Wednesday, February 2, 2011

तुझा दोष नाही


तुझ्या पातिव्रत्यास अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही
खरे नेहमी भोगती हीच शिक्षा, तुझा दोष नाही!
तुझ्या सोबतीला कुणीही न येथे, तुझा आसरा तू,
तुझ्या सावलीला तुझी ना प्रतिक्षा, तुझा दोष नाही
तुझा धर्म मानव्य, त्याला नसे आकृतीबंध काही,
नसे ग्रंथ, ना चौकटी की न दीक्षा, तुझा दोष नाही!
तुझ्या मुक्त काव्यातही छंद आहे, खुला बंध आहे
कुणा लेख वाटो, कुणाला समीक्षा, तुझा दोष नाही!
दिली लक्ष्मणाने तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही!
तुझी तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा तूच कैदी,
तुझा तू गुन्हा अन् तुझी तूच शिक्षा, तुझा दोष नाही?

5 comments:

  1. >>तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही

    हे आवडल. पण ..

    ReplyDelete
  2. “तुझी तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा तूच कैदी,
    तुझा तू गुन्हा अन् तुझी तूच शिक्षा, तुझा दोष नाही”

    …… Hats off

    ReplyDelete
  3. दिली लक्ष्मणाने तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
    तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही
    खरंय,संस्कृती कुणासाठी?नाही पाळली तर दोषाचे पातक!मुक्ती मात्र नाही.

    ReplyDelete
  4. दिली लक्ष्मणाने तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
    तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही!

    अप्रतिम आहे..

    ReplyDelete