Sunday, May 22, 2011

सोयरीक

तुला वेदनांचा छळ, तुला यातनांचा जाच
भोग मागल्या जन्मीचे म्हणतात ग यालाच!

आगीतून फुफाट्यात तुझा चालतो प्रवास
जानकीचा चौदा वर्षं, तुझा जन्म वनवास!

नशिबाच्या गुर्‍हाळात जीव सोसतो काहिली,
तुझं आयुष्य चिपाड, गोडी गुळाला राहिली

विरी गेलेल्या पिठाची भाकरी, तसा संसार,
किती आधण ओतलं, तरी कडा फाटणार!

तुला व्यथेचा शेजार, तुझा भोगांचा आजार
जिथंतिथं मांडू नये त्याचा दरिद्री बाजार!

जरी नाठाळ जखमा करतात जवळीक,
तरी भरल्या डोळ्यांना नाही घालायची भीक

तुझा असंगाशी संग, जरी प्राणांशीच गाठ,
तरी आल्या दिवसाला नको दाखवू ग पाठ

तुझा दु:खाशी घरोबा, दुर्दैवाशी जवळीक,
तोलामोलाच्याच घरी व्हायची ना सोयरीक?

1 comment:

  1. “तुझा दु:खाशी घरोबा दुर्दैवाशी जवळीक
    तोलामोलाच्याच घरी व्हायची ना सोयरीक”
    ….. नेहमीप्रमाणेच हा जबरद्स्त शेवट
    आणि अर्थातच मस्त कविता…. Hats off

    ReplyDelete