Saturday, July 9, 2011

ती वादाला घाबरते!


कुणी म्हणे "ती खुळीच आहे! संवादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!
चर्चांचा पाऊस रंगतो, ती छत्रीतच बसुन रहाते
गलेलठ्ठ परिसंवादांचे द्वंद्व, धुमाळी दुरुन पहाते
कुणी म्हणे, "निर्बुद्ध, मठ्ठ ती, आस्वादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!
इवल्याशा कोशात स्वतःच्या गुंतुन करते काहीबाही
प्रवाहात झोकून द्यायचे तिला कधीही जमले नाही
कुणी म्हणे, "भित्री मुलखाची, उन्मादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!
समारंभ, सोहळे, मैफली याच्यापासुन अलिप्त असते,
तिच्याभोवती दाहक, जाचक रुढी-प्रथांचे कुंपण असते
कुणी म्हणे, "भलतीच घमेंडी, प्रतिसादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!

3 comments:

  1. aprateem.
    Kavita khupach aavadlee
    Majhyaa vyaktimatvaala bhidlee

    ReplyDelete
  2. :-)जे 'वाद' घालायचं टाळतात, त्यांना पाहून हळू हळू 'वाद' देखील घाबरायला लागतो. सर्व मूर्ख टाळकी अगदी त्याच्या प्रेमाची माणस आहेत .

    ReplyDelete