Saturday, July 30, 2011

देणगी

दैवयोगे देणगी दोघांस काही लाभली,
चांदणे त्याला, मला त्या चांदण्याची सावली

वेढता त्याच्या दिठीने जागल्या संवेदना,
जाणिवा झंकारल्या अन् स्पंदने नादावली

बोललो जागेपणी झोपेत बोलावे तसे,
काल झाली भेट ती स्वप्नातली का वाटली?

ही फुले, ही वेल कुठली? गंध नवखा कोणता?
बोलला, "कविता तुझी बागेत माझ्या लावली!"

मी म्हणाले, "भेट काही तू मला नाही दिली"
एक गाणे ठेवले, अन् मूठ माझी झाकली!

1 comment:

  1. मस्त गझल
    "ही फुले ही वेल कुठली गंध नवखा कोणता
    बोलला कविता तुझी बागेत माझ्या लावली"
    ..... फारच छान

    ReplyDelete