Thursday, November 24, 2011

रथ

दारे जरी सुखाची कुणि लावतोच आहे
निर्धार नित्य माझा समजावतोच आहे,
'तोडून कुंपणांना भरधाव तू पुढे जा'
माझ्या मनोरथांचा रथ धावतोच आहे !

ओंकार

आहे वसती जिथे सदाचाराची
आभा विलसे तिथे निराकाराची
माती तिथली पवित्र लावू भाळी
दीप्ती पसरे तिथेच ओंकाराची 

Tuesday, November 22, 2011

दाद

मौनातला संवाद मी
आभाळवेडी साद मी
संगीत अज्ञातातले
त्याचा अनाहत नाद मी

माझ्यातली मी कल्पना
माझ्यातली मी भावना
माझी मला मी वाचते
घेते सुखे आस्वाद मी

हळुवार माझी स्पंदने
अदृश्य माझी बंधने
नियमांत नियमित बांधले
तरिही कधी अपवाद मी

माझ्याच रंगी रंगते
कैफात माझ्या झिंगते
जे वेड हृदये जिंकते,
ते वेड, तो उन्माद मी

भरतीतली ना लाट मी
घाटातली ना वाट मी
निद्रिस्त मी ज्वालामुखी
जागेन तर उच्छाद मी

उस्फूर्त, उत्कट भाव हे
सृजनात जडले नाव हे
त्याने दिलेली संपदा,
त्या कौतुकाची दाद मी 

Monday, November 21, 2011

संचारबंदी

व्यथेच्या पहाऱ्यात आनंद बंदी
तटाभोवती यातनांची शिबंदी

खुशालीत मी, दु:ख वाढीव लाभे
भले विश्व सोसेल दुष्काळ, मंदी

जगावे कसे? श्वास कैदेत आहे
मरावे कसे? जीव देण्यास बंदी

खुलासे नको रे, दिलासाच दे ना
जरा ऐक आक्रंदने मुक्तछंदी

फुले त्रासलेली, कळ्या गांजलेल्या
उदासीन झाडे, ऋतू जायबंदी

कुणी कापले दोर माघारण्याचे?
कडेलोट व्हावा, अशी ही बुलंदी

मनाच्या महाली सदाची अशांती,
किती वाढवू रोज संचारबंदी ?

Sunday, November 20, 2011

धुके

वेढून जिवाला कसले दाट धुके,
आभास सुखाचे, फसवे भास फुके
वाऱ्यासह येती चकवे का भलते ?
नित्याचिच आहे, तरिही वाट चुके !

आर्त

घेऊन करांत आसवांची जपमाळ
मी रोज तुला स्मरून हा कंठिन काळ
जाईन इथून त्या क्षणाला तू दिसशील,
स्वीकार अबोल आर्त, हे दीनदयाळ !

संग

हा बंध कधी जुळला, नकळे
हा छंद कधी जडला, नकळे
मी मोहरले सुकता सुकता,
की संग तुझा घडला, नकळे !

काच

ज्याला जितके मिळायचे, सर्व मिळेल
जेव्हा अवधी सरेल, काही न उरेल
काचेस किती जरी जिवापाड जपाल,
हातून अजाणता अनायास फुटेल 

करुणा

काळोख तुझ्या मनातला आज सरेल
एकेक चिरा प्रकाश लेवून सजेल
जाता उजळून वाट आशा फुलतील,
त्याची करुणा तुझ्याच दारात झरेल !

वाऱ्यावरची वरात

श्वासासरशी नवीनवीशी वळणे
वाटेवर या अटीतटीचे पळणे
हे जीवन की वरात वाऱ्यावरची ?
गात्रे थकता क्षणाक्षणाला ढळणे !

जे ते सरले

पाण्यावरचे तरंग कोणी जपले?
ज्योतीवर ते पतंग वेडे जळले
काळापुढती कुणी न जाई कधिही,
काही नसते अभंग, जे ते सरले !

Saturday, November 19, 2011

असेल

आभाळ ढगांच्या कह्यात आहे? असेल
झाकोळ धुक्याचे उदास आहे? असेल
संगीत सरींचे असेल दु:खी, भकास
माझे मन आहे सुखात, आहे, असेल !

अज्ञाताचा खेळ

हातात नसे वेड्या काळाचा मेळ
जो तो जपतो का ज्याची-त्याची वेळ ?
होईल कधी कोणाचा येथे नाश,
जाणे न कुणी हा अज्ञाताचा खेळ !

खुशाल

तू आंदण आभाळाला माग खुशाल
पी सूर्यकणांची सारी आग खुशाल
घेऊन श्रमांची ओझी चालुन वाट,
रात्री सृजनाच्या स्वप्नी जाग खुशाल 

शिकारी

आयुष्य दिवास्वप्नांचा पेटारा
झाकून किती ठेवावा तो सारा ?
आलाच शिकारी काळाचा पक्षी
रात्री-दिवसा कानोसा घेणारा !

रंग नवा

येणार पुन्हा येथे बेभान हवा
सांभाळ तुझ्या आशेचा मंद दिवा
जाईल तुफानाची संपून तृषा,
तेव्हाच मनाला दे तू रंग नवा


Thursday, November 17, 2011

पुन्हा नव्याने

मनाप्रमाणे घडी बसावी पुन्हा नव्याने
जुनीच नाती जुळून यावी पुन्हा नव्याने

कणाकणाला कवेत घेण्या बहार यावी,
सुक्या डहाळीत जान यावी पुन्हा नव्याने

अजूनही ती तिच्यात नाही, अलिप्त आहे
तिला तिची ओढ जाणवावी पुन्हा नव्याने

पुन्हा घुमावी खुळावणारी सुरेल गाणी,
अबोल वाणीस जाग यावी पुन्हा नव्याने

कुणास ठावे, असेल काही मनात त्याच्या,
मलाच माझी कथा कळावी पुन्हा नव्याने

निळ्या नभाचे ठसे-वसे ओंजळीत यावे,
दयाघनाची कृपा झरावी पुन्हा नव्याने

नकोनकोसा प्रवास येथेच थांबवावा,
हवीहवीशी दिशा धरावी पुन्हा नव्याने !

Monday, November 7, 2011

माग


त्या सावळ्या सख्याचा कोठून माग घ्यावा ?
शब्दांत शोधता मी अर्थात तो असावा !

यमुना, कदंब, धेनू, नवनीत, रासलीला
का मोरपीस अजुनी कुरवाळते दिठीला 
मनगोकुळात घुमतो त्याचा सुरेल पावा 

ते रूप लाघवी मी काव्यात गुंतवावे
तालासुरांत त्याला गुंफून नित्य गावे
वाटे, परी उडे तो भारी खट्याळ रावा !

माळून कौतुकाने वेणीत चांदराती 
मी वाटुली पहावी उजळून नेत्रवाती 
तो खोडसाळ वारा, दारावरून जावा !

भासात मी जगावे, ध्यासात दंग व्हावे
लावून आस वेडी ज्योतीपरी जळावे
त्याने उगा छळावे, करुनी कुटील कावा 

असतो सभोवताली तरिही कुठे दिसेना
माझ्याच अंतरी तो, नेत्रांत का ठसेना ?
स्वप्नात भेटणारा सत्यात का नसावा ?

[मराठी कविता समूहाच्या ई-दिवाळी अंक-२ मध्ये पूर्वप्रकाशित]

Friday, November 4, 2011

भेटते, हरवून जाते

भेटण्याच्या चाहुलींनी एवढी हरखून जाते,
रोज त्याच्या कल्पनांना भेटते, हरवून जाते

आसमंती धून मुरलीची, मनाने गोकुळी मी
भेटलो जेथे कधी, तेथे पुन्हा जाते खुळी मी
मोरपंखी आठवांना भेटते, हरवून जाते

लाजवंती प्रीत माझी स्वप्नझूला झुलत जाई
रंगुनी हलकेच हाती हळुहळू जी खुलत जाई
शकुनमेंदीच्या क्षणांना भेटते, हरवून जाते

सप्तरंगी धुंद गीते घेरती अलवार वेळी
तन तरंगे, मनहि रंगे चांदण्याच्या धुंद मेळी
राजवर्खी सावल्यांना भेटते, हरवून जाते