Saturday, September 25, 2010

लाडक्या लेकीसाठी

सदैव माझ्या अवतीभवती नाचतेस तू
मनात माझ्या काय? मनाने वाचतेस तू

घरकुल इवले उजळत आलिस सोनपावली
लेक लाडकी, माझी आशा, सखी, सावली
दर्पणातली माझी प्रतिमा भासतेस तू

हिरवा चाफा दरवळतो तू रुणझुणताना
टपटपती प्राजक्तफुले तू गुणगुणताना
बकुळीच्या नाजुक गंधातुन हासतेस तू

कधी माय होते माझी अन मलाच जपते
मुसमुसते कधि, हलके माझ्या कुशीत लपते
गुपीत काही हळूच सांगुन लाजतेस तू

उदास होते, जेव्हा मी माझी ना उरते
आठवणींचे आभाळ नकळत भरते, झरते
थेंब थेंब अन पापणीमध्ये साचतेस तू

5 comments:

 1. छान.. मला पण लेकच असल्याकारणाने अधिकच भिडली तुमची कविता. टीवी वर कधीही कन्यादान सुरु झालं कि एकदम गलबलतंच! :)

  ReplyDelete
 2. वा क्रांति, आईच्या भावना अगदी नेमक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेस. माझ्या आईलासुद्धा कदाचित असंच काहीतरी वाटत असेल.

  ReplyDelete
 3. सुंदर कविता.. खुपच भावस्पर्शी.. शेवटचं कडवं खूप आवडलं

  ReplyDelete
 4. हिरवा चाफा दरवळतो तू रुणझुणताना
  टपटपती प्राजक्तफुले तू गुणगुणताना
  बकुळीच्या नाजुक गंधातुन हासतेस तू
  Beautiful !

  ReplyDelete
 5. आई आणि मुलीच्या प्रेमाच नातं
  हळुवारपणे उलगडत गेलय.... छान !

  ReplyDelete