Saturday, November 14, 2009

नकोसे वाटते

पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते
कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते


देत गेले दैव, मीही घेतले जे लाभले,
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?


सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते !"

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गा-हाणे नकोसे वाटते

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी?
संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

3 comments:

  1. सावली व कागाळ्या हे दोन्ही सुंदरच झालेत.:)
    आवडले.

    ReplyDelete
  2. आता काय बाई म्हणणार आम्ही...अतिशय सुंदर...कसंच सुचतं हो तुम्हाला...

    बाकी पण पुढे येऊ दे तुझ्या गज़ला...वाट बघतेय...

    दीपिका

    ReplyDelete
  3. कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
    मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?

    aavadli!

    ReplyDelete