Sunday, December 30, 2012

विरती संध्याकाळ

मी सूर नवे वेचून
ताल माळून
गुंफल्या गाठी
साधली मनापासून
हवीशी धून
बंदिशीसाठी

अर्थांची वळणे घेत
शब्दवाटेत
हरवली गाणी
फिरले त्यांच्या समवेत
अखेर कवेत
उदास विराणी

लय शोधित रानोमाळ
प्राण घायाळ
तरी मन गाते
मी विरती संध्याकाळ
मुके आभाळ
सोडुनी जाते 

Thursday, December 27, 2012

जीवनगाणे

नकोस रडव्या सुरांत सांगू
जिणे निरर्थक स्वप्नच असते
अर्धजागृती मृतवत आत्मा,
जसे दिसे ते तसेच नसते

जीवन वास्तव आणि चेतना
सरण न अंतिम ध्येय तयाचे
माती असशी, मातित मिळसी
भय आत्म्यास न या वचनाचे

केवळ सुख वा दु:ख अनन्वित,
दैवदत्त थांबा न वाट ही
उद्या दूरवर आजपासुनी,
वावरताना असो जाण ही

कला चिरंतन, काळ धावता
दृढता, शौर्य असे जरि चित्ती,
मृत्यूची चाहूल जागवित
मंद नगारे अखंड घुमती

विशाल विश्वाच्या समरांगणि,
तात्पुरता तळ आयुष्याचा
नकोस दुबळे बनू कोकरू,
नायक हो तू संघर्षाचा

उद्या मोहविल, नको विसंबू
गतकाळाची नको आठवण
मनापासुनी आज जगुन घे,
ईश्वर पाही आकाशातुन

चरित्र थोरांचे हे सांगे
उन्नत जीवन अपुल्या हाती
असे जगावे की गेल्यावर
चरणखुणांना जपेल माती

चरणखुणा, ज्या वाट दावतिल
कोण्या एकाकी पथिकाला
असो निराश्रित वा दुर्दैवी,
देतिल हिम्मत, धैर्यहि त्याला

सिद्ध होउनी कर्म करू या
स्वीकारुन जे पडेल पदरी
कष्ट कधी ना होती निष्फळ,
असे प्रतिक्षा साधना खरी !

**********************
आणि ही मूळ रचना
**********************
A Psalm of Life
Tell me not in mournful numbers,
Life is but an empty dream!
For the soul is dead that slumbers,
And things are not what they seem.

Life is real! Life is earnest!
And the grave is not its goal;
Dust thou are, to dust thou returnest,
Was not spoken of the soul.

Not enjoyment, and not sorrow,
Is our destined end or way;
But to act, that each tomorrow
Find us farther than today.

Art is long, and Time is fleeting,
And our hearts, though stout and brave,
Still, like muffled drums, are beating
Funeral marches to the grave.

In the world's broad field of battle,
In the bivouac of Life,
Be not like dumb, driven cattle!
Be a hero in the strife!

Trust no Future, howe'er pleasant!
Let the dead Past bury its dead!
Act, - act in the living Present!
Heart within, and God o'erhead!

Lives of great men all remind us
We can make our lives sublime,
And, departing, leave behind us
Footprints on the sand of time;

Footprints, that perhaps another,
Sailing o'er life's solenm main,
A forlorn and shipwrecked brother,
Seeing, shall take heart again.

Let us then be up and doing,
With a heart for any fate;
Still achieving, still pursuing,
Learn to labor and to wait. 


Wednesday, December 19, 2012

विणकर मित्रा!

गुलजारजींच्या यार जुलाहे या कवितेच्या स्वैर भावानुवादाचा तोकडा प्रयत्न


कसब मलाही शिकव जरासे विणकर मित्रा! 

नित्य पाहिले विणताना तू 
तुटला अथवा सरला धागा 
बांधुन किंवा नवीन जोडुन
सहजी विणसी उरलेला पट
तरी तुझ्या वस्त्रात कुठेही 
कुणा न दिसला जोड गाठीचा 
किंवा धागा नाही निसटला 
किती सफाई अन् हातोटी,
गुंतुन जाती धागे-गाठी 

एकदाच मी विणले होते 
एकच नाते, विणकर मित्रा,
स्वच्छ, टचाटच दिसती त्याच्या 
सगळ्या गाठी, विणकर मित्रा ..................

कसब मलाही शिकव जरासे विणकर मित्रा........
**********************
आणि ही मूळ कविता
**********************
यार जुलाहे
मुझको भी तरक़िब सिखा कोई यार जुलाहे ...


अक्सर तुझको देखा हैं के ताना बुनते ... 
जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ ...
फिरसे बांध के और सिरा को जोड के उस में...
आगे बूनने लगते हो ...
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गांठ गिरा बुंतर की, देख नही सकता हैं कोई

मैने तो एक बार बुना था एक हि रिश्ता ...
लेकिन उसकी सारी गीरहें साफ नजर आती हैं .. मेरे यार जुलाहे

मुझको भी तरक़िब सिखा कोई यार जुलाहे ..........................


गुलजार 

Tuesday, December 18, 2012

मनमानी


कळाहीन केसांत माळते रंग उतरली फुले बेगडी
स्वत:च्याच बिंबावर भाळुन हसत रहाते कुणी बापडी

बागेमधल्या नळाखालती निवांत करते मुखप्रक्षालन
स्वस्थपणाने बाकावर मग चालतसे सौंदर्यप्रसाधन

जुनाट, विटक्या बटव्यामधली दातमोडकी फणी काढते
पारा उडल्या काचेच्या तुकड्यात पाहुनी केस बांधते

निळी असावी कधी ओढणी, जरी दिसतसे कळकटलेली
ओढुन घेते मुखावरुन ती, जशी परिणिता कुणि नटलेली

हळूच हसते, जरा लाजते, नजर झुकविते करून तिरकी
गुणगुणते तंद्रीतच आणिक स्वतःभोवती घेते गिरकी

कोण, कुणाची, असेल कुठली, फिरे कशी होऊन उन्मनी?
दैव, भोग की अतर्क्य नियती, असे कुणाची ही मनमानी?

तिला मात्र ना ध्यान, भान वा चिंता, वार्ता, जाणहि नाही
'काल' विसरली, 'आज' जगे अन् 'उद्या'पासुनी अलिप्त राही !

Friday, December 14, 2012

फेनफुले

उन्हे पांगली
जरा थांबली
संध्येच्या या प्रहरावरती
खुळी सावली
जरी लांबली
उरली केवळ अस्तापुरती

घरे चिमुकली
वाळूवरली
पोटी घेउन गेली भरती
नेत्री भरली
स्मरणे झरली
उंच झावळ्यांवर भिरभिरती

केशरलाली
स्वर्णमाखली
फेनफुले उमलती नि विरती
पुन्हा आपली
वाट विसरली
क्लांत पाउले परत न फिरती 

Wednesday, December 12, 2012

शरदमोहिनी

Henry Wadsworth Longfellow यांची Autumn शीर्षकाची ही रचना एक सुनीत आहे. [१४ ओळी] 
या रचनेचा अनुवाद करण्याचा माझा अल्पसा प्रयत्न 

आगमनाची तुझिया शरदा भाट वरुण देतो ललकारी 
झुळुझुळु वारा ध्वज फडकवितो तेजस्वी स्वर्णिम जरतारी
समरकंदच्या तलम, मुलायम मखमालीहुन अधिक चमकते
डौलदार वृषभांची जोडी रथास तुझिया शोभुन दिसते

सार्वभौम सम्राट जसा तू स्वर्णपुलावर उभा राहसी
सुदीर्घ बाहू उंचावुन जणु धरेस अवघ्या आशिष देसी
भव्य तुझ्या साम्राज्यामधल्या शेत-मळ्यांना, वृक्ष-झऱ्यांना
चैतन्याने भारुन देसी पर्वतराजी आणि दऱ्यांना

दीर्घकाळ नभघुमटाच्या वळचणीत दडला चंद्र रुपेरी
तुझ्यासंगती ढाल असावी, तसा चकाकत गगनि विहारी
स्वीकारत सोपान उतरसी कृषीवलांच्या नम्र प्रार्थना
यज्ञामधल्या अग्निशिखांसम सळसळत्या तृणधान्य अर्चना

आगमनाप्रीत्यर्थ तुझ्या अन् तुझ्यामागुनी दूत समीरण
तुझ्या स्वागतासाठी करतो सुवर्णपर्णांची बघ पखरण

मूळ रचनाकार : Henry Wadsworth Longfellow

स्वैर भावानुवाद : क्रांति
------------------------------------------

आणि ही मूळ कविता

Thou comest, Autumn, heralded by the rain,
With banners, by great gales incessant fanned,
Brighter than brightest silks of Samarcand,
And stately oxen harnessed to thy wain!
Thou standest, like imperial Charlemagne,
Upon thy bridge of gold; thy royal hand
Outstretched with benedictions o'er the land,
Blessing the farms through all thy vast domain!
Thy shield is the red harvest moon, suspended
So long beneath the heaven's o'er-hanging eaves;
Thy steps are by the farmer's prayers attended;
Like flames upon an altar shine the sheaves;
And, following thee, in thy ovation splendid,
Thine almoner, the wind, scatters the golden leaves!

Tuesday, December 11, 2012

माझ्या कविता

मी एकलीच अन् भवती माझ्या दुर्लक्षित कविता 
कधि कुणी वाचल्या नव्हत्या माझ्या बहुचर्चित कविता ! 

अर्थाविण भरकटलेल्या, लय-ताल-सूर विरलेल्या
शब्दांनी जखमी झाल्या माझ्या भयकंपित कविता

जे लिहावयाचे होते, राहून मनातच गेले
उतरल्या कागदावरती माझ्या अनपेक्षित कविता

ज्या आशयघन होत्या त्या शर्यतीत मागे पडल्या,
अन् बाजी मारुन गेल्या माझ्या अतिरंजित कविता

ना तेज उरे प्रतिभेचे, ना चमचम शब्दकळेची
उल्का होऊन गळाल्या माझ्या तारांकित कविता

लिहिलेल्या मीच तरीही परक्याच्या का वाटाव्या?
का ओळख विसरुन गेल्या माझ्या अतिपरिचित कविता?

वाटेवर आयुष्याच्या घायाळ कधी मी होता
आधार द्यायला आल्या माझ्याच उपेक्षित कविता ! 

Saturday, December 8, 2012

भय

निष्पर्ण, रिते सांगाडे
सोसते भुई पाचोळा
भणभणता वारा सांगे
'आल्या परतीच्या वेळा'

करपली कधी हिरवाई,
धुरकटे निळाई केव्हा?
भडकतो सूर्य ज्वाळांनी,
उसळतो दिशांतुन लाव्हा

तडफडणाऱ्या वाटांनी
पायांना जखमा केल्या
फिरतात सावल्या काळ्या
स्मरणांच्या हिरमुसलेल्या

भय जगण्याचे, मरणाचे
भय असण्याचे-नसण्याचे
चकव्यातुन सुटता सुटता
दलदलीमधे फसण्याचे

भयग्रस्त, विषण्ण मना रे,
भयमुक्त कसे मी व्हावे?
नभ काजळता क्षितिजाशी,
सरणाचे पाय धरावे 

Thursday, December 6, 2012

शपथ

नवी शपथ घ्यायची, विसरुनी जुनी जायची 
दिले वचन पाळण्या हरघडी मुभा घ्यायची 
असेच फसवून साध्य करतात हेतू कुणी 
कुणी शपथपूर्तता करि जिवा पणा लावुनी 

कितीक शपथा जसे बुडबुडे तशा लोपल्या 
कितीक पण पत्थरावर खुणा तशा राहिल्या 
जरी उलटली युगे, विसरले कधी ना कुणी 
अशाच शपथा अभंग उरल्या जनी-जीवनी 

स्वराज्य घडवायला, स्वजन रक्षिण्या झुंजला 
स्मरून परमेश्वरास शिवबा उभा ठाकला 
लहान वय ते, महान मनिषा जपूनी मनी 
निरागस जनांस मुक्त करण्यास दास्यातुनी 

अधर्म दिसता जरी निजगृही त्वरे ताडिती 
असे जमविले सखे, सहज प्राण जे अर्पिती
मुखे वचन येत ते सफल पूर्तता होउनी
अशाच शपथा विराट असती अनंताहुनी 


वृत्त - पृथ्वी 

Monday, December 3, 2012

कठीण

सांभाळण्यास आता मोठे कठीण झाले
दु:खे जुनीच होती, नाते नवीन झाले !

तू एक दूर होता मी एकटीच नाही,
आभाळ, चंद्र, तारे सारेच दीन झाले

निष्पाप थेंब होते शिंपीत पापण्यांच्या,
ओघात वाहताना खारे, मलीन झाले

लावायचा मुलामा, खोटे हसावयाचे
मी भूमिकेत माझ्या केव्हा प्रवीण झाले ?

आयुष्य फक्त माझे, माझेच मानले मी,
मृत्यूस भेटता ते त्याच्या अधीन झाले

माझ्या नभास उंची का भावली नसावी?
केव्हा क्षितीज झाले, केव्हा जमीन झाले ! 

Sunday, December 2, 2012

अभेद्य

माझ्या अभेद्य मनाचा
निखळतो चिरा चिरा
फटींतून उधाणतो
तुझ्या स्मरणांचा वारा

मोडकळला चौथरा,
उंबऱ्याला अवकळा
उडे कळसाचा रंग,
सुन्न, विषण्ण गाभारा

भंगलेल्या शिल्पांतल्या
छिन्नविच्छिन्न आकृती,
तशी विखुरली स्वप्ने
घालतात येरझारा

भर मध्यान्हीचं ऊन
अस्थींवर पांघरून
रिता निष्पर्ण प्राजक्त
शोधे प्राणांचा उबारा

वठलेल्या फांदीवर
तुझ्या शपथेचा पक्षी
मोडलेल्या वचनांची
आर्त भैरवी गाणारा 

Tuesday, November 27, 2012

माया [माझी माय]


ती माया आहे 
नाव सार्थ करणारी
अमाप माया देणारी, निखळ, निर्व्याज प्रेम देणारी 
भावंडंलेकरंभाचरं, मैत्रिणीशेजार-पाजार,

झाडं,फुलंपाखरंमुकी जनावरं 
सगळ्यांना आपल्या मायेनं जिंकणारी 
प्रेमाच्याआपुलकीच्या धाग्यात बांधणारी 
माया 
ती सरोजही आहे 
लोभमोहद्वेषअसूयामत्सरआसक्ती 
भांडणंहेवेदावे यांनी भरलेल्या जगाच्या कर्दमात उमलूनही
या साऱ्यांपासून पूर्णपणे अलिप्त असलेली,
निर्मळ, सोज्वळ, सात्विक, धार्मिक
अगदी विपरीत परिस्थितीत सुद्धा हसतमुखानं फुलणारी
आणि आपल्या अस्तित्वाचा मंद सुगंध उधळत
सभोवतालचा आसमंत प्रफुल्लित करणारी
सरोज

आणि ती वसुधा सुद्धा आहे
क्षमाशील, सोशिक, प्रेमळ,
सगळ्यांचे सगळे अपराध पोटात घालणारी,
कटू अनुभवांचे, संकटांचे, वेदनांचे ज्वालामुखी
खोलवर दडपून
रसिकतेनं, आशेचे, आनंदाचे, समाधानाचे अंकुर रुजवत
समृध्दीची, उल्हासाची, चैतन्याची बाग फुलवणारी
वसुधा

माथ्यावरच्या तिच्या सावलीचं छत्र हेच आमचं पूर्वसंचित!
जिच्या ऋणात राहणंही भाग्याचं,
जिच्या एकेका रूपाची, एकेका गुणाची
गाथा-पोथी व्हावी
अशा आईची किती, कशी महती गावी?
एकच मागणं देवाच्या चरणी,
जन्मोजन्मी हीच माउली आम्हाला लाभावी!

प्रकाशमान


काळ्या, खिन्न, उदास, कातर किती अंधारलेल्या दिशा 
काळोखात दडून व्याकुळ उभी धास्तावलेली निशा 
येती सांद्र वनात दाट गहिऱ्या अदृष्टशा सावल्या,
जीवाला छळती भयावह स्मृती अतृप्त, वेड्यापिशा

कोणी बालक खेळणे भिरकवी जे आवडीचे नसे 
वा कोणी कचरा पुरा झटकुनी कोन्यात लावीतसे
किंवा जीर्ण, विदीर्ण वस्त्र मळके टाकून देई कुणी 
डोळ्यांदेखत दैव ओढुन मला गर्तेत फेकी तसे 

जावा झाकुन चंद्र मेघवलयी, मीही तशी राहिले 
अत्याचार अनंत सोसुन किती आघातही साहिले 
वक्रोक्ती, उपहास, व्यंग, कटुता, आरोप अन् वंचना 
यांनी मूढ, उदास होउन जरी या जीवना पाहिले 

झाला आज प्रकाशमान पथ हा, अंधार गेला लया 
जन्मापासुन जे मनात वसले, मी त्यागिले त्या भया 

[मराठी कविता समूहाच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित]

Sunday, November 25, 2012

द्विधा

राजा रविवर्मा यांच्या एका सुंदर चित्रावरून सुचलेली ही कविता ..... [हे चित्र माझी लाडकी मैत्रीण माधवी भट हिच्याकडून मिळालंय]

आहे मनात काही, सांगू कसे सख्या रे 
ही भेट चोरटी अन् माझी स्थिती द्विधा रे 

कुरवाळुनी फुलाला बघते पुन्हा पुन्हा मी
जे अंतरात येते दावू कसे तुला मी?
नयनांत लाज वेडी, पाहू कशी तुला रे?

तू मात्र न्याहळीसी, लवते न पापणीही
एकांत हा अनोखा, भवताल ना कुणीही
मन बावरे तरीही बुजते जरा जरा रे

पाहील का कुणी ही भीती मनात दाटे,
क्षणसंग या घडीला फुटतील लाख फाटे
वाटे तरी हवासा सहवास हा तुझा रे 

Saturday, November 17, 2012

फाईल

एक भली मोठी फाईल गहाळ झालीय म्हणे.
त्याच्या मृत्युपत्राची.
त्याचं मृत्युपत्र? आणि तेही भलीमोठी फाईल होण्यासारखं? खरंच असेल हे?
तो तर एक भणंग कवी, आत्ममग्न, मनस्वी, एकटा, अगदी एकटा. 
आपल्याच धुंदीत जगणारा, मस्तमौला. 
एकटा असला तरी एकाकी नसलेला.
मातीच्या कुशीत लोळत आकाशातल्या ताऱ्यांशी गुजगोष्टी करणारा.
किनाऱ्यावरच्या कातळावर रेलून ओहोटीच्या लाटांशी अंताक्षरी खेळणारा.
फुलांच्या कानांत भुंग्याची चोरटी गुपितं सांगणारा.
अवखळ बालकानं साबणाच्या फेसाचे फुगे बनवून 
आपल्याच नादात उडवत जावेत, तसे 
भावनांच्या द्रावणात स्वप्नांची नळी बुचकळून 
हलकीशी फुंकर घालत तरल, हळुवार, सुंदर कवितांचे 
सप्तरंगी फुगे उडवत जाणारा. 
नजरा खिळवून ठेवणारे लहानमोठे असंख्य फुगे!

अंगानं अन् खिशानंही फाटका,
पण प्रतिभेची अचाट, अफाट श्रीमंती लाभलेला तो कवी. 
पायांखालची जमीन जराही हलू न देता आभाळाहून उंच झालेला.
काय लिहिलं असेल त्यानं आपल्या मृत्युपत्रात?
त्याच्या मोहिनी मंत्रानं भारलेल्या कवितांची मालकी? 
कुणाला दिली असेल?
त्याच्या अमोघ, अद्वितीय प्रतिभेचा वारसाहक्क?
कुणाच्या नावे केला असेल तो?
कुणाला सांगितला असेल त्याच्या अनन्यसाधारण शब्दसंपदेचा ठावठिकाणा?
त्याच्या अमर्याद, उत्कट प्रतिमांच्या खजिन्याची किल्ली 
कुणाच्या वाट्याला आली असेल?
हेच सारं असेल त्यात की आणखी काही असेल?

की मृत्युपत्र नसेलच त्या फाइलमध्ये? 
इतरच काही असेल त्यानं लिहिलेलं?
त्याच्या ऋतूंशी रंगलेल्या कानगोष्टींची टाचणं,
रात्र-रात्र चंद्राशी चालणाऱ्या गजालींची टिपणं, 
माणसातला माणूस शोधताना त्यानं गोळा केलेले पुरावे, 
त्याच्या दिव्यत्वाशी होणाऱ्या गाठीभेटींचे व्यापक संदर्भ,
की असेल त्याची आणखी एखादी अलौकिक दीर्घ कविता,
त्या जगाच्या गूढ वाटेवर निघता निघता सुचलेली?
असलीच, तर कशी असेल ती? 
तरल, आर्त, व्याकुळ, हळवी, उदात्त, विलक्षण, अभूतपूर्व,
जी वाचून वाटावं की बस! इथून पुढे काहीही वाचायचं नाही! 
[तशा त्याच्या सगळ्याच कविता अशा विस्मयचकित करणाऱ्या, जागीच खिळवून ठेवणाऱ्या असतात.]

तर मृत्युपत्र, की त्याच्याच काही खास गोपनीय गोष्टी की कविता?
काय असेल त्या फाईलीत? शोध घ्यायलाच हवा!
खरंच गहाळ झाली असेल ती? कशी, कुठं, कधी?
कुणी घेतली असेल? कशासाठी?
की त्यानंच नेली असेल कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून? 
आता तर ती फाईल मिळायलाच हवी आहे!
मग त्यासाठी तो गेला, त्याच वाटेनं जावं लागलं तरी चालेल,
ती फाईल शोधणं आवश्यक आहे! 

अलख

हा अलख कुणा जोग्याचा
ही गहन कुणाची वाणी
प्राणांच्या कंठी रुजली
संध्यापर्वाची गाणी

झाकोळुन नभ गंगेच्या
पाण्यात उतरले थोडे
क्षितिजाच्या पार निघाले
अन् सूर्यरथाचे घोडे

या मूक उदास जलावर
धूसर वलये वाटोळी
रेखाटत बसली कुठल्या
कवितेच्या अनवट ओळी?

ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे
ते वन सोडून निघाले
अज्ञात दिशेला रावे

ढळत्या सांजेच्या पदरी
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी
अन् अलख घुमवितो वारा

 [मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी कविता]

Monday, November 12, 2012

अलिप्त

पानावरच्या दवबिंदूपरि अलिप्त मी
माझ्यातच असुनी माझ्यातुन विभक्त मी

तृप्तीनेही तृषा न भागे कधी कधी
अतृप्तीच्या काठावर शांत, तृप्त मी

आहे तरिही नाही माझी अशी स्थिती,
आसक्तीची वस्त्रे लेवुन विरक्त मी

जातानाचे संचित हाती न मावते,
येताना परि आलेली रिक्तहस्त मी

धन्यवाद ईश्वरा तुला द्यायचे कसे?
बंधांचे ऋण असूनही बंधमुक्त मी

Wednesday, November 7, 2012

मुक्तछंद


गुन्हा मी न केला, तरी घेरती व्यर्थ दावे किती 
विरोधात माझ्या उभे ठाकले हे पुरावे किती

धडे जीवनाने कितीदा दिले, जाण नाही दिली,
कुठे थांबवावे, कधी संपवावे, जगावे किती ?

निराळ्या दिशेच्या नव्या गूढ वाटा मला लाभल्या,
कळेना खऱ्या त्यातल्या कोणत्या अन् भुलावे किती

किती वेगळाल्या रिती-पद्धतींनी करू मांडणी ?
उरे शून्य हाती, सुखाला सुखाने गुणावे किती ?

पुन्हा तेच ते प्रश्न अन् उत्तरांच्या चुका त्याच त्या,
यथायोग्य जे, तेच सांगायला मी शिकावे किती?

असावे जरासे जिणे मोकळे मुक्तछंदापरी,
सदा वृत्त, मात्रांत, खंडांत त्याला चिणावे किती ?

Tuesday, November 6, 2012

माझ्या ठायी

यावेळी अनुवादासाठी आकृष्ट करून गेली कृष्णबिहारी 'नूर' यांची एक सुंदर गझल.

आग, जल, हवा, माती सारे माझ्या ठायी 
तरी मानणे देवहि आहे माझ्या ठायी

माझ्यातुन वगळून मला माझ्यात दडे जो,
आता केवळ तो सामावे माझ्या ठायी

तळमळणाऱ्या अपुऱ्या इच्छांपरी विखुरलो,
काय शोधतो तो केव्हाचे माझ्या ठायी ?

वसंत, वर्षा, शिशिर, ग्रीष्म, हेमंत, शरद मी 
सध्या कुठला ऋतू न जाणे, माझ्या ठायी !

काय असे मी, दर्पण केवळ हेच सांगते 
का न दाखवी जे जे आहे माझ्या ठायी ?

'नूर' जीव हा देणे केवळ बाकी आहे, 
प्रेम किती तुज कसे कळावे माझ्या ठायी ?


आणि ही मूळ रचना

आग है, पानी है, मिट्टी है, हवा है, मुझ में| 
और फिर मानना पड़ता है के ख़ुदा है मुझ में| 

अब तो ले-दे के वही शख़्स बचा है मुझ में,
मुझ को मुझ से जुदा कर के जो छुपा है मुझ में| 

मेरा ये हाल उभरती हुई तमन्ना जैसे, 
वो बड़ी देर से कुछ ढूंढ रहा है मुझ में|

जितने मौसम हैं सब जैसे कहीं मिल जायें, 
इन दिनों कैसे बताऊँ जो फ़ज़ा है मुझ में| 

आईना ये तो बताता है के मैं क्या हूँ लेकिन, 
आईना इस पे है ख़मोश के क्या है मुझ में| 

अब तो बस जान ही देने की है बारी ऐ "नूर", 
मैं कहाँ तक करूँ साबित के वफ़ा है मुझ में| 

__कृष्ण बिहारी 'नूर' 

Wednesday, October 31, 2012

शहर

सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांच्या पंजाबी कवितेचा संपूर्णसिंह यांनी केलेला हिंदी अनुवाद वाचला आणि ती कविता मनात घुमत राहिली. तिला आपल्या शब्दांत उतरवण्याचा मोह नेहमीप्रमाणेच आवरला नाही. 


माझं शहर एखाद्या लांबलचक, कंटाळवाण्या चर्चेसारखं

निरर्थक, रटाळ युक्तीवादांसारखे रस्ते,
आणि गल्ल्या-----------
जसं कुणी एकाच गोष्टीला तावातावानं खेचत न्यावं 
कधी या दिशेनं तर कधी त्या दिशेनं ........
त्वेषात वळलेल्या मुठी असाव्यात, तशी घरं, 
दात-ओठ खात कचकचणाऱ्या भिंती 
आणि वाद घालून तोंडातून फेस यावा, 
तशा गटारी अन् नाले 

सूर्योदयाबरोबरच सुरू झालेली ही चर्चा 
जी त्याला पाहून अजून गरम होत जाते, 
तापत जाते 
आणि मग प्रत्येक दाराच्या तोंडातून 
शिव्यांची लाखोली यावी,
तशी निघणारी सायकली आणि दुचाक्यांची चाकं
आणि एकमेकांच्या अंगावर आवेशात धावून जाणारे 
त्यांचे कर्णकर्कश्य पोंगे आणि घंट्या यांचे आवाज 

या शहरात जन्म घेणारं प्रत्येक मूल विचारतं
'कसली चर्चा सुरू आहे ही?'
मग त्याचा तो प्रश्न एका नव्या चर्चेला जन्म देतो 
चर्चेतून निघणारा आणि चर्चेत फिरणारा प्रश्न 

शंखांचे, घड्याळांचे कोरडे श्वास, 
रात्र येते, डोकं बडवते आणि निघून जाते 
पण चर्चा झोपेतही सुरूच रहाते

माझं शहर एका अंतहीन चर्चेसारखं आहे! 

ही मूळ कविता 

शहर – अमृता प्रीतम 

मेरा शहर एक लम्बी बहस की तरह है
सड़कें – बेतुकी दलीलों सी…
और गलियां इस तरह
जैसे एक बात को कोई इधर घसीटता
कोई उधर
हर मकान एक मुट्ठी सा भिंचा हुआ
दीवारें-किचकिचाती सी
और नालियां, ज्यों मूंह से झाग बहती है
यह बहस जाने सूरज से शुरू हुई थी
जो उसे देख कर यह और गरमाती
और हर द्वार के मूंह से
फिर साईकिलों और स्कूटरों के पहिये
गालियों की तरह निकलते
और घंटियां हार्न एक दूसरे पर झपटते
जो भी बच्चा इस शहर में जनमता
पूछता कि किस बात पर यह बहस हो रही?
फिर उसका प्रश्न ही एक बहस बनता
बहस से निकलता, बहस में मिलता…
शंख घंटों के सांस सूखते
रात आती, फिर टपकती और चली जाती
पर नींद में भी बहस खतम न होती
मेरा शहर एक लम्बी बहस की तरह है….

Saturday, October 27, 2012

आसवांनी घात केला

वाटले होते छळावे आज माझ्या वेदनेला 
आसवांनी घात केला 

बांधले संधान होते वेदनेने प्राक्तनाशी 
आणि माझ्या स्पंदनांशी 
वाहिली रक्तातुनी ती, पेलताना जन्म गेला 
आसवांनी घात केला 

सोसवेना, साहवेना, भार आता वाहवेना
की मुक्याने राहवेना 
एकला आधार शब्दांचा तिने उध्वस्त केला 
आसवांनी घात केला 

ती तशी माझीच होती, का मला झाली नकोशी?
का सुटायाची असोशी?
'घे तुला सर्वस्व माझे' शब्द मी होता दिलेला 
आसवांनी घात केला 

मी तिला आंजारले-गोंजारले, केली विनंती 
आणि ती गेलीच अंती 
काळजाचा सुन्न ठोकाही तिच्यामागून गेला 
आसवांनी घात केला 

गझल

मतल्यातच काफिये सोडवून,
अलामती उंबरठ्यात अडवून
खूप खूप पुढे निघून गेलेत सारे
एका एका शेरावर वाहवा मिळवत,
मक्त्यावर काळजांच्या पायघड्या तुडवत,
टाळ्यांवर टाळ्यांचे इमले चढवत,
प्रत्येक मैफलीला हातोहात जिंकत
पार अढळपदावर पोहोचले आहेत!

आणि मी?

एकाकी, भरकटलेली रदीफ,
विस्कटलेल्या काफियांची जीवघेणी गुंतागुंत,
चुकत-माकत अखेरीस कोपऱ्यांत दडलेल्या अलामती
यांच्या भकास गोतावळ्यात
सुन्न होऊन बसलेली ...........अजूनही.

गझले,
कधी, कशी, कुठे ग भेटशील मला?

अजून जमीनसुद्धा येत नाहीय दृष्टिपथात!

Tuesday, October 23, 2012

सोहळा

आज माझ्या वेदनेला भेटले 
रक्त झाले आग, अश्रू पेटले
वेदनेशी जोडले नाते खरे
मैत्र झाले ते विखारी, बोचरे

तीव्रतर-तम होत गेली वेदना
जीवघेणा डंख तो उतरेचना
सोसण्याचे उंबरे ओलांडले
मी अखेरी वेदनेशी भांडले

ज्या क्षणी घर वेदनेचे सोडले,
कोवळ्या हसऱ्या सुखाने वेढले
खेळले अन् नाचले ते भोवती
कौतुकाची कौतुके झाली अती

संपली, मेली सुखाची कामना
भावली माझी चिरंतन वेदना
सोस सौख्याचा पुरा झाला कमी
अन् परतले वेदनेपाठीच मी

संपलेसे वाटले ज्या ज्या क्षणी
वेदनेची प्राशिली संजीवनी
वेदनेचा मांडला मी सोहळा
श्वास थांबे, प्राण झाला मोकळा! 

उशीर

नेमकी अशा वेळी येतेस ना! 

उठायला उशीर झालेला असतो, 
चुकलेली असतात सगळी वेळ-काळाची समीकरणं
घड्याळाचे काटे धावत असतात जीव खाऊन 
मॅरेथॉनच्या धावपटूंसारखे 
हात यांत्रिकपणे पोळ्या लाटत असतात, 
निम्मं लक्ष करपू बघणाऱ्या फोडणीत 
अन् निम्मं कामवालीच्या चाहुलीकडे 

तू आलेली असतेस, सगळा गोतावळा घेऊन 
मला जराही वेळ नसतो तुझ्याकडे पहायला सुद्धा!
तुझं तुणतुणं सुरू, 'चल ना ग जरा!
ती बघ औदुंबरावर काय झक्कास मेजवानी रंगलीय.
बुलबुल, चिमण्या, कावळे, हळद्या, पारवे, साळुंक्या
वेडा राघू, पोपट सगळे जमलेत.
आणि गुलमोहराच्या सगळ्यात वरच्या फांदीवरून
भारद्वाज आजोबा लक्ष ठेवताहेत पोरांवर.
आणि ते पाहिलंस?
त्या पिवळ्याधमक पेल्यांतला मध चाखायला
रंगीबेरंगी फुलपाखरं कशी आसुसली आहेत?
चल ना, कशी अरसिक आहेस ग तू!'

मी अगदी निगरगट्टपणे तुझ्याकडे दुर्लक्ष करते,
तू बसतेस फुरंगटून.

मग नेमकी येतेस गाडी चालवताना
कामावर जायला उशीर झालेला,
अडथळ्यांच्या शर्यतीतून वाट काढत चाललेली मी
हात गुंतलेले वेग नियंत्रणात, डोळे वाहत्या रस्त्याला भिडलेले 
आणि डोकं संभाव्य संकटाला तोंड देण्याची पूर्वतयारी करत.

अशा वेळीच तुला सुचतं भलतंसलतं

रस्त्यावर भर चौकात खेळ मांडायच्या तयारीत असलेला डोंबारी
दोरीचे खांब ठोकत असतो
जरा वेळानं अधांतरी दोरीवर चढून
काळजाचा ठोका चुकवणारी कसरत करणार असलेली
त्याची झिपरी चिमुरडी लहानग्या भावाला खेळवत 
फिदीफिदी हसत बसलेली, जराही विचलित न होता!
तुझं लक्ष बरोबर जातं तिच्याकडं.
'बघ न, किती निवांत खेळतेय ती
जराही ताण नाही, भीती नाही,
एवढीशी पोर त्या दोरीवर अधांतरी चालेल,
ढोलकीच्या तालावर तोल सावरेल!
थांब ना, बघू या.'

मी मुकाटपणे गाडी दामटत पुढे निघते.
तुझा फुगा अजून मोठ्ठा!

वेळेवर जाहीर झालेल्या मीटिंगच्या तयारीला उशीर झालेला
कृत्रिम थंडगार हवेतही दरदरून फुटलेला घाम!
निर्जीव फायली, रुक्ष आकडेमोडी, वर्षानुवर्षे अक्षरांची
धाटणी सुद्धा न बदललेले कळाहीन अहवाल
मख्ख चेहऱ्यांनी, जांभया देत ऐकायचं नाटक करणारी
त्रस्त, प्रशस्त माणसं
मधूनच येणारे निरर्थक, चिल्लर प्रश्न,
किती लक्ष आहे दाखवण्यासाठी फेकलेले
अगोड बिस्किटांसोबत बिनसाखरेची कडवट कॉफी

आणि पुन्हा डोकावतेस तू हळूच, गोतावळा घेऊन
'अग, संध्याकाळ झाली ना आता, चल नं गच्चीवर.
रस्त्यापलीकडच्या तळ्यात सोनं सांडलंय
पाखरांनी आकाशात यक्षगान मांडलंय
काठावरच्या मंदिरात सांजवात दोन्ही हात जोडून बसलीय
कळसावरच्या झेंड्याची वाऱ्यासोबत मैफल रंगलीय!'

मी पुन्हा दगड!
निर्जीवपणे टेबलावरचे पसरलेले कागद
गोळा करून फायलीत भरते,
संगणकाच्या पाटीवरची धुळाक्षरे जपते,
कृत्रिम हसून निरोपानिरोपी झाली की
थोडं सुस्तावून हुश्श करते! 
माणसांच्या जगातून बाहेर यायला मला फारच उशीर झालेला असतो 
तोवर तू दूर निघून गेलेली असतेस पार.
पण मी फारसा विचार करत नाही.

पुन्हा थोडा वेळ तीच धावपळ,
यंत्रवत भाजी चिरणारे हात,
भोवतालचा कानोसा घेणारे कान,
डोक्यात वरच्या पंख्यासारखी गरगरणारी
उद्याची गणितं, थकलं शरीर, रिक्त मन
तू सगळं पहात असतेस कुठूनतरी
मूकपणे.

रात्री जरा उशीराच थोडीशी निवांत होऊन तुला बोलावते,
पण तू, हटवादी मुलखाची!
सकाळपासूनच्या तुझ्या आणि
तुझ्या गोतावळ्याच्या हेटाळणीचा वचपा काढतेस
काही केल्या येत नाहीस!
मी तळमळते, तुला आळवत राहाते,
'कविते, ये, ये ना ग. आता मी अगदी एकटी आहे, आणि निवांत!
ये ना, बोलू सगळं काही सकाळपासून मनात दाटलेलं'
पण तू निघून गेलेली असतेस पार रुसून
माझी झोपही घेऊन, पुन्हा न भेटण्यासाठी!

मग मी एकटीच तुझ्या लाडक्या चांदण्या मोजत 
जळत राहाते, विझत राहाते तुझ्या आठवणीत.
कधीतरी अवेळी डोळा लागेल, कशीतरी अर्धीमुर्धी झोप येईल
आणि पुन्हा सकाळी उठायला उशीर!!!!

Sunday, October 21, 2012

उत्तरे

गुंतून मीच जाते कोशात उत्तरांच्या
जेव्हा नव्या समस्या होतात उत्तरांच्या

बिनमोल तेच सारे अनमोल होत गेले,
दे प्रश्न जीवघेणे मोलात उत्तरांच्या !

काही विचारण्याची प्राज्ञा कुठे कुणाची?
वाहून प्रश्न गेले ओघात उत्तरांच्या

का उत्तरे मुकी ते प्रश्नांस आकळेना
की शब्द कैद झाले ओठांत उत्तरांच्या ?

ती उत्तरे अशी की अस्वस्थ प्रश्न झाले,
चक्रावले, बुडाले डोहात उत्तरांच्या !

उलटून प्रश्नचिन्हे गळ टाकुनी बसावे,
का जन्म घालवावा शोधात उत्तरांच्या ?

त्याला तमा न होती या प्रश्न-उत्तरांची,
माझेच प्रश्न होते मोहात उत्तरांच्या

वाचून उत्तरांना मी प्रश्नचिन्ह व्हावे,
दडलेत प्रश्न इतके पोटात उत्तरांच्या ! 

Friday, October 19, 2012

हरवून जाते

भास-आभासात ती तरळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

रोज होते गूढ, कातर सांज थोडी
घालते काही अनाकलनीय कोडी
उत्तरांआधी मला रडवून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

त्याच गुंत्यातून धूसर रात्र येते
चांदण्यांनी ओंजळी सजवून देते
मात्र जाताना दिशा बदलून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

देशकाराची सुरावट छेडताना
पाखरे स्वच्छंद गगना वेढताना
रंगते प्राची, जुई बहरून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

सूर्य होतो स्वर्णवर्खी लख्ख पाते
तापली मध्यान्ह सारंगात न्हाते
सावलीसाठी उन्हे उजळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

अन् पुन्हा ती गूढ कातर सांजछाया
लागते स्वर मारव्याचे आळवाया
त्या क्षणी कविता पुन्हा जवळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते