Tuesday, January 11, 2011

ती थकलेली, झुकलेली

ती थकलेली, झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी
भाळावर सुरकुतलेल्या, धूसरशा प्राक्तनओळी

अनवट रागांचे पलटे, सळसळत्या अवघड ताना
कधि गुणगुणते, कधि गाते ती सहज न कळत्या ओळी

कधि म्हणते, "माझी सगळी वाटेत हरवली गाणी,
तू तुझ्यापासली दे ना, मी भरून घेते झोळी"

मातीत शोधते काही, वाकला देह वाकवुनी
पुसता म्हणते, "स्वप्नांची चिवडते राखरांगोळी!"

एकदा म्हणाली, "पोरी, देशील चितेला अग्नी?
झालीच तशीही आहे या अस्तित्वाची होळी!"

"का असे बोलसी बाई? काळीज चरकते, दुखते!"
"हे दु:खच जन्म घडविते, जागविते आशा भोळी"


ती कुणीच माझी नसते, तरिही माझ्यातच असते,
त्या निर्विकार नजरेने माझ्यातच माझी होळी!

3 comments:

  1. "ती कुणीच माझी नसते, तरिही माझ्यातच असते,"

    या ओळीमुळे कविता कुठच्या कुठे एकदम उंचीवर जाते. ....Gr8

    ReplyDelete