Monday, May 7, 2012

पैल

अडे सूर्याचे पाऊल
सांज थोडी घुटमळे
परतीच्या वाटेवर 
हलकीशी मागे वळे

केशराला गालबोट 
तसे झाकोळून येते 
अशा कातरवेळेला 
जिणे अंगावर येते

सुन्न मनाचे अंगण
नाही क्षणभर रिते
कोन्याकोन्यात तेवती
आठवणींचे पलिते

फूल निर्माल्य होताना
देठ काळजात रुते
जुनी जखम नव्याने
तशी उमलून येते

नको नको वाटे आता
संग घराचा, दाराचा
किती धरणार लोभ
खचणाऱ्या आधाराचा?

वाटे बोलावते कुणी
पार क्षितिजापल्याड
उघडून अज्ञातात
नव्या घराचे कवाड

रात पसरण्याआधी
मला निघायला हवे
काळोखता पापण्यांत
कोण लावणार दिवे?

जरी एकाकी प्रवास,
तरी एकटी मी नाही
थोडे इथेच ठेवते,
सवे नेते खूप काही

श्वास संपता संपता
ऐल सोडण्याच्या क्षणी
पैल प्रवासात माझ्या
सोबतीला आठवणी 

1 comment: