Thursday, September 17, 2009

पुन्हा केव्हातरी

संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी
काही तराणेही नवे, छेड़ू पुन्हा केव्हातरी

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या
सांगायच्या गोष्टी आशा, सांगू पुन्हा केव्हातरी!

झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे,
तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी

दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे,
आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी!

सांगून नाही भेटलो तेव्हा, कधी भेटूनही
हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी"!

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

1 comment:

  1. क्रान्ती कविता आवडली. हे असेच शब्द पुन्हा केव्हातरीत अडकून बोलायचे राहूनच जातात.

    ReplyDelete