Thursday, January 14, 2010

वाट चुकवेल वाट

पुन्हा नवी धून छेड, जुने राग गाऊ नको
वाट चुकवेल वाट, वळणांनी जाऊ नको

रानवारा अंगणात, गुणगुणेल कानात,
तुला वेळूच्या बनात बोलावेल; जाऊ नको

धुंद केवड्याचे रान, गंधमुग्ध पान पान,
हरपून गेले भान, असे वेड लावू नको

माझ्या भाळी गोंदले तू गर्द पळसाचे ऋतू
भावबंधाचे हे सेतू ओलांडून जाऊ नको

येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून?
काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको

नको घाई, जरा थांब; पावसात चिंब चिंब
ओंजळीत चार थेंब, टिपून ते घेऊ नको

2 comments:

  1. क्रांती मतल्यानिच जीव घेतला ग!
    पुढंच सगळ्च नको अगदिच आवश्यक :) आवडली जबरद्स्त

    ReplyDelete