Monday, October 31, 2011

हार

तसेही न्यायचे काहीच नाही पार जाताना
तुला देईन मी सारे तुझे साभार जाताना

जरा पाहून एकाकी जिवाला घेरती छाया
निराधारास या देशील का आधार जाताना ?

अरे, आता उपेक्षेच्या व्रणांना लिंपले होते,
नको मारूस प्रेमाने, कशाला वार जाताना ?

विसंवादीच होते ना तुझेही सूर माझ्याशी,
जुळावी आज का माझ्या मनाची तार जाताना ?

जरी वाटेत त्याच्या आर्जवांनी घातल्या हाका,
नको, नाहीच आता घ्यायची माघार जाताना

मिळावी ना फुकाची वाहवा, होती अपेक्षा ही
अपेक्षाभंग व्हावा, एवढा सत्कार जाताना ?

पुरे आयुष्य काट्यांनी जरी जोपासले होते,
मिळाले केवढे सारे फुलांचे हार जाताना !

Saturday, October 29, 2011

तुझी आठवण


मनात भरते एक रितेपण
संध्याकाळी तुझी आठवण

तुझी धावती भेट अचानक,
मोहरलेले ते अपुरे क्षण

वरवरचे ते कुशल सांगणे,
उदास तूही, उदास मी पण !

गूज मनीचे मनी राहिले,
कसले ते अधुरे संभाषण ?

निरोप घेता मळभ दाटले
धूसरले क्षितिजाचे अंगण

अवचित येणे, नकळत जाणे
असे जसे वळवाचे शिंपण !

तुझ्याचसाठी कातरवेळी
अजुन बरसतो नयनी श्रावण

हळव्या रात्री चंद्र जागतो
तुझ्या स्मृतींचे घेउन दर्पण !

- क्रांति

[मायबोली हितगुज दिवाळी अंक २०११ इथे पूर्वप्रकाशित]

Friday, October 28, 2011

काही सुचले नाही तेव्हा

काही सुचले नाही तेव्हा
नाव तुझे कोरले ढगांनी
आभाळाच्या निळ्या पटावर

काही सुचले नाही तेव्हा
काहीबाही बोलत बसले,
कधी मनातिल, कधी मनावर

काही सुचले नाही तेव्हा
प्रवाहात सोडल्या लकेरी,
बुडून गेली सुरांत घागर

काही सुचले नाही तेव्हा
पापणीत अडवून ठेवला
उफाळणारा प्रशांत सागर

काही सुचले नाही तेव्हा
गुंफायाला दिले मनाला
आठवणींचे मणी पसाभर

काही सुचले नाही तेव्हा
दोघे दोन दिशांना वळले,
पुनव फिकटशी, चंद्र अनावर 

Saturday, October 22, 2011

हरवून जायचे का?

ये, चांदण्यात थोडे हरवून जायचे का?
झाकोळल्या स्मृतींना उजळून घ्यायचे का?

मागे कधीतरी हे तारे मुठीत होते
साधेच बोलणेही तेव्हा सुनीत होते
डोळ्यांत भावनांचे हळुवार गीत होते
त्या लोपल्या सुरांना मिळवून गायचे का?

स्पर्शात पारिजाताचा मुग्ध भास हळवा
ती तरल स्पंदने अन् प्रत्येक श्वास हळवा
होता परस्परांचा सहवास खास हळवा
तो काळ साद देतो, परतून जायचे का?

भावूक आर्जवांची होती सुरेल गाणी
लाडीक विभ्रमांची ती आगळी कहाणी
आता उरे दुरावा, डोळ्यांत थेंब पाणी
हास्यात आसवांना बदलून द्यायचे का?

सुख पाहिले जरासे, मन मोहरून गेले
तेही क्षणांत दोघांना ठोकरून गेले
वाळूत बांधलेले घर ओसरून गेले
चल, शिंपले स्मृतींचे जमवून न्यायचे का?

[पूर्वप्रकाशन - मोगरा फुलला ई-दिवाळी अंक २०११]

Thursday, October 20, 2011

आई

निदा फ़ाजली यांच्या कवितेचा स्वैर भावानुवाद

ज्वारीची ताजी भाकर, वर खमंग चटणी तशीच आई
चूल-बोळकी, पोतेरे, सांडशी, फुंकणी तशीच आई

कळकाच्या खाटेवर लेटुन कानोसा घे जाता-येता
जाग-निजेच्या सीमेवरची दुपार थकली, तशीच आई

चिमण्यांचा चिवचिवाट घुमवी राधेकृष्णा, अल्ला-हो-अक्बर
आरवता कोंबडा घराची कडी निखळती तशीच आई

बहीण, शेजारीण, बायको, लेक अशी विखुरली एकटी,
दिसभर दोरीवरुन चालते पोर गोमटी तशीच आई

दिला वाटुनी तोंडवळा, डोळे अन् कोठे स्वतः हरवली
जीर्ण, जुन्याशा अल्बमातली अल्लड मुलगी तशीच आई


आणि ही मूळ कविता

बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ ,

याद आता है चौका-बासन, चिमटा फुँकनी जैसी माँ ।


बाँस की खुर्री खाट के ऊपर हर आहट पर कान धरे ,

आधी सोई आधी जागी थकी दुपहरी जैसी माँ ।


चिड़ियों के चहकार में गूँजे राधा-मोहन अली-अली ,

मुर्गे की आवाज़ से खुलती, घर की कुंड़ी जैसी माँ ।


बीवी, बेटी, बहन, पड़ोसन थोड़ी-थोड़ी सी सब में ,

दिन भर इक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी मां ।


बाँट के अपना चेहरा, माथा, आँखें जाने कहाँ गई ,

फटे पुराने इक अलबम में चंचल लड़की जैसी माँ ।



निदा फाजली

Sunday, October 9, 2011

धर्मशाळा

काळ काही गूढ सांगे, ते इशारे ओळखावे हे बरे
राहिले काही न सांगावे असे, मी मूक व्हावे हे बरे

गोठले ओठांत काही, आटले डोळ्यांत काही भाबडे
भाव ते जाणून कोणी घ्यायच्या आधी झरावे, हे बरे

गोपिकांना गुंगवी जो, तोच पार्था कर्मदीक्षा देतसे,
भावना-कर्तव्य यांचे पारडे समतोल व्हावे, हे बरे

बंधने झाली सुखाची आणि आशा वाट रोखाया उभी
आज साऱ्या त्या तुटाव्या शृंखला, बेबंद व्हावे हे बरे

आळवावे मी तुला छेडून वीणा आर्ततेने ज्या क्षणी
दैवयोगे त्या क्षणी माझ्या सभोती तू असावे हे बरे

श्वास कोंडावा तसे संदिग्धसे दाटून आलेले धुके
ओसरावे, कोसळावे, मोकळे आभाळ व्हावे हे बरे

ही कुडीची धर्मशाळा सोडण्याची वेळ आली वाटते,
पाखराने पिंजऱ्याचा मोह त्यागावा, उडावे हे बरे !

Sunday, October 2, 2011

उबारा


ज्या क्षणी सोडले किनाऱ्याला, 
वादळे धावली सहाऱ्याला 

झेप ही आजची, उद्यासाठी 
एक खोपा हवा निवाऱ्याला

चूक होती तुझ्या बटांचीही,
बोल लावू नकोस वाऱ्याला ! 

सांडले सौख्य ओंजळीमधले
मी कसे वेचणार पाऱ्याला?

सावली स्थान जाणते माझे,
ग्रासते नेमक्याच ताऱ्याला! 

गोठला जन्म, या क्षणी लाभो 
कूस मृत्यू तुझी उबाऱ्याला