Read more: http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/07/scrolling-background.html#ixzz1TVwTdHIr अग्निसखा: वसा

Monday, December 5, 2011

वसा

कुणा माहिती काल होतो कसा ?
मला मीच ना आठवे फारसा !

प्रवाहातल्या ओंडक्यासारखा
किती दूर वाहून आलो असा

दगा देतसे सावलीही मला
भरोसा करावा कुणाचा कसा ?

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !

खरा चेहरा दाखवू पाहता
चरे पाडले, फेकला आरसा

नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा ?

उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !

1 टिप्पणी(ण्या):

  1. छान .... अगदी सहजतेने उतरलेली
    "खुळ्या पावसाच्या ....." हे फार आवडलं.

    ReplyDelete