?

सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता

सोहळे सोसून फसवे
जीव झाला क्लांत आता

वादळाचे धुमसणे हे
का न होई शांत आता?

जाग

झोपले ब्रह्मांड सारे, चांदण्यांना जाग आली
दाटला अंधार आता, सावल्यांना जाग आली

जागुनी हा जन्म सारा पाहिली मी वाट ज्याची,
भंगले ते स्वप्न वेडे, पापण्यांना जाग आली


सांडले कोणी फुलांचे चांदणे वाटेत माझ्या?
रातराणीच्या सुगंधी पाकळ्यांना जाग आली


गर्द काळोखात झाले रान जागे, या मशाली -----
पेटल्या येथे कुणाच्या? काजव्यांना जाग आली


गुंफलेले हात हाती, वर्षल्या प्राणांत स्वाती
तेज मोत्यांचे झळाळे, शिंपल्यांना जाग आली

साद

अवचित एका वळणावरती साद तुझी कानी आली
मोहरले मी, बावरले मी, झुके पापणी का खाली?

क्षण्भर माझे मला कळेना अशी काय किमया झाली?
लाजबावरी कळी उमलली पूर्वेची लेउन लाली

तुझ्या स्मृतींचा मोर नाचतो पंख फुलवुनी भवताली
मंतरलेले क्षण सांगाती वाट पाहती तरुखाली

क्षितिजावरची रंगपंचमी माळुन सांज पुन्हा आली
अवचित तूही येशील का रे या सुंदर संध्याकाळी?

राधिका

कृष्णसख्याची प्रीत राधिका
सूर कन्हैया, गीत राधिका

श्यामल करि अलगूज होउनी
स्वरपुष्पे उधळीत राधिका
नंदनंदनासंगतीत जणु
रासरंगसंगीत राधिका

श्रावणघन घननीळ बरसतो
कदंबतळि झेलीत राधिका
चंद्रसजण मुरलीधर गगनी
चांदणकण वेचीत राधिका

मुकुंदकंठी वैजयंति, शिरी
मोरमुकुट निरखीत राधिका
देवकीनंदन झुलवित झूला
रोमांचित, पुलकीत राधिका

देह श्याम अन प्राणही श्यामच
जणु अद्वैत, पुनीत राधिका
जन्मजन्मिची सखी, हरीचे
पूर्वजन्मसंचीत राधिका

Wednesday, June 3, 2009

स्नेहबंध

असा आगळा स्नेह जसा की कमलतंतुचा बंध असावा
अक्षय, शाश्वत नात्याला या प्राजक्ताचा गंध असावा

नकळत अलगद गुंतुन जावे, जसा फुलात सुगंध असावा
स्मरणातुनही सुख बरसावे, दर्शनात आनंद असावा

कधी भेटता अंतरातला भाव असा स्वच्छंद असावा,
श्रावणातल्या हिरव्या रानी भरुन जसा मृदगंध असावा


जगावेगळे अमूर्त नाते, जगावेगळा छंद असावा,
अवीट गोडीने भरलेला स्नेहाचा मकरंद असावा

Tuesday, June 2, 2009

अबोली

त्या आगळ्या सुरांनी भारावले कितीदा
चाहूल घेउनी ती मी धावले कितीदा

वाटे कधीतरी तू येशील या दिशेला
या मूक आसवांनी बोलावले कितीदा

तोडून बांध सारे, त्या गूढ़ अंतराळी
हे पाखरू मनाचे झेपावले कितीदा

पाऊल वाजता या वाटेवरी कुणाचे,
भासे तुझीच छाया, आसावले कितीदा

ते बोल आठवूनी स्वप्नात जागले मी
सत्यात त्या स्म्रृतींनी नादावले कितीदा

काही न बोलता ये, क्षण एक मी अबोली,
येताच तू समोरी भांबावले कितीदा

श्रावणातला पाऊस

श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
क्षणात हसणारा, क्षणात रुसणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
खट्याळ, खोडकर, उगाचच छेडणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
दु:खावर हळुवार फुंकर घालणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
अवेळी अडवून चिंब भिजवणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
कणाकणात हिरवी स्वप्ने रुजवणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
अवचित येणारा, अचानक जाणारा

सूर भैरवीचे

मज वेढती अवेळी ते सूर भैरवीचे
करती अगम्य खेळी ते सूर भैरवीचे

भिजुनी तुझ्या स्मृतींनी माझ्या मनात ओली
ती रात्र पावसाळी, ते सूर भैरवीचे

भुलवून या मनाला मज दूर दूर नेती
हलकेच सांजवेळी ते सूर भैरवीचे

माझ्या मनातली मी गीते दिली तरीही
गाती तुझ्याच ओळी ते सूर भैरवीचे

जादूभ-या लकेरींनी भारतात माझे
घरकूल चंद्रमौळी, ते सूर भैरवीचे

घननीळ सावळ्याच्या वेणूतुनी घुमावे
श्रवणात अंतकाळी, ते सूर भैरवीचे

मधुराभक्ति

मज ध्यास दर्शनाचा रे, ना कसलीही आसक्ती
अंतरात माझ्या वसते, मीरेची मधुराभक्ती

मी गीत तुझे गुणगुणते
चैतन्य जणू रुणझुणते
गीतातुन माझ्या करते तव प्रीतीची अभिव्यक्ती

तन राहि जरी संसारी
मन घेते गगनभरारी
एकाच ठाई अनुभवते आसक्ती आणि विरक्ती

काळोख मनाला ग्रासे
हा जन्मही शापच भासे
तुजवाचुन जगण्याचीही उरली ना इच्छाशक्ती

सर्वस्व तुला अर्पावे
आयुष्य इथे संपावे
तुजसाठी पुन्हा उमलाया या जन्मी मिळावी मुक्ती

परब्रह्म

परब्रह्म विटेवरी दोन्ही कर कटेवरी
वाट भक्ताची पाहतो देव पुंडलिकादारी

संत जनाईच्या घरी दळण कांडण करी
ओव्या गातो भक्तासंगे भावाचा भुकेला हरी

देव एकनाथाघरी कावडीने पाणी भरी
सांभाळितो चोखोबाची गुरे सावळा मुरारी

तुक्याचे अभंग तारी कान्होपात्रेला उद्धारी
निवृत्ति, सोपान, मुक्ता ज्ञानियाचा हात धरी

दुमदुमली पंढरी रिंगणात वारकरी
नित्यनेमाने चालते आषाढी कार्तिकी वारी

संत मी ना वारकरी आळविते तुला तरी
आस मुक्तीची घेऊन आले देवा तुझ्या दारी

Monday, June 1, 2009

तुझ्यासवे

अबोल सांज बोलते तुझ्यासवे
उदास रात डोलते तुझ्यासवे

तुझ्याच आसवांत मी भिजून रे
तुझेच दु:ख झेलते तुझ्यासवे

स्वर्ग सात पावलांत लाभला
सदैव वाट चालते तुझ्यासवे

मनात चांदणे फुलून बहरते
फुलांत चंद्र माळते तुझ्यासवे

झिजून चंदनास गंध येतसे
अखंड धूप जाळते तुझ्यासवे

तुझ्या सुरांत शब्द गुंफुनी नवे,
सुरेल गीत छेडते तुझ्यासवे

तुझेच बिंब चंद्रपुनव होउनी
तनामनास वेढते तुझ्यासवे

तुझी आठवण

मनात भरते एक रितेपण
संध्याकाळी तुझी आठवण

तुझी धावती भेट अचानक,
मोहरलेले ते अपुरे क्षण

वरवरचे ते कुशल सांगणे,
उदास तूही, उदास मी पण

गूज मनीचे मनी राहिले,
कसले ते अधुरे संभाषण!

निरोप घेता मळभ दाटले,
धूसरले क्षितिजाचे अंगण

अवचित येणे, नकळत जाणे,
असे, जसे वळवाचे शिंपण

तुझ्याचसाठी कातरवेळी
अजुन बरसतो नयनी श्रावण

हळव्या रात्री चंद्र जागतो
तुझ्या स्मृतीचे होउन दर्पण

रिता गाभारा

बुडत्याला काडीचाही आता सहारा कशाला?
मंदिरात देव नाही, रिता गाभारा कशाला?

कान्हा जाई मथुरेला, झाले गोकुळ पोरके
मन सैरभैर झाले खुळ्या पाखरासारखे
प्राण जाता कुडीचा हा उरे पसारा कशाला?

निराकार, निर्गुण हा जरी अंतरात वसे
तरी सगुण रूपाचे मना लागलेले पिसे
तुझ्याविना नौकेला या हवा किनारा कशाला?


तुझ्या आधारवृक्षाचा हवा उन्हात विसावा
तुझ्या कृपाप्रसादाचा घन सदा बरसावा
व्याकुळल्या जीवाला या बाकी उतारा कशाला?

Sunday, May 31, 2009

डाव

पुरा जो होणार नाही, डाव असा मांडू नको
पापण्यांच्या शिंपीतले मोती कुठे सांडू नको

जिवाभावाचे अनाम नाते कधी तोडू नको
अर्ध्या वाटेवर मला वादळात सोडू नको

आर्त, उदास, हळवे सूर पुन्हा छेडू नको
रानभरी वा-यापरी सांजवेळी वेढू नको

झाले गेले विसर ते, त्याचा माग काढू नको
ओल्या पदरात माझ्या दु:ख आता वाढू नको

जोगवा

नक्षत्रांच्या गावातून कुणी सांगावा धाडला?
जीव पाखरू होऊन माझा आभाळा भिडला

वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला?
मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला

आला मैफलीला रंग, ताल सुराला भेटला,
अंतरंगी आनंदाचा असा उमाळा दाटला

मोतीपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला
हळुवार गूज काही वारा कानात बोलला

झाकोळल्या नजरेला दिसे प्रकाश आतला
माझ्या फाटक्या झोळीत असा जोगवा घातला!

मी

मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
मंद ज्योत ती मीच तेवती
विरघळणा-या चंदनात मी
कधि मीरेची एकतारि मी
कधि राधेच्या मंथनात मी
वससी माझ्या अंतरात तू
अविरत तुझिया चिंतनात मी
कळी पाकळी फुलवित जाते
जणु भ्रमराच्या गुंजनात मी
पारिजातकापरी फुलविले
सौख्य तुझ्या रे अंगणात मी
तुझ्या प्रीतिचा चंद्र जडविला
नक्षत्रांच्या कोंदणात मी
भाग्यदैवता तुलाच जपले
भाळावरच्या गोंदणात मी

Saturday, May 30, 2009

रंग मेंदिचा

रंग मेंदिचा हातावरती अजून खुलतो कधी कधी
शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी

हिरमुसलेली जुई-सायली कधी अचानक मोहरते
निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी

खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी

वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी

कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन् झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी

तृप्त मनाच्या नभी क्षणांतच दाटुन येते मळभ कसे?
अवचित हळवा भास तुझा का अजून छळतो कधी कधी?

आठवणींचे कढ

सगळेच चेहरे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत राहिले
आठवणींचे कढ मनात पुन्हा पुन्हा दाटत राहिले

उदास मन, हळव्या भावना, घुसमटणा-या तीव्र वेदना,
कुणाकुणाला आधार देऊ? आभाळच फाटत राहिले

नाव मिटले, गाव सुटले, अस्तित्वाचे धागे तुटले
ओळखीचे रस्ते तरी वळणावळणावर भेटत राहिले

वसंतातल्या बहरानेच कळी कळी जळून गेली
वैशाख वणवा भडकावा, तसे मन पेटत राहिले

निस्तेज पहाट, भयाण दुपार, उदास संध्याकाळ सरली
गूढ़, गर्द काळोखाचे डोह मनात साठत राहिले

का नात्यांचा रंग विटला? गोफ तुटला, पीळ सुटला
मनामनांना जोडणारे रेशिमधागे तुटत राहिले

किती वाटा बदलल्या, किती मार्ग तुडवून झाले,
इतकी दूर आले, तरी दु:ख मला गाठत राहिले

Wednesday, May 27, 2009

धागे

माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना तुला हे कळले कधीच नव्हते

येता वसंत दारी, फुलले पुन्हा निखारे
ग्रीष्मातही अशी मी जळले कधीच नव्हते

मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
माझ्या विवंचनांनी छळले कधीच नव्हते

दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते

डोहात काळजाच्या मी दडविले उसासे
माझे अबोल अश्रू ढळले कधीच नव्हते

मी कालच्या चुकांची चिंता करू कशाला?
ते भोग प्राक्तनाचे टळले कधीच नव्हते

Tuesday, May 26, 2009

मुक्ती

रोमरोमात जागली तुझ्या मुरलीची साद
दाही दिशा ओलांडून घुमे आज अंतर्नाद

भल्या पहाटे प्राणांत जणु काकडा पेटला
तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला

आसावल्या पावलांना दिसे वाट पंढरीची
सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ़ अंतरीची

द्रौपदीच्या दारी उभा चराचराचा हा स्वामी
भुकेल्याची तृप्ति इथे जाणवते अंतर्यामी

दूर भौतिकापासून, भक्तिमार्गाला निघाले
अंतर्बाह्य बदलले, मन विश्वरूप झाले

लक्ष चौ-यांशीचे फेरे किती काळ आता साहू?
मुक्ती देई मायबापा, असा अंत नको पाहू

भाव

तुझ्या डोळ्यांतले जे भाव होते
कुणाच्या काळजावर घाव होते?

इथे काटेच आता सोबतीला,
[फुलांसाठी कधी हे गाव होते ]

तुझा रुसवा, तुझे फसवे उसासे,
मला रोखायचे ते डाव होते

तुझ्या ओठांत माझे गीत होते,
तुझ्या गीतात माझे नाव होते

कधी सत्यात ते दिसलेच नाही
तुझ्या स्वप्नातले जे गाव होते

मनापासून मी होते तुझी का?
अखेरीला मनी हे भाव होते!

वसंत

आज माझ्या बागेमध्ये झाली काय नवलाई?
चोरपावलांनी जणु कोणी हलकेच येई
अबोलीच्या मनी काही भाव लाजरे, अव्यक्त
गुलमोहराच्या कानी गूज सांगतो प्राजक्त
मनमोकळ्या सुरात गाई बकुळीचा गंध
संगे रातराणी डोले, ताल देतो निशिगंध
जाईच्या मांडवाखाली नाजुक फुलांचा सडा
धुंद गंध उधळतो पानापानात केवडा
काट्यांवर उभी तरी हसे गुलाबाची कळी
जसे गुपित खुलावे, तशी फुलते पाकळी
गगनजाई करते गुजगोष्टी आकाशाशी
पायतळी पहुडल्या इवल्या फुलांच्या राशी
मोग-याची फुले काही कुजबुजली कानात
लाजून का चाफेकळी अशी दडली पानात?
पळसाने केशराचा गालिचा हा सजवला
रंग, गंधाची बहार घेऊन वसंत आला

Sunday, May 24, 2009

मन मनाला ना कळे

मन मृदु नवनीत, मन अभेद्य कातळ
कधि भरली घागर, कधि रिकामी ओंजळ

मन वठलेले झाड, मन फुलण्याचा वसा
कुठे मोकळी चौकट, कुठे बोलका आरसा

मन अक्राळविक्राळ जसा अदृष्टाचा भास
मन नाजूकसाजूक जसा चांदण्याचा श्वास

मन दूर दूर कधी, कधि अवतीभवती
मन कोवळी पहाट, मन सांज मावळती


मन काया की सावली? मन जाणत्याचे पिसे,
मन ओळखले कुणी? कोण जाणे मन कसे?

मन हिरवी धरित्री, मन आभाळ सावळे
मन अगम्य, अबोध; मन मनाला ना कळे

करुणा कर

सांब सदाशिव शंकर नीलकंठ गौरीहर
हे उमापती महेश भूतनाथ गिरिजावर

करी धारिसि त्रिशुल डमरु हे नटवर शशिशेखर
अंगी चिताभस्म लेप सर्पमाळ व्याघ्राम्बर

मदन दग्ध करिसि तूच हे त्रिनेत्र नंदीश्वर
रौद्र तुझे तांडव ते भीषण अन् प्रलयंकर

शंभो कैलासनाथ भालचंद्र गंगाधर
तूच सत्य, शिव, सुंदर करुणाकर करुणा कर

मनासारखे

हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे

तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे

मुठीत बंधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे

खुळे तुझ्या स्वप्नात जागते
मना करू दे मनासारखे

दंवात न्हाते पहाट ओली
धुके झरू दे मनासारखे

सुरांसवे माझ्या काव्याचे
दुवे जुळू दे मनासारखे

पसायदानी मागे ज्ञाना
जनां मिळू दे मनासारखे

वारसा

घाव घालुन मीठ त्यावर चोळण्याचा
हाच होता रोख त्याच्या बोलण्याचा

क्रूरतेला राहिली सीमा न काही,
छंद त्याला सावजाशी खेळण्याचा

मंदिराची देणगी ही लाच 'त्या' ला,
की तराजू पाप पुण्ये तोलण्याचा?

जीवघेणा खेळ आता सोड वेड्या,
कोवळया, ताज्या फुलांना जाळण्याचा

उंच जाताना न होते भान याचे ,
झोकही जाईल फिरत्या पाळण्याचा

"आज मी कामात आहे, तू उद्या ये"
रोजचा त्याचा बहाणा टाळण्याचा

तू नको ध्यानात घेऊ, मीच घेते
वारसा खाणाखुणा सांभाळण्याचा

Saturday, May 23, 2009

दास

या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा
आप, तेज, वायु, धरा, सा-यांतच भास तुझा

तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
मुखी राहो नाम तुझे, ध्यानी मनी वास तुझा

अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा
कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा

नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा
मनमोहन, यदुनंदन यमुनातटी रास तुझा

तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा
देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा

एका बेसावध क्षणी

एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी
तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी

तुझ्या सोबतीचा किती गर्व, अभिमान होता,
महाराज्ञी होते जशी, जग सारे जिंकून मी

चार भिंती, छत, दारे यांना घरपण दिले
चांदण्यांचे कवडसे अंगणात शिंपून मी

चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले
रंग माझे विसरले, तुझ्या रंगी रंगून मी

नाही घेतला मी ठाव, नाही मोजली मी खोली,
तुझ्या अस्तित्वात असे दिले मला झोकून मी

तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख,
तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी

तुझ्या यशाचे मंदीर, शिखराचा तूच धनी
नामदेवाची पायरी, तशी दारी थांबून मी

माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिंदू
तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी

एका बेसावध क्षणी तुला कळणार नाही
कसे झाले, काय झाले? कधी गेले संपून मी!

सल

दारी फुलांची पालखी, चित्त काट्यांत गुंतले 
गंधवेड्या गुलाबाचे पाय काट्यांत गुंतले 

किनाऱ्याच्या भोवतीच नाव फिरे दिशाहीन 
तिला दिसेना किनारा, दैव काट्यांत गुंतले 

वाटेवर आसुसल्या प्राजक्ताच्या पायघड्या 
गेले जाणून दुरून, मीच काट्यांत गुंतले 

रोज फुलांच्या भ्रमात काटे गुंफले, माळले
गंध त्यागला फुलांचा, श्वास काट्यांत गुंतले

अल्पजीवी आयुष्याचा शाप फुलांना, कळ्यांना
काटे जन्माचे सांगाती, प्राण काट्यांत गुंतले

अजुनही पापण्यांत सल हिरवे काट्यांचे
कसे सोडवावे पाश? स्वप्न काट्यांत गुंतले 

Friday, May 22, 2009

आज

नक्कीच काहीतरी चुकतंय आज
कशानं हे मन वेडं दुखतंय आज ?


कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी
पिंगा घालतात भलत्याच वेळी
अनावर रात्री चांदण्याची खेळी
स्रृजनाचं सुख सुद्धा खुपतंय आज !


मनातलं गाणंही ओठांवर नाही
सुरांचं गाव कुठे दूरवर राही
उजाड माळ का वाट माझी पाही ?
आभाळही पापण्यांत झुकतंय आज


उदास झाडांची गळतात पानं
निस्तेज चंद्राचं वितळून जाणं
धुकं, जसं दुखणं जुनं पुराणं
उफाळून पुन्हा का सलतंय आज ?

किमया

सांग ही किमया कशाची, मी नवी, जग हे नवे

सांगती माझी कहाणी पाखरांचे हे थवे

पाहते मी रूप माझे चांदण्यांच्या दर्पणी

कोण उधळित गंध फुलवी संचिताच्या अंगणी
सप्तरंगी इंद्रधनुचे रंगगहिरे ताटवे ?

शोधले मी आज माझे हरवलेले सूरही
आणि वा-याने सुरांना बांधले नूपूरही
गीत माझे मोरपंखी भावनांना जागवे

मीच गाणे कोकिळेचे, चातकाची मी तृषा
मीच कातर सांज हळवी, मी उषा अन् मी निशा
ज्योत माझ्या अंतरीची वाट मजला दाखवे

अंत

फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरून जावे
पाचोळ्यापरी अंत नको

जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे
नुसता कोकिळकंठ नको

रंग रूप रस गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे
कोशातिल सुरवंट नको

क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे
गती कधीही संथ नको

अद्भुत काही असे घडावे
असणे नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो रडवुन गेलो
इतका साधा अंत नको

Sunday, April 26, 2009

मातीचेच पाय

श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय?
जिथे माथा टेकवावा तिथे मातीचेच पाय!


मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली
वैभवाची ऐट हंड्या झुम्बरात टांगलेली
देवाच्याच दारी होई देवाचाही निरुपाय


मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली?
सुकला स्तब्ध अश्वत्थ, इंद्रायणीही गोठली
पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय


किती, कशी जोजवावी माया ममतेची नाती ?
त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती
कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय

Sunday, April 19, 2009

पाहिली मी पंढरी

अमृताची चंद्रभागा झुळझुळे या अंतरी
याचि देही याचि डोळा पाहिली मी पंढरी

मीपणाचे कवच गळले निर्गुणाच्या दर्शने
ते अलौकिक रूप पाहून तृप्त झाली लोचने
नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी


माळ तुळशीची गळा, कासे पिताम्बर, कर कटी
भाळि कस्तुरीटिळक, कानी मकरकुंडल शोभती
स्वर्ग भीमेच्या तिरी, वैकुण्ठ शोभे भूवरी

भान हरपे आणि होई मूक वाचा बोलकी
चरणी माथा ठेविता हा जन्म होई सार्थकी
आज प्राणांतून घुमली सावळ्याची पावरी

Tuesday, April 7, 2009

संभ्रम

सत्य जाणूनही कसे मन संभ्रमात होते?
माझ्या आयुष्याचे प्रश्न तुझ्या उत्तरात होते


काजळल्या रात्रींचेही भय वाटले ना कधी,
अंधाराला पेलण्याचे बळ चांदण्यात होते


फुले वेचता वेचता हात रक्ताळले तरी ,
काट्यांना फुलविण्याचे व्रत प्राक्तनात होते


डोळे मिटून घेताना अश्रू ओघळावे गाली ,
तुझे आमंत्रण तसे भिजल्या स्वरात होते


क्षितिजाला रोखणारी एक तरी वाट हवी,
आले हाताशी वाटता, दूर ते क्षणात होते


माझ्या नियतीने मला दिली शिकवण नवी,
कल्पनेतल्या गुन्ह्याची शिक्षा वास्तवात होते

Sunday, April 5, 2009

समर्पण

समर्पणाची आस उराशी, आतुर सरिता आली धावत
ऐकशील का कधी सागरा अंतरिचा हा नाद अनाहत?

लाटांचे हे तांडव आवर, या बेभान मनाला सावर
व्यापुन राही कणाकणाला, तुझ्या भेटिची ओढ़ अनावर

पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगर, कुरणे, दरिखो-यांतुन
उसळत आले आवर्तातुन, कधि बांधांच्या चाको-यातुन

कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल
स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल

एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर
सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर

श्वास

थांबला अखेर श्वास माझा
का तुला अजून ध्यास माझा?

गीत का तुझ्या सुरात माझे?
गंध का तुझ्या फुलास माझा?

ही न साद विद्ध पाखराची
सूर हा घुमे उदास माझा

चेतवू नको पुन्हा निखारे
प्राण जळे आसपास माझा

कालच्या उदास सावल्यांना
होतसे अजून भास माझा

गंध चंदनास मी दिलेला
मोग-यातला सुवास माझा

ना कधीच लाभला किनारा
चालला असा प्रवास माझा

गुलमोहर

हिरवी मखमल, लाल तु-यांचे मिरवित वैभव
गुलमोहर माझ्यात फुलवतो नवखे पालव


चिमणीच्या दातानी केले इवले वाटे
कधि हसणे, कधि रडणे, कधि रुसणेही खोटे
याच्या छायेमध्येच घडले माझे शैशव
गुलमोहर माझ्यात फुलवतो नवखे पालव


पानांच्या गुंजनात घुमले मधुर तराणे
फुलाफुलातून रुणझुणले ते गीत दिवाणे
पहाट वा-यासह भिरभिरला नाजुक कलरव
गुलमोहर माझ्यात फुलवतो नवखे पालव


इथेच शब्दांच्या वेलीवर फुले उमलली
इथेच कविता सुचली, रुजली आणि बहरली
नव्या पालवीसवे उमलला नवाच अनुभव
गुलमोहर माझ्यात फुलवतो नवखे पालव


इथेच खुलली हातावर मेंदीची नक्षी
पहिल्या वहिल्या प्रीतीचा हा अबोल साक्षी
कळी लाजरी अन् भ्रमराचे आतुर आर्जव
गुलमोहर माझ्यात फुलवतो नवखे पालव

Thursday, April 2, 2009

सांज स्वीकारली

प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे
पुसता तू काय हवे? मीच सांज स्वीकारली

उषा रम्य लावण्याची, निशा धुंद तारुण्याची
उदासीन कारुण्याची, मीच सांज स्वीकारली

उषा भूपाळीचे सूर, निशा अंगाई मधूर,
मनी जागवी काहूर, मीच सांज स्वीकारली


उषा प्रभूच्या कटाक्षी , निशा मिलनाची साक्षी
उभी एकली गवाक्षी, मीच सांज स्वीकारली


उषा किलबिलणारी, निशा दरवळणारी
मागे घुटमळणारी, मीच सांज स्वीकारली


उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते,
माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली


नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे,
माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली

कृष्णार्पण

नामस्मरण, चिंतन, सुख वैकुंठीचे जाण
चित्ती नांदे समाधान, सा-या चिंता कृष्णार्पण


भावभक्ती वाळवंट, मन्दिर हे अंतरंग
वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग
जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण

तूच अनंत ब्रम्हांड, तूच धरा, तू आकाश
दूर सारी जो तमाला, अंतरीचा तू प्रकाश
तूच दाता, तूच त्राता, तूच कार्य, तू कारण

काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे
आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे
तुझे दर्शन घडावे, तनू त्यागताना प्राण

Wednesday, April 1, 2009

देणे

निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे
स्वप्नात तुझे येणे
बेभान वादळांनी श्वासात जागवावे
आवेग जीवघेणे
अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी
जादूभरे तराणे
हळुवार भावनांना फुलवून जागवावे
माझे अबोल गाणे
मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य रात्र
घाली नवे उखाणे
ती चंद्रकोर वेडी हलकेच शीळ घाली
ते चांदणे दिवाणे
भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना
स्वच्छंद गंधलेणे
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे
अनमोल तुझे देणे

Monday, March 30, 2009

अव्यक्त

ठेच तुझ्या पावलाला, कळ माझ्या काळजात
काटा तुला बोचताना सल का माझ्या मनात ?

एका अव्यक्त नात्याने बांधलेले दोन जीव
भाव तुझ्या मनातला बोले माझ्या वचनात

मला घायाळ करते तुझ्या व्यथेची जाणीव
माझ्या वेदनेची जाण तुझ्या येते का मनात ?

माझ्या भाबड्या मनाला कसे आवरू कळेना
लागे छंद तुझा त्याला, रमे तुझ्या चिंतनात

जिथे क्षितिजही नाही असे दोघांत अन्तर
तुझा उजळ गाभारा, माझे विश्व अंधारात

पाचोळा

सरे वसंत सुखाचा, लागे ग्रीष्माची चाहूल,
वा-यावर भिरभिरे जीर्ण पानांचा पाचोळा

जळे वैशाख वणवा, माथी तळपते ऊन
भुईवर पायातळी घाली रांगोळ्या पाचोळा

वा-यासंगे उडताना कुठे होता कुठे आला?
भोग पिकल्या पानांचे असा भोगतो पाचोळा

तुझ्या माथ्यावर राहो माझ्या मायेची सावली
तुझ्या पावलांशी राहो माझ्या मनाचा पाचोळा

असे काय उरणार माझ्यामागे तुझ्यासाठी?
चार शब्दांचे निर्माल्य, आणि स्वप्नांचा पाचोळा!

Sunday, March 29, 2009

मीरा

पुन्हा जन्मेन की नाही, कधी हे जाणले नाही
परी जन्मात या तुजवीण कोणा मानले नाही

तुझ्या ध्यासात मी जगले, तुझ्या नामासवे रमले
तुझ्या चरणामृताचे भाग्य का मज लाभले नाही?

तुझे करपाश ना भवती, तुझ्या अधरी न मी वसले
तुझ्या वेणूपरी तुझिया सवे मी जागले नाही

तुझ्या त्या रंगलेल्या रासलीला पाहिल्या स्वप्नी,
कधी सत्यात राधेचे जिणे मज साधले नाही

विषाचे घोट मी गिळले मुक्याने, साहिली निंदा
असे उरलेच नाही दु:ख जे मी भोगले नाही

कधी नव्हते कुणाची मी, तुझी होते, तुझी आहे
मनाला मर्त्य जगताच्या रुढींनी बांधले नाही

खुळी कोणी म्हणो की बावरी, मी उन्मनी मीरा,
मनोमन जाणते हे स्वप्नवैभव आपले नाही

माझी कविता

भाव तुझ्या मनातले जाणते माझी कविता
शब्द तुझ्या डोळ्यातले वाचते माझी कविता

कधी अज्ञाताच्या अंधारात हरवून जाते
कधी माझ्या अंगणाची वाट विसरून जाते
तुझ्यामुळे मला पुन्हा भेटते माझी कविता

तुझ्या विश्वासाने मिळे आधार या जीवनाला
तुझ्या चिंतनाने आला आकार या जीवनाला
तुझी भक्ती हेच सत्य मानते माझी कविता

न मागता मिळे सारे, आता तुला काय मागू?
अंतरंग जाणसी तू, नव्याने मी काय सांगू?
मला तुझे मूर्त रूप भासते माझी कविता

शब्द माझे, भाव माझे गुंफलेले तुझ्यासाठी
कल्पनाविश्वात मन गुंतलेले तुझ्यासाठी
आता तुझ्यातच मला पाहते माझी कविता

दैवयोग

संचिताची ठेव ही प्राक्तनाचे भोग?
जन्माचे ऋणानुबंध जन्माचा वियोग

मनाचे हे खेळ किती अगम्य, अबोध
अशाश्वत आयुष्यात शाश्वताचा शोध

अनाकलनीय, गूढ़ दैवाचे हे बोल
जसा घुमे घंटानाद गाभा-यात खोल

असे बंध, अशी नाती ज्यांना नाही तोड
ज्याची त्यालाच कळते अंतरीची ओढ़

तनु इथे प्राण तिथे कसा हा संयोग?
हेच नियतीचे दान, हाच दैवयोग!

मौन तुझे

बोल एकदा काहितरी रे
मौन तुझे घायाळ करी रे

कातर हळवी सांज छेडते
तरल विराणी दर्दभरी रे

श्रावणात ही तळमळते मी
झेलुनिया अलवार सरी रे

जाणवते ती तुझी असोशी
इथे दाटतो श्वास उरी रे

देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे

अंतरण्याने अंतर वाढे
मिटव दुरावा हा जहरी रे

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वर लहरी रे

ओळख

कोमेजल्या वेलीला या चैत्रपालवी फुटावी
विधात्याने मुक्त हस्ते सारी दौलत लुटावी

आज मनातल्या दाट काळोखाचा अंत व्हावा
उजळून जावे विश्व अशी पुनव भेटावी

वाट चालता चालता एकटेच दूर जावे
आस संसाराची, साथ जीवनाचिही सुटावी

सारे काही विसरावे, मागे वळून पाहता
आपलीच सावलीही आज परकी वाटावी

लोभ, मोह, माया, क्रोध, अहंकार ही गळावा
मुक्त व्हावा जीव आता, सारी बंधने तुटावी

असे आत्ममग्न होता अस्तित्वही विसरून
माझी मलाच नव्याने पुन्हा ओळख पटावी

आत्मा परमात्मा आता असे व्हावे एकरूप,
त्याचे चरण धरावे आणि लोचने मिटावी