Friday, December 31, 2010

कळा लागल्या

कळा लागल्या पार आतून होत्या
किती यातना खोल दाटून होत्या!

जरी घाव आता उभारून आला,
मुळाखालच्या वेदना जून होत्या

तुला पाहता मी मलाही भुलावे,
अशा सूचना काळजातून होत्या!

कशी बाग माझी मला सापडावी?
कळ्या वेगळा गंध माळून होत्या

मला हारण्याचीच संधी मिळाली,
तुझ्या सोंगट्या डाव साधून होत्या!

जगावेगळे भाग्य दारात आले,
[तशा चाहुली कालपासून होत्या!]

तुझ्या अंगणी सावल्या या कुणाच्या
सुखाची खुळी आस लावून होत्या?

कुणाला, किती, कोणते दु:ख द्यावे?
मुक्या कुंडल्या सर्व जाणून होत्या

कशाची सजा आणि माफी कशाची?
चुका फक्त माझ्याच हातून होत्या!

Tuesday, December 28, 2010

सोबत

मी पुसट पुसट शब्दांचे अन्वयार्थ शोधत होते,
हातावरच्या मिटलेल्या रेषांना जोडत होते


केव्हाच संपली होती पुनवेची अल्लड गाणी,
अवसेचे दार बिचार्‍या चंद्राला रोखत होते


टाकून देववत नव्हते निर्माल्य ओंजळीमधले,
ताज्या स्वप्नांची परडी हातातुन सोडत होते


आजन्म चालला माझा हा खेळ विचित्रपणाचा,
तुटलेले जोडत होते, जुळले की तोडत होते!


"ती हरली आहे, आता शेवटचा घाला घालू"
ते दैव पाशवी माझे कोणाशी बोलत होते?


मायेच्या पाशामधली एकेक वीण सोडवली,
विरल्या आशेचे थडगे जाताना सोबत होते!

Saturday, December 11, 2010

मिसरे

रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे

अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

जमीन नाही पहात, मात्रा मोजत नाही, वृत्तहि नाही,
मनात येते तेच सांगती, बहर नसे तरि बहार मिसरे

तुझी ठेव ही धुंद शायरी, तुझ्याच गझला, तुझेच नग़मे,
घुसमटताना जगण्यासाठी तूच दिलेले उधार मिसरे!

नकार खोटा ओठांवरचा, मनात आहे रुकार दडला,
नकार होकारात बदलती खुल्या दिलाची पुकार मिसरे

तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाउस घेउन गेला,
उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!

Thursday, December 2, 2010

बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!

जातात वृक्ष वादळात, तरती पाती,
आभाळ पेल तू, नकोस विसरू माती

प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
माझीच पैंजणे दगा देउनी जाती

केव्हाच सोडली माझी वाट दिव्यांनी,
अंधार एकला जन्माचा सांगाती

पाने निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी नाती

तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!

Friday, November 26, 2010

आई, तुझ्या अंगणात

आई, तुझ्या अंगणात आले हरवून
एक खट्याळ बाहुली, सानुलीशी भातुकली,
कोजागिरीचा चांदवा, हळदीचं ऊन!

आई, तुझ्या अंगणात धुंद निशिगंध,
लाजबावरी अबोली, निळ्या गोकर्णाच्या वेली,
जाई, मोगरा, चमेली, प्राजक्ताचा गंध!

आई, तुझ्या अंगणात विसावे उन्हाळा,
कुरड्या, पापड, सांडगे, शुभ्र शेवयांचे चोंगे,
थंडगार सरबत, त्यात लिंबू-वाळा!

आई, तुझ्या अंगणात भिजली हिरवळ
पावसात चिंब चिंब, वेचलेले थेंब थेंब.
वाफाळल्या चहातल्या आल्याचा दरवळ!

आई, तुझ्या अंगणात दिवाळी पहाट
तुझे भूपाळीचे सूर, आकाशदिव्याचा नूर,
पणत्यांच्या रांगा आणि रांगोळ्यांचा थाट!

आई, तुझ्या अंगणात आनंदाच्या राशी
लपाछपी, काचापाणी, रात्री पर्‍यांची कहाणी,
आता फक्त आठवणी, तुझ्यामाझ्यापाशी!

Sunday, November 21, 2010

त्रिधारा - आठवणी

त्रिधारा - आठवणी

* आठवणींचे शंखशिंपले
बालपणीच्या नदीकिनारी
मोठेपण विसरून वेचले!

* थंडी मरणाची, गोठले आभाळ,
जात्या जिवासाठी आता हवी आई
तुझ्या आठवांची उबदार शाल!

* काचाकवड्या, सागरगोटे,
आठवणींचे खेळ रंगता
प्रौढत्वाला हेवा वाटे!

* आठवणींच्या पडद्याआडून
एक निरागस, लोभस चेहरा,
मलाच शोधतोय लपून-छपून!

* आठवणींचे किरण कोवळे
भल्या पहाटे जागविती अन्
आठवणींतच सांज मावळे!

Thursday, November 18, 2010

अर्थ आहे

आज हा जाई, उद्याला अर्थ आहे
का जुने आता? नव्याला अर्थ आहे

जायचे आहे पुढे, जाणार आहे,
व्यर्थ मागे थांबण्याला अर्थ आहे?

भेकडांचे टोमणे झाले निकामी,
काय त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे?

दाट काळोखास मी का घाबरावे?
दीप नाही? काजव्याला अर्थ आहे!

का उगा चिंता, उद्या येईल कैसा?
जे जसे होईल, त्याला अर्थ आहे!

सूर ल्याले सूर्यबिंबाची झळाळी, 
सांजवेळी मारव्याला अर्थ आहे

माळ ना या मोकळ्या केसांत थोडे,
त्याविना का चांदण्याला अर्थ आहे?

Sunday, November 14, 2010

म्हटले होते

आषाढघनांचे गाणे वेचावे म्हटले होते
रंध्रांत सुरांचे नाते पेरावे म्हटले होते

जो माझ्या वाटेवरती पेरून चांदणे गेला,
त्या लोभस आनंदाला भेटावे म्हटले होते

एकाकी अभिमन्यू मी, लढले पण अंती हरले
नियतीच्या चक्रव्युहाला भेदावे म्हटले होते

हातात उरे इतकासा  चतकोर फाटका तुकडा,
आभाळ तुझे सवडीने झेलावे म्हटले होते

मी ऐन क्षणी चुकले अन् सोंगट्या पटावर थिजल्या
हा डाव जिंकण्यासाठी खेळावे म्हटले होते

Saturday, November 13, 2010

त्रिधारा - स्वप्न

* स्वप्न खुळे डोळ्यांतच थिजले
पापणीस ना नीज जराशी,
थकून भागुन स्वप्नच निजले!

* तुझे स्वप्न चंचल पार्‍याचे
क्षणात दिसते, क्षणात लपते
भिरभिरणारे घर वार्‍याचे

* स्वप्न पाहणे राहून गेले
काजळकाळे काठ भिजवुनी
आसवांसवे वाहून गेले!

* आतुर मनाला स्वप्नाची चाहूल
सांजेपासूनच डोकावे दारात,
कधी अंगणात वाजेल पाऊल?

* काचेचं स्वप्न, ते टोचेलच ना?
डोळ्यांतून पडलं, खळ्ळकन फुटलं,
काळजाला तुकडा बोचेलच ना?

Wednesday, November 10, 2010

पापण्यांना भार झाली आसवे

चांदणेही ढाळते माझ्यासवे
पापण्यांना भार झाली आसवे

मी कधी त्याचीच होते, अन् अता,
नावही माझे न त्याला आठवे

वेदना माझ्या किती मी साहिल्या,
आज का त्याची व्यथा ना साहवे?

सांग ना हा कोणता आला ऋतू?
अंतरी आशा नव्याने पालवे

जा, मला बोलायचे नाही सख्या,
[बोलल्यावाचूनही ना राहवे!]

त्रिधारा - शब्द

त्रिधारा हा माझा एक नवा प्रयत्न. तीन ओळींच्या कविता हा प्रकार तसा नवा नाही. गुलजारजींची त्रिवेणी आपण सारेच जाणता. जपानी हायकू हाही तीन ओळींच्या कवितेचा प्रकार.
माझ्या या तीन ओळींच्या धारा मिळून बनलेली त्रिधारा. प्रत्येक ओळीत दहा ते अकरा अक्षरे आहेत, बाकी मात्रा-वृत्त असं काही बंधन नाही. यमक पहिल्या आणि तिसर्‍या ओळीत.
या पाच त्रिधारा "शब्द" या एकाच विषयावरच्या आहेत.


* शब्द जसे गंधहीन वारा
उघडे अत्तर उडून जावे,
तसा उडाला अर्थच सारा!

* शब्दांच्या पलिकडले काही,
अर्थ जयाचा गहन, गूढसा
मौन एकटे बोलत राही!

* शब्द उमाळे, शब्द उसासे
बघता बघता विरून गेले,
उधार दे ना शब्द जरासे!

* तुझे शब्द की गाणे सुंदर?
की माझा अंधार उजळते,
लखलखते तेजस्वी झुंबर?

* भिरभिर शब्दांचा पाचोळा
वार्‍याने उधळला नभावर,
ओंजळीत मी केला गोळा!

Wednesday, October 27, 2010

वेणा

आतून उमलते काही, घुसमटते, पण प्रसवेना
छळतात जिवाला कधिच्या, सृजनाच्या फसव्या वेणा
गर्भात अंकुरे तेव्हा आभाळनिळाई झरली
रंध्रांतुन फुटल्या लाटा, गात्रांतुन वीज लहरली
हासले, उमलले, फुलले, आतल्या आत मोहरले
अन् तिथेच गुंतुन गेले, त्या काळोखाला भुलले
गुंत्यात जीव गुंतावा, इतके गुंतावे का रे?
विझतील अंतरामधले अस्फुट, अव्यक्त धुमारे
आतल्या आत हुंकारे, "मज व्यक्त व्हायचे आहे,
कुणि कवाड उघडुन द्या रे, मज मुक्त व्हायचे आहे!"
भेदून कवच डोकावे, चांदणी जशी उमलावी,
आभाळ मोकळे व्हावे, की नीरगाठ उकलावी
जरि धूसरसे, अधुरेसे, पूर्णत्वाने प्रकटेना,
मन हलके, तृप्त, निवांत अन् धन्य, सार्थ त्या वेणा!

Wednesday, October 20, 2010

थांबावे का?

थेंब थेंब डोळ्यांत साठते,
सुख जन्माचे उरी दाटते,
या घटकेला असे वाटते,
इथेच सगळे संपावे का?

जे लाभे ते भाग्य भोगले,
ते केले, जे कधि न योजले,
किति मैलांचे दगड मोजले,
या वळणावर थांबावे का?

किती ग्रीष्म, किति शिशिर पेलले,
वर्षाघन रंध्रांत झेलले
शारदचांदणभूल खेळले,
इतके येथे गुंतावे का?

फुलासारखे भार वाहिले,
वास्तवातही स्वप्न पाहिले,
अजून किति मुक्काम राहिले?
नकोच आता, थांबावे का?

Sunday, October 10, 2010

जोगवा

दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माउली
गांजती त्रिविध ताप, संताप, व्याप, तू होई साउली ॥

घेउनी कायेची परडी, तुझ्या मी आले ग दारी
चेतवी पोत मनाचा, आई अंबे सत्वर उद्धारी
दीन ही लेक तुझी विनवी येई करुणेच्या पाउली ॥

त्यागुनी तुझी पायरी, सांग कशी जाऊ मी माघारी,
दाह हा तनामनाचा सोसेना, विटले या संसारी
तुझ्या चरणांचे अमृत दे माते, थांबव ही काहिली ॥

नांदती गर्वासुर, दंभासुर, नगरी मलीन ही झाली
मातले षड्रिपु, फिरती अस्त्रे-शस्त्रे परजित भवताली
चंडिका माय भवानी दुष्टांच्या संहारा धावली ॥

तुझी मंगलमय मूर्ती सदैव नांदो माझ्या अंतरी
ज्योत आशिर्वादाची अखंड तेवत राहो मंदिरी
ब्रम्ह तू, माया तू, शक्ती-दुर्गा तू, सकळां पावली ॥

Friday, October 8, 2010

वाढती का अंतरे?

शून्य, भाकड प्रश्न माझा, व्यर्थ त्याची उत्तरे
साधण्या जवळीक जाता, वाढती का अंतरे?

काल वैराची सुपारी, आज मैत्रीचे हसू,
वागणे या जीवनाचे कोणते मानू खरे?

कोण तो? त्याच्या नि माझ्या वेगळ्या होत्या दिशा,
पाडली त्याच्या स्मृतींनी काळजाला का घरे?

मूळ आवृत्ती जशी होती तशी, कोरी, नवी!
वाचता आली कुणाला गूढ त्याची अक्षरे?

लाकडे ओली असो की चंदनी राहो चिता,
शेवटी या चौथर्‍यावर फक्त उरते राख रे!

Wednesday, October 6, 2010

वेगळ्या रूपात

पाकळीला जाण नको, देठालाही ताण नको
फूल असं अलगद टिपायचं
उणादुणा बोल नको, देताघेता मोल नको
नातं असं हळुवार जपायचं ॥

सांज जरा कलताना, जाईजुई फुलताना
रूप मनदर्पणात पहायचं
धुंद पश्चिमेची लाली, उतरता गोर्‍या गाली
नाजूकसं गीत एक लिहायचं ॥

पापणीला आच नको, डोळ्यांनाही जाच नको
स्वप्न असं नकळत बघायचं
मनात काहूर नको, आसवांचा पूर नको
पाऊल न वाजवता निघायचं ॥

चंद्रज्योती मालवता, नव्या आशा पालवता
ओंजळीत दंव गोळा करायचं
आठवणींची रांगोळी, कवितेच्या चार ओळी
वेगळ्या रूपात मागे उरायचं!

Tuesday, September 28, 2010

कळले नाही

फुलांतला का गंध रुतावा, कळले नाही
व्यथेसवे का स्नेह जुळावा, कळले नाही

अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही

गुन्हेगार तो असूनही 'बा-इज्जत' सुटला!
कुणी, कुठे दडपला पुरावा, कळले नाही

अजाणता मी त्याच्या वाटा तुडवित गेले,
कसला चकवा, कसा भुलावा, कळले नाही

अनोळखी मी, मलाच नाही कधी गवसले,
तुला कसा लागला सुगावा, कळले नाही

Saturday, September 25, 2010

लाडक्या लेकीसाठी

सदैव माझ्या अवतीभवती नाचतेस तू
मनात माझ्या काय? मनाने वाचतेस तू

घरकुल इवले उजळत आलिस सोनपावली
लेक लाडकी, माझी आशा, सखी, सावली
दर्पणातली माझी प्रतिमा भासतेस तू

हिरवा चाफा दरवळतो तू रुणझुणताना
टपटपती प्राजक्तफुले तू गुणगुणताना
बकुळीच्या नाजुक गंधातुन हासतेस तू

कधी माय होते माझी अन मलाच जपते
मुसमुसते कधि, हलके माझ्या कुशीत लपते
गुपीत काही हळूच सांगुन लाजतेस तू

उदास होते, जेव्हा मी माझी ना उरते
आठवणींचे आभाळ नकळत भरते, झरते
थेंब थेंब अन पापणीमध्ये साचतेस तू

Thursday, September 2, 2010

ग्रहण

जाळ नाही, धूर नाही, तरी काहीतरी जळतंय
एकूण एक हिरवं पान पिकल्यासारखं गळतंय
काय चुकलं, कळत नाही, इतकं मात्र कळतंय, ..... की
नको त्याच वाटेवर चाललंय भ्रमण!

कधी असं, कधी तसं, वाट्टेल तसं वागलंय,
स्वप्नांमागे धावून धावून मन थकलंय, भागलंय
कोण जाणे, याला कसलं भलतं खूळ लागलंय, ..... की
पिसाटल्या कल्पनांचं झालंय अतिक्रमण?

डोळ्यांच्या डोहातलं पाणी कसं आटतंय?
काळजाच्या आभाळात गच्च धुकं दाटतंय
राहून राहून जिवाला या असं काही वाटतंय, ..... की
आपलंच का आपल्याला लागलंय ग्रहण?

Tuesday, August 31, 2010

पाऊस-कविता

प्रशांतनं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि मला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम वर दिले आहेत. आता मी माझी साखळी जोडते आणि पुढचा डाव प्राजु, राघव, जयवी आणि गोळे काका यांच्या हाती सोपवते.


पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -
१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....


मग करायची‌ सुरुवात?
माझं कडवं - (भुजंगप्रयात छंद)


न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

माझा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

याला माझं उत्तर घे प्रशांत

छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

माझा खो प्राजु, राघव, गोळे काका, जयवी यांना

Friday, August 27, 2010

जमले नाही

सागरात राहून मनाच्या झळा विझवणे जमले नाही
कुंपणातले खिळे काढले, खुणा बुजवणे जमले नाही
सूर्य, चंद्र अन तारे होते,
ऊन, सावली, वारे होते
आयुष्याचे इवले घरकुल जरा सजवणे जमले नाही
आसुसलेली ओली माती
कुशीत जपते हिरवी नाती
कोंब कोवळे तरी जळाले, तुला रुजवणे जमले नाही
जरी युगांची तहान होती,
ओंजळ माझी लहान होती
बरसलास अवघ्या विश्वावर, मला भिजवणे जमले नाही

Monday, August 23, 2010

बंडखोरी

रुढींची भिंत त्याने पाडली
मनाची बंडखोरी वाढली

उरे माझे अभागी झोपडे
पुरी वस्ती जरी ओसाडली

चला, बोली करा, भगवंत घ्या
इथे श्रद्धा विकाया काढली

जरासे स्वच्छ, हलके वाटले,
मनाची ओसरी मी झाडली

जगाचे ऐकले अन् वागले,
तरी तोंडे किती वेंगाडली!

व्यथे, आता तरी तू हो सुखी,
तुझ्यासाठी सुखे लाथाडली

विठू, दे घोंगडी, आताच मी
कुडीची जीर्ण चादर फाडली

Thursday, August 19, 2010

समिकरणे

उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे
गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे

बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे!

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन उपकरणे?

जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे?
तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे

म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन अवतरणे!)

Wednesday, July 28, 2010

माझी जन्माची शिदोरी

तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी

तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते

दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत

तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी

Wednesday, July 21, 2010

अरूपाचे रूप

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई


भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत


दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग


भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात


मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

Thursday, July 15, 2010

किती सुखाचे असेल

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे,
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

Monday, July 12, 2010

गाणी

आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली  गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||
दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम  लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||
भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून  झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||
नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||
निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||
असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?





  

Sunday, July 4, 2010

निरुत्तर

वाट बघण्याच्या क्षणांची यातना कळली पुन्हा
डोह भरले पापण्यांचे, माळ ओघळली पुन्हा
तो म्हणे, "ही  वाट माझी वेगळी, अगदी नवी"
लोक आले, येत गेले, वाट ती मळली पुन्हा
कैकदा ठरवून झाले जायचे नाही तरी,
का तुझ्या रस्त्याकडे ही पाउले वळली पुन्हा?
मी उमेदीने नव्या  फुलता जरा चैत्रापरी,
पेटला वैशाख वणवा, बाग का जळली पुन्हा?
वादळे आली किती, त्यांची मला नव्हती तमा,
बांधले घरटे तिथे का वीज कोसळली पुन्हा?
 कोरड्या डोळ्यापरी का कोरडे झाले ऋतू?
मी असे पुसता निरुत्तर सांज मावळली पुन्हा!

Thursday, June 10, 2010

नको तेच झाले

पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही

जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही

किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही

कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही

मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही

Wednesday, May 26, 2010

तुझ्या रूपातले राग

काही तालात, सुरात, काही लयीत चुकले
तुझ्या रूपातले राग मनापासून शिकले

रात्री जागवल्या मालकौंस, बागेसरी गात
आर्त विराण्या गाइल्या जोगियाच्या प्रहरात
भल्या पहाटेला भैरवाच्या चरणी झुकले

काळजात कोमेजले मुक्या कळ्यांचे नि:श्वास
तरि ग्रीष्मकहराचा नाही केला रे दुस्वास
सारंगाच्या सुरांत या वेड्या जिवाला जपले

मल्हाराच्या लडिवाळ, मृदू सरी श्रावणात,
आळविले केदाराचे सूर संध्यावंदनात
तुला भूपात गाताना मीच मला हरवले

अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख
ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक
दयाघना, भेट आता; आळवून मी थकले

Wednesday, May 19, 2010

गोष्टी तुझ्या

हा माझा अनुवादाचा आणखी एक प्रयत्न. अर्थातच अनुवादात बर्‍याच मर्यादा आहेत, काही ठिकाणी तो भावानुवाद न होता केवळ शब्दशः अनुवाद झाला आहे, मूळ काव्यातल्या कल्पनांची चमक तितक्या ताकदीनं उतरवता आली नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. तरीही एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. गझल क़मर जलालवी यांची  "कभी कहा न किसीसे" छंद वेगळा [२४ मात्रा]

नाही कधीच कथिल्या गोष्टी तुझ्या कुणाला
कळली कशी न ठावे वार्ता उभ्या जगाला!

कित्येक पद्धतींनी घरट्यास बांधले मी,
बागेत वीज तरिही सोडे कधी न त्याला

तू मैफलीत परक्या जाणार नाहि, कळले
म्हणशील तर सजवितो या दीन कोटराला!

वर मागताच बहराचा, बाग अशी फुलली,
जागा जरा न उरली माझ्या इथे घराला

बागेत आज जा तू परि ध्यानि ठेव व्याधा,
सोडून एकटे मी आलो तिथे घराला

जळती पतंग माझ्या कबरीवरी फुका हे,
लावू नका दिवा हो, विनवीत आपणाला!

फिरवून पाठ जाती, देऊन मूठमाती,
अवधीत क्षणांच्या होई काय हे जगाला?

होईल यात कधिही उल्लेख तुझा आता,
तू सांग, कहाणी ती संपेल या क्षणाला

बदनाम व्हायची ना भीती तुला जराही?
भर चांदण्यात सखिला समजावया निघाला!

आणि ही मूळ गझल ::::::::

कभी कहा न किसी से तेरे फंसाने को
न जाने कैसे ख़बर हो गई जमाने को

चमन में बर्क़ नहीं छोडती किसी सूरत,
तरह तरह से बनाता हूं आशियाने को

सुना है गैरों की महफिल में तुम न जाओगे,
कहो तो आज सजा लूं ग़रीबखाने को

दुआ बहार की मांगी तो इतने फूल खिले,
कहीं जगह न रही मेरे आशियाने को

चमन में जाना तो सय्याद देखकर जाना,
अकेला छोडके आया हूं आशियाने को

मेरी लहड़ पे पतंगों का खून होता है,
हुजूर शम्मा न लाया करें जलाने को

दबा के कब्र में सब चल दिए, दुआ न सलाम,
जरासी देर में क्या हो गया ज़माने को?

अब आगे इसमें तुम्हारा भी नाम आएगा,
जो हुक्म हो तो यहीं छोड दूं फंसाने को!

क़मर, जरा भी नहीं तुझको खौफ़-ए-रुसवाई,
चले हो चांदनी शब में उन्हें मनाने को!

Saturday, May 15, 2010

सजा

उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

Friday, May 14, 2010

अबोल प्रीत

जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती
रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती!

मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती
स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती
तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती!

रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये
मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये
संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती!

अधरांच्या उंब-यात नाव तुझे का अडते?
अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते?
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!

Wednesday, May 12, 2010

तृषार्त


राहु दे मला तृषार्त, राहु दे मला अतृप्त
बंधनात राहुनही मन माझे बंधमुक्त

गूज मनाचे मनास मौनातुन उलगडले
शब्दावाचून भाव शब्दांच्या पलिकडले
ओळखले नजरेने, जरि अबोल अन अव्यक्त

ते हळवे, तरल स्पर्श सांगुन गेले सारे
ओठ बोलले न तरी बोलुन गेले सारे
आगळेच प्रेमगीत गुणगुणते अधिर चित्त

नवलाचे क्षण अलगद अंतरात साठवु दे
ते फुलणे, ते खुलणे, ती हुरहुर आठवु दे
चिंतनात अविरत मी, आणि तुझा ध्यास फक्त 

स्वप्नापरि जे घडले ते अभंग राहू दे 
झुरण्यातच विरण्याचे सौख्य मला साहू दे
ओलांडून मोहाचे उंबरठे, मी विरक्त!

Friday, May 7, 2010

नवे गीत

ओल्या जखमेमधून नवे गीत पाझरावे
कोसळते घर जसे वादळाने सावरावे

वेदनेच्या पाळण्यात खुळे स्वप्न जोजवावे,
व्यथा ठेवावी उशाशी आणि दु:ख पांघरावे

मृगजळापाठी धावताना तोल सांभाळावा,
सावल्यांशी खेळताना देहभान विसरावे

बेफाम जगावे, जशी वाहे पुरातली नदी,
ओहोटीच्या दर्यापरी हळुवार ओसरावे

कोण आता इथे ज्याला आस तुझ्या प्रकाशाची?
काजळी कलंक माथी मिरवीत का उरावे?

Saturday, April 17, 2010

वेळिअवेळी

एक सांगु का? बरे नव्हे हे असे बहरणे वेळिअवेळी
सांजसावल्या खुणावताना दंवात फिरणे वेळिअवेळी

वेळिअवेळी झुळुक कोवळी तुझा विचारी ठावठिकाणा,
हिरमुसलेल्या चंद्राचेही तुलाच स्मरणे वेळिअवेळी

रोज भेटलो तरी न घडते भेट कधीही मनासारखी,
आठवून त्या जुन्याच भेटी, उगाच झुरणे वेळिअवेळी

वाट वाकडी करून त्याच्या वाटेवर रोजचे थबकणे,
आसुसलेल्या नजरांचे गालिचे पसरणे वेळिअवेळी

आजकाल हे असेच होते, वेळिअवेळी गुलाब फुलतो,
भूल पाडते रातराणिचे गंध विखुरणे वेळिअवेळी

ऐक मना रे, पुन्हा सांगते, वेळ कधी सांगून न येते,
जगता जगता हाती उरते केवळ मरणे, वेळिअवेळी

Sunday, April 11, 2010

मात्रा

मनाची अता थांबली काहिली
विषाला विषाचीच मात्रा दिली!

कुठे लोपले कालचे हासणे?
कुठे ती तुझी आज जिंदादिली?

कुणी जाणल्या का नभाच्या व्यथा?
कुणी मातिची यातना पाहिली?

सुखाचा तिथे घोष होईल का?
जिथे वेदनेचीच संथा दिली!

दुभंगून घे माय पोटी अता,
उभा जन्म मी वंचना साहिली

Thursday, March 25, 2010

चैत्रगौर

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

Wednesday, March 24, 2010

अक्षय

नाही मनाला कुंपण, कल्पनेला नाही भय
नाही स्वप्नांना बंधन, भावनेला नाही वय

अंतराची नाही क्षिती, मन जाणते मनाला,
शब्द वेगळे तरीही एक सूर, ताल लय

क्षितिजाशी भेटण्याची ओढ गगनधरेची,
सूर्योदय उषेसंगे, संध्येसाठी चंद्रोदय

दारी मोगरा फुलतो आठवणींच्या फुलांनी,
मन पाकळी पाकळी होते येता तुझी सय

मृदु रेशमाचे गोफ तसे ऋणानुबंध हे,
तुझ्या माझ्या नात्यापरी नित्य अभंग, अक्षय

Tuesday, March 16, 2010

समर्थ

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

Friday, March 12, 2010

नाटक

वहिवाटीच्या रस्त्यांना कधि वळण भेटते भलते
मन नव्यानव्या क्षितिजांच्या शोधात अखंडित फिरते

कधि जुन्याच शब्दांमधुनी मी अर्थ वेचते नवखे
परिचयातले जग होते कधि क्षणात उपरे, परके
कधि अनोळखी स्वप्नांशी हक्काचे नाते जुळते

कधि कुणी कुठे गुंतावे, हे संचित ज्याचे-त्याचे
या जन्मजन्मिच्या गाठी, हे ऋणानुबंध युगांचे
तो मोहजाल पसरवितो, मन त्या चकव्याला भुलते

कधि शब्दसुरांशी गट्टी, कधि मौनातुन बोलावे,
कधि पायवाट फुललेली, कधि काट्यांतुन चालावे
त्यानेच ठरविले सारे, तो म्हणेल ते मी करते

नेपथ्य, कथा, पात्रांच्या निवडी त्याने केलेल्या,
मंचावर येण्याआधी भूमिका सिद्ध झालेल्या
मी अलिप्त होउन माझ्या जन्माचे नाटक बघते

Thursday, March 4, 2010

कृतार्थ

माझ्यापाशी चार कोन, तुला वर्तुळाचा ध्यास
कुंपणात माझं जग, तुला क्षितिजाची आस

माझ्या अंगणी कोरांटी, तुला गुलाबाचा छंद
दु:ख माझे गणगोत, तुझा सोयरा आनंद

माझ्या कापल्या पंखांत खोल वेदनेची कळ,
तुझ्या पंखांत पेरते नभ जिंकायाचे बळ

माझी चंदनाची काया, झिजे तरी नाही खंत
वात्सल्याच्या सुगंधाने दर्वळू दे आसमंत

माझ्या चिमणपाखरा, तुझी वाढू दे रे भूक
तुझ्या बोलक्या डोळ्यांत खुळ्या मायेचं कौतूक

तुझी स्वप्नं, तुझा ध्यास, तुझे यत्न व्हावे सार्थ,
तुझी गगनभरारी, माझं आयुष्य कृतार्थ

Sunday, February 28, 2010

काव्य जगावे

हा माझा पहिलाच नवा प्रयत्न. सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल शिफाई यांच्या 'अपने होटोंपर सजाना चाहता हूं' या गझलचा स्वैर भावानुवाद.


ओठांवरती तुज सजवावे
गीतापरि गुणगुणत रहावे

लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे

या विश्वाचे तम मिटवाया,
मी माझे घरटे जाळावे

तुला पुरेसे स्मरून झाले,
अता तरी तू मला स्मरावे

तुझ्या मिठीतच श्वास विरावा,
मरणानेही काव्य जगावे

आणि ही मूळ गझल ::::::::

अपने होटोंपर सजाना चाहता हूं
आ, तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं

कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं

छा रहा है सारी बस्ती में अंधेरा,
रोशनी को घर जलाना चाहता हूं

थक गया हूं करते करते याद तुझको,
अब तुझे मैं याद आना चाहता हूं

आखरी हिचकी तेरे जानों पे आए,
मौत भी मैं शाइराना चाहता हूं

Saturday, February 13, 2010

कडकलक्ष्मी

ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा
आधार नसुनही सावरते डोलारा

विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी,
अंगात खणाची ठिगळांची काचोळी

काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती,
अन् अंश आणखी एक उपाशी पोटी

सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले,
ओढीत चालते माय पाय थकलेले

पदपथी सावली हेरुन बसली खाली
टेकले देव, पोरांना खाऊ घाली

तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा
हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा

कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला,
केसांचा बुचडा मानेवर रुळलेला

चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ,
अनवाणी पायी छमछमणारे चाळ

दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली,
लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली

हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला,
घातले साकडे, कौल लावि देवाला

हातात उतरली कडकलक्षुमी नियती,
आसूड ओढते उघड्या पाठीवरती

क्षण एक गर्दिचे काळिज लक्कन हलले
जणु फटक्यांचे वळ मनामनावर उठले

संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली,
पसरता हात त्याने, माघारी वळली!

Sunday, February 7, 2010

धोका

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
अन्‌ घराला एकही नाही झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

Friday, February 5, 2010

चांदण्या



दंवाचं अत्तर सांडून विझल्या
पहाटे पहाटे चांदण्या निजल्या

सांज कलताना एकेक चांदणी
हळू उतरली रात्रीच्या अंगणी
लुकलुकताना गालात हासल्या

चंद्र पुनवेचा उतरे पाण्यात
मालकौंस जसा सुरेल गाण्यात
सुरांच्या धारांत सचैल भिजल्या

रात्रीने सांडल्या माळता माळता
वेलींत लपल्या कळ्यांशी खेळता
सावळ्या भुईने पदरी वेचल्या



Tuesday, January 26, 2010

अंगाई



नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी
सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी

या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे?
गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे
रुणुझुणू या घाग-यांचा नाद रोखी श्रीहरी

गोड अंगाई तुला ही रातराणी ऐकवी
              मंद हिंदोळ्यात बाळा चंद्र हलके जोजवी            
अजुनि तुझिया लोचनी का जाग बाकी श्रीहरी?

ओठ इवले मुडपुनी का रुससि लटके तान्हुल्या?
खुदुखुदू हससी क्षणातच, चांदण्या जणु सांडल्या!
साद देती का तुला रे स्वप्नपाखी श्रीहरी?

Thursday, January 14, 2010

वाट चुकवेल वाट

पुन्हा नवी धून छेड, जुने राग गाऊ नको
वाट चुकवेल वाट, वळणांनी जाऊ नको

रानवारा अंगणात, गुणगुणेल कानात,
तुला वेळूच्या बनात बोलावेल; जाऊ नको

धुंद केवड्याचे रान, गंधमुग्ध पान पान,
हरपून गेले भान, असे वेड लावू नको

माझ्या भाळी गोंदले तू गर्द पळसाचे ऋतू
भावबंधाचे हे सेतू ओलांडून जाऊ नको

येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून?
काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको

नको घाई, जरा थांब; पावसात चिंब चिंब
ओंजळीत चार थेंब, टिपून ते घेऊ नको

Thursday, January 7, 2010

ओझी

आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी
खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी?

रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा
उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा
तोही राही कुठे आता? जग झाले अनोळखी

पाय-यांना ओलांडून थेट शिखराचा ध्यास
वेड्या पतंगासारखा उंच जाण्याचा हव्यास
जाग येते तेव्हा दशा होते पिसाटासारखी

बोल समजुतीचेही खुपतात जसे काटे
गणगोत, आप्त-मित्र कुणी आपले न वाटे
पिता प्रेमाचा भुकेला, माय मायेला पारखी

अपयश सोसवेना, येते पदरी निराशा
कुणी जाणून घेईना मूक आक्रोशाची भाषा
काही क्षणांची वेदना होते आयुष्याची सखी

उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस?
प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास
असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी?

Tuesday, January 5, 2010

ती

ती समीप माझ्या येते, निसटुन जाते
मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते

ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना
जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना
संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते

तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा
तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा
ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते

मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही
ते मनासारखे कधीच उमटत नाही
ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते

ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी,
ती कविता, आराधना, साधना माझी
निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते

Friday, January 1, 2010

चंद्र खुणावतो



पुन्हा पौर्णिमेचा चंद्र खुणावतो
पुन्हा तेच भास, जीव नादावतो,
पुन्हा चांदण्यांचा रासरंग दारी,
पुन्हा श्वासातला गंध वेडावतो

पुन्हा सांज होते आतुर, कातर
पुन्हा मनामध्ये स्मृतींचा जागर
जसा भरतीच्या लाटांनी सागर
उफाळून आकाशात झेपावतो

पुन्हा तेच स्वप्न जागते लोचनी
हुरहूर तीच भांबावल्या मनी,
धुंद निशिगंध रात्रीच्या अंगणी
चांदणे पेरून मला बोलावतो

पुन्हा जीव गुंतलेला त्या क्षणांत,
सूर बासरीचे घुमती प्राणांत
पुन्हा पुन्हा माझ्या मनदर्पणात
सजण होऊन चंद्र डोकावतो