Sunday, November 1, 2009

शिक्षा

शिक्षा नवी तरीही आरोप जुना आहे
काही न बोलणे हा, इतकाच गुन्हा आहे

आम्ही असे अनोख्या मस्तीत झिंगलेले,
गेले घडून त्याचे सुख-दु:ख कुणा आहे?

घायाळ जरी झाले झेलून शर विषारी,
हे पाखरू भरारी घेणार पुन्हा आहे

गाईल वसंताची गाणी पुन्हा नव्याने,
हा कंठ कोकिळेचा, जो आज सुना आहे

ही सिद्धता कशाची? हे सोहळे कशाला?
आत्मा नव्या जगाचा, हा देह जुना आहे!

"उन्मत्त नको होऊ", त्या वादळास सांगा,
"नौकेकडे किनारा येणार पुन्हा आहे!"

3 comments:

 1. क्रात्नि, पहिल्या दोन ओळीत दडलेय सारे सत्य...आवडली गं. ही सिध्दता कशाची?.....हा देह जुना आहे! क्या बात हैं!फारच छान.

  ReplyDelete
 2. गाईल वसंताची गाणी पुन्हा नव्याने,
  हा कंठ कोकिळेचा, जो आज सुना आहे
  आशेचा संदेश देणा-या ह्या ओळी भावल्या .
  हे वर्ड वेरिफिकेशन काढून डाक फार त्रास देतं .

  ReplyDelete
 3. tumachya sagalyach gazala chhan asatat

  गाईल वसंताची गाणी पुन्हा नव्याने,
  हा कंठ कोकिळेचा, जो आज सुना आहे

  hya oli chaanach

  ReplyDelete