Thursday, February 9, 2012

अर्पण


ज्यांच्या उन्नत लाटांनी दु:खाला येते भरती 
ही कातरवेळ तुझ्या त्या स्मरणांच्या नावावरती 

सहजीच गुंफले धागे, आता न उकलती गाठी
ही हुरहुर आंदण घे त्या चुटपुटत्या भेटींसाठी

कधि पापण्यांत अडखळते, कधि नकळत झरझर झरते
अलवार तुझ्या स्वप्नांना ते अर्घ्य दान मी करते

ज्या शपथा नाही सुटल्या, त्यांचे हे अस्फुट तारे

वचने न पुरी जी झाली, घे त्यांना व्याकुळ वारे

हृदयाच्या अंतर्हृदयी जपले प्रत्येक क्षणाला
चल, बहाल जन्मभराचे संचित त्या खुळेपणाला

आत्म्याचे परमात्म्याशी, ते तुझे नि माझे नाते
आयुष्य उर्वरित मी त्या नात्याला अर्पुन जाते 

2 comments:

  1. हृदयाच्या अंतर्हृदयी
    जपले प्रत्येक क्षणाला
    चल, बहाल जन्मभराचे
    संचित त्या खुळेपणाला..
    --
    पूर्ण कविता मस्त !

    ReplyDelete
  2. "कधि पापण्यात ...... अर्घ्य दान मी करते" >>> जबरदस्त.

    ReplyDelete