Thursday, January 7, 2010

ओझी

आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी
खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी?

रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा
उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा
तोही राही कुठे आता? जग झाले अनोळखी

पाय-यांना ओलांडून थेट शिखराचा ध्यास
वेड्या पतंगासारखा उंच जाण्याचा हव्यास
जाग येते तेव्हा दशा होते पिसाटासारखी

बोल समजुतीचेही खुपतात जसे काटे
गणगोत, आप्त-मित्र कुणी आपले न वाटे
पिता प्रेमाचा भुकेला, माय मायेला पारखी

अपयश सोसवेना, येते पदरी निराशा
कुणी जाणून घेईना मूक आक्रोशाची भाषा
काही क्षणांची वेदना होते आयुष्याची सखी

उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस?
प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास
असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी?

4 comments:

  1. क्रान्ति जीवनाच्या लढाईचे अतीरेकी ओझे झेलणारे कोवळे जीव.... तुझी ही कविता त्या सगळ्यांना समर्पित झालीये गं. अतिशय दु:ख होते हे सारे पाहून.

    ReplyDelete
  2. स्पर्धा आणि जिवघेणे आयुश्य,
    निर्माण होतं पण सारं करित नाहिसं.


    खुप ह्रुदयस्पर्शी आनि तितकीच सत्य

    ReplyDelete