Saturday, January 8, 2011

टाळले सार्‍या दिशांनी

टाळले सार्‍या दिशांनी सांगणे माझे
आणि झाकोळून गेले चांदणे माझे

हारला तो डाव, त्याची चूक ही नाही,
चूक होती डाव त्याचा मांडणे माझे!

ऐन मध्यान्हीच गेला सूर्य अस्ताला,
त्या क्षणाला सिद्ध झाले थांबणे माझे

जाणत्यांनी जाणले नाही, न जाणे का?
जाणिवांचा उंबरा ओलांडणे माझे!

मी तुला भेटून येताना मुकी होते
रात्र माझी, चंद्र माझा, चांदणे माझे!

कोणत्या माझ्या चुकीची ही सजा आहे,
दैव एका वादळाशी बांधणे माझे?


क्रांति

3 comments:

  1. दैव एका वादळाशी बांधणे माझे?!
    भिडली.

    ReplyDelete
  2. “कोणत्या माझ्या चुकीची ही सजा आहे,
    दैव एका वादळाशी बांधणे माझे? “

    ………. हृदयस्पर्शी

    ReplyDelete
  3. ज्याचे त्याचे प्राक्तनच...

    ऐन मध्यान्हीचा गेला सूर्य अस्ताला,
    त्या क्षणाला सिध्द झाले थांबणे माझे

    भाव अचूक...

    ReplyDelete