Tuesday, August 9, 2011

भटियार

पहाटवारा सांगत होता हळूच कानी,
"इथे-तिथे विखुरल्या चांदण्या वेचत आलो
अन् वेलींच्या कुशीत त्यांना ठेवत आलो
पानाफुलांच्या रांगोळ्या मी रेखत आलो
मंजुळवाणी किलबिलगाणी छेडत आलो"

पहाटवारा सांगत होता दडून  पानी,
"रात्री रडल्या कळ्या, आसवे दहिवर झाली
स्फुंदुन स्फुंदुन गालांवर चढलेली लाली
परागात अन् पाकळ्यांमध्ये उतरून आली
खुलली, हसली आणि कळ्यांची फुलेच झाली!"

पहाटवारा सांगत होता तुझ्या सुरांनी,
"जाता जाता चंद्राने गंधार मांडला
अलगद रिषभाभवती कोमल नूर सांडला
षड्ज, निषाद लहरता मध्यम त्यांत दंगला
पंचम, धैवत गुंफत बघ भटियार रंगला"


2 comments:

  1. व्वा, बराच आहे कि हा पहाट वारा. भटियार नवाच राग वाटतं कधी ऐकलं नव्हतं नाव.

    ReplyDelete
  2. आशाताई, भटियार हा खूप प्राचीन राग आहे, मारवा थाटातला, पहाटेचा राग. वक्र चलन असलेला हा राग तसा अवघड असल्याने कमी ऐकायला मिळतो, पण बरीच सुंदर गाणी आहेत या रागावर आधारलेली. काया ही पंढरी, मुरलीधर घनश्याम सुलोचन, अर्थशून्य भासे, उघडी द्वार पूर्वदिशा, तसंच ऐ दिलरुबा नजरे मिला आणि राष्ट्रीय साक्षरता अभियानच्या जाहिरातीत असलेलं पूरब से सूर्य उगा ही सगळी या रागातली गाणी.

    ReplyDelete