Wednesday, October 20, 2010

थांबावे का?

थेंब थेंब डोळ्यांत साठते,
सुख जन्माचे उरी दाटते,
या घटकेला असे वाटते,
इथेच सगळे संपावे का?

जे लाभे ते भाग्य भोगले,
ते केले, जे कधि न योजले,
किति मैलांचे दगड मोजले,
या वळणावर थांबावे का?

किती ग्रीष्म, किति शिशिर पेलले,
वर्षाघन रंध्रांत झेलले
शारदचांदणभूल खेळले,
इतके येथे गुंतावे का?

फुलासारखे भार वाहिले,
वास्तवातही स्वप्न पाहिले,
अजून किति मुक्काम राहिले?
नकोच आता, थांबावे का?

6 comments:

 1. कविता छान आहेच. वाढदिवशी सिंहावलोकन करत होतीस की काय? त्याचीच झलक जाणवते आहे, या कवितेत.

  ReplyDelete
 2. BinaryBandya™ आणि कांचन, धन्यवाद.
  होय कांचन. खरंच आहे तुझं म्हणणं. असंच काहीसं वाटतंय अलिकडे.

  ReplyDelete
 3. छान आहे कविता....

  ReplyDelete
 4. हृदयाला भिडणारी, मनात कालवाकालव करून जाणारी सुंदर कविता.

  ReplyDelete