Wednesday, October 27, 2010

वेणा

आतून उमलते काही, घुसमटते, पण प्रसवेना
छळतात जिवाला कधिच्या, सृजनाच्या फसव्या वेणा
गर्भात अंकुरे तेव्हा आभाळनिळाई झरली
रंध्रांतुन फुटल्या लाटा, गात्रांतुन वीज लहरली
हासले, उमलले, फुलले, आतल्या आत मोहरले
अन् तिथेच गुंतुन गेले, त्या काळोखाला भुलले
गुंत्यात जीव गुंतावा, इतके गुंतावे का रे?
विझतील अंतरामधले अस्फुट, अव्यक्त धुमारे
आतल्या आत हुंकारे, "मज व्यक्त व्हायचे आहे,
कुणि कवाड उघडुन द्या रे, मज मुक्त व्हायचे आहे!"
भेदून कवच डोकावे, चांदणी जशी उमलावी,
आभाळ मोकळे व्हावे, की नीरगाठ उकलावी
जरि धूसरसे, अधुरेसे, पूर्णत्वाने प्रकटेना,
मन हलके, तृप्त, निवांत अन् धन्य, सार्थ त्या वेणा!

3 comments:

  1. अप्रतिम ..

    सृजनाच्या फसव्या वेणा

    आवडली कविता

    ReplyDelete
  2. आतल्या आत हुंकारे, "मज व्यक्त व्हायचे आहे,
    कुणि कवाड उघडुन द्या रे, मज मुक्त व्हायचे आहे!"


    So simple, yet so beautiful!
    हे तूच लिहू शकतेस!

    ReplyDelete
  3. “आतल्या आत हुंकारे …….
    …….धन्य, सार्थ त्या वेणा !”
    अतिशय आशयपूर्ण
    मनाचं कवाड उघडून भाव मुक्त होतात, काव्य प्रसवतं
    आणि त्या वेणा खरच सार्थकी लागतात.

    सुंदर अभिव्यक्ती

    ReplyDelete