Wednesday, October 31, 2012

शहर

सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांच्या पंजाबी कवितेचा संपूर्णसिंह यांनी केलेला हिंदी अनुवाद वाचला आणि ती कविता मनात घुमत राहिली. तिला आपल्या शब्दांत उतरवण्याचा मोह नेहमीप्रमाणेच आवरला नाही. 


माझं शहर एखाद्या लांबलचक, कंटाळवाण्या चर्चेसारखं

निरर्थक, रटाळ युक्तीवादांसारखे रस्ते,
आणि गल्ल्या-----------
जसं कुणी एकाच गोष्टीला तावातावानं खेचत न्यावं 
कधी या दिशेनं तर कधी त्या दिशेनं ........
त्वेषात वळलेल्या मुठी असाव्यात, तशी घरं, 
दात-ओठ खात कचकचणाऱ्या भिंती 
आणि वाद घालून तोंडातून फेस यावा, 
तशा गटारी अन् नाले 

सूर्योदयाबरोबरच सुरू झालेली ही चर्चा 
जी त्याला पाहून अजून गरम होत जाते, 
तापत जाते 
आणि मग प्रत्येक दाराच्या तोंडातून 
शिव्यांची लाखोली यावी,
तशी निघणारी सायकली आणि दुचाक्यांची चाकं
आणि एकमेकांच्या अंगावर आवेशात धावून जाणारे 
त्यांचे कर्णकर्कश्य पोंगे आणि घंट्या यांचे आवाज 

या शहरात जन्म घेणारं प्रत्येक मूल विचारतं
'कसली चर्चा सुरू आहे ही?'
मग त्याचा तो प्रश्न एका नव्या चर्चेला जन्म देतो 
चर्चेतून निघणारा आणि चर्चेत फिरणारा प्रश्न 

शंखांचे, घड्याळांचे कोरडे श्वास, 
रात्र येते, डोकं बडवते आणि निघून जाते 
पण चर्चा झोपेतही सुरूच रहाते

माझं शहर एका अंतहीन चर्चेसारखं आहे! 

ही मूळ कविता 

शहर – अमृता प्रीतम 

मेरा शहर एक लम्बी बहस की तरह है
सड़कें – बेतुकी दलीलों सी…
और गलियां इस तरह
जैसे एक बात को कोई इधर घसीटता
कोई उधर
हर मकान एक मुट्ठी सा भिंचा हुआ
दीवारें-किचकिचाती सी
और नालियां, ज्यों मूंह से झाग बहती है
यह बहस जाने सूरज से शुरू हुई थी
जो उसे देख कर यह और गरमाती
और हर द्वार के मूंह से
फिर साईकिलों और स्कूटरों के पहिये
गालियों की तरह निकलते
और घंटियां हार्न एक दूसरे पर झपटते
जो भी बच्चा इस शहर में जनमता
पूछता कि किस बात पर यह बहस हो रही?
फिर उसका प्रश्न ही एक बहस बनता
बहस से निकलता, बहस में मिलता…
शंख घंटों के सांस सूखते
रात आती, फिर टपकती और चली जाती
पर नींद में भी बहस खतम न होती
मेरा शहर एक लम्बी बहस की तरह है….

Saturday, October 27, 2012

आसवांनी घात केला

वाटले होते छळावे आज माझ्या वेदनेला 
आसवांनी घात केला 

बांधले संधान होते वेदनेने प्राक्तनाशी 
आणि माझ्या स्पंदनांशी 
वाहिली रक्तातुनी ती, पेलताना जन्म गेला 
आसवांनी घात केला 

सोसवेना, साहवेना, भार आता वाहवेना
की मुक्याने राहवेना 
एकला आधार शब्दांचा तिने उध्वस्त केला 
आसवांनी घात केला 

ती तशी माझीच होती, का मला झाली नकोशी?
का सुटायाची असोशी?
'घे तुला सर्वस्व माझे' शब्द मी होता दिलेला 
आसवांनी घात केला 

मी तिला आंजारले-गोंजारले, केली विनंती 
आणि ती गेलीच अंती 
काळजाचा सुन्न ठोकाही तिच्यामागून गेला 
आसवांनी घात केला 

गझल

मतल्यातच काफिये सोडवून,
अलामती उंबरठ्यात अडवून
खूप खूप पुढे निघून गेलेत सारे
एका एका शेरावर वाहवा मिळवत,
मक्त्यावर काळजांच्या पायघड्या तुडवत,
टाळ्यांवर टाळ्यांचे इमले चढवत,
प्रत्येक मैफलीला हातोहात जिंकत
पार अढळपदावर पोहोचले आहेत!

आणि मी?

एकाकी, भरकटलेली रदीफ,
विस्कटलेल्या काफियांची जीवघेणी गुंतागुंत,
चुकत-माकत अखेरीस कोपऱ्यांत दडलेल्या अलामती
यांच्या भकास गोतावळ्यात
सुन्न होऊन बसलेली ...........अजूनही.

गझले,
कधी, कशी, कुठे ग भेटशील मला?

अजून जमीनसुद्धा येत नाहीय दृष्टिपथात!

Tuesday, October 23, 2012

सोहळा

आज माझ्या वेदनेला भेटले 
रक्त झाले आग, अश्रू पेटले
वेदनेशी जोडले नाते खरे
मैत्र झाले ते विखारी, बोचरे

तीव्रतर-तम होत गेली वेदना
जीवघेणा डंख तो उतरेचना
सोसण्याचे उंबरे ओलांडले
मी अखेरी वेदनेशी भांडले

ज्या क्षणी घर वेदनेचे सोडले,
कोवळ्या हसऱ्या सुखाने वेढले
खेळले अन् नाचले ते भोवती
कौतुकाची कौतुके झाली अती

संपली, मेली सुखाची कामना
भावली माझी चिरंतन वेदना
सोस सौख्याचा पुरा झाला कमी
अन् परतले वेदनेपाठीच मी

संपलेसे वाटले ज्या ज्या क्षणी
वेदनेची प्राशिली संजीवनी
वेदनेचा मांडला मी सोहळा
श्वास थांबे, प्राण झाला मोकळा! 

उशीर

नेमकी अशा वेळी येतेस ना! 

उठायला उशीर झालेला असतो, 
चुकलेली असतात सगळी वेळ-काळाची समीकरणं
घड्याळाचे काटे धावत असतात जीव खाऊन 
मॅरेथॉनच्या धावपटूंसारखे 
हात यांत्रिकपणे पोळ्या लाटत असतात, 
निम्मं लक्ष करपू बघणाऱ्या फोडणीत 
अन् निम्मं कामवालीच्या चाहुलीकडे 

तू आलेली असतेस, सगळा गोतावळा घेऊन 
मला जराही वेळ नसतो तुझ्याकडे पहायला सुद्धा!
तुझं तुणतुणं सुरू, 'चल ना ग जरा!
ती बघ औदुंबरावर काय झक्कास मेजवानी रंगलीय.
बुलबुल, चिमण्या, कावळे, हळद्या, पारवे, साळुंक्या
वेडा राघू, पोपट सगळे जमलेत.
आणि गुलमोहराच्या सगळ्यात वरच्या फांदीवरून
भारद्वाज आजोबा लक्ष ठेवताहेत पोरांवर.
आणि ते पाहिलंस?
त्या पिवळ्याधमक पेल्यांतला मध चाखायला
रंगीबेरंगी फुलपाखरं कशी आसुसली आहेत?
चल ना, कशी अरसिक आहेस ग तू!'

मी अगदी निगरगट्टपणे तुझ्याकडे दुर्लक्ष करते,
तू बसतेस फुरंगटून.

मग नेमकी येतेस गाडी चालवताना
कामावर जायला उशीर झालेला,
अडथळ्यांच्या शर्यतीतून वाट काढत चाललेली मी
हात गुंतलेले वेग नियंत्रणात, डोळे वाहत्या रस्त्याला भिडलेले 
आणि डोकं संभाव्य संकटाला तोंड देण्याची पूर्वतयारी करत.

अशा वेळीच तुला सुचतं भलतंसलतं

रस्त्यावर भर चौकात खेळ मांडायच्या तयारीत असलेला डोंबारी
दोरीचे खांब ठोकत असतो
जरा वेळानं अधांतरी दोरीवर चढून
काळजाचा ठोका चुकवणारी कसरत करणार असलेली
त्याची झिपरी चिमुरडी लहानग्या भावाला खेळवत 
फिदीफिदी हसत बसलेली, जराही विचलित न होता!
तुझं लक्ष बरोबर जातं तिच्याकडं.
'बघ न, किती निवांत खेळतेय ती
जराही ताण नाही, भीती नाही,
एवढीशी पोर त्या दोरीवर अधांतरी चालेल,
ढोलकीच्या तालावर तोल सावरेल!
थांब ना, बघू या.'

मी मुकाटपणे गाडी दामटत पुढे निघते.
तुझा फुगा अजून मोठ्ठा!

वेळेवर जाहीर झालेल्या मीटिंगच्या तयारीला उशीर झालेला
कृत्रिम थंडगार हवेतही दरदरून फुटलेला घाम!
निर्जीव फायली, रुक्ष आकडेमोडी, वर्षानुवर्षे अक्षरांची
धाटणी सुद्धा न बदललेले कळाहीन अहवाल
मख्ख चेहऱ्यांनी, जांभया देत ऐकायचं नाटक करणारी
त्रस्त, प्रशस्त माणसं
मधूनच येणारे निरर्थक, चिल्लर प्रश्न,
किती लक्ष आहे दाखवण्यासाठी फेकलेले
अगोड बिस्किटांसोबत बिनसाखरेची कडवट कॉफी

आणि पुन्हा डोकावतेस तू हळूच, गोतावळा घेऊन
'अग, संध्याकाळ झाली ना आता, चल नं गच्चीवर.
रस्त्यापलीकडच्या तळ्यात सोनं सांडलंय
पाखरांनी आकाशात यक्षगान मांडलंय
काठावरच्या मंदिरात सांजवात दोन्ही हात जोडून बसलीय
कळसावरच्या झेंड्याची वाऱ्यासोबत मैफल रंगलीय!'

मी पुन्हा दगड!
निर्जीवपणे टेबलावरचे पसरलेले कागद
गोळा करून फायलीत भरते,
संगणकाच्या पाटीवरची धुळाक्षरे जपते,
कृत्रिम हसून निरोपानिरोपी झाली की
थोडं सुस्तावून हुश्श करते! 
माणसांच्या जगातून बाहेर यायला मला फारच उशीर झालेला असतो 
तोवर तू दूर निघून गेलेली असतेस पार.
पण मी फारसा विचार करत नाही.

पुन्हा थोडा वेळ तीच धावपळ,
यंत्रवत भाजी चिरणारे हात,
भोवतालचा कानोसा घेणारे कान,
डोक्यात वरच्या पंख्यासारखी गरगरणारी
उद्याची गणितं, थकलं शरीर, रिक्त मन
तू सगळं पहात असतेस कुठूनतरी
मूकपणे.

रात्री जरा उशीराच थोडीशी निवांत होऊन तुला बोलावते,
पण तू, हटवादी मुलखाची!
सकाळपासूनच्या तुझ्या आणि
तुझ्या गोतावळ्याच्या हेटाळणीचा वचपा काढतेस
काही केल्या येत नाहीस!
मी तळमळते, तुला आळवत राहाते,
'कविते, ये, ये ना ग. आता मी अगदी एकटी आहे, आणि निवांत!
ये ना, बोलू सगळं काही सकाळपासून मनात दाटलेलं'
पण तू निघून गेलेली असतेस पार रुसून
माझी झोपही घेऊन, पुन्हा न भेटण्यासाठी!

मग मी एकटीच तुझ्या लाडक्या चांदण्या मोजत 
जळत राहाते, विझत राहाते तुझ्या आठवणीत.
कधीतरी अवेळी डोळा लागेल, कशीतरी अर्धीमुर्धी झोप येईल
आणि पुन्हा सकाळी उठायला उशीर!!!!

Sunday, October 21, 2012

उत्तरे

गुंतून मीच जाते कोशात उत्तरांच्या
जेव्हा नव्या समस्या होतात उत्तरांच्या

बिनमोल तेच सारे अनमोल होत गेले,
दे प्रश्न जीवघेणे मोलात उत्तरांच्या !

काही विचारण्याची प्राज्ञा कुठे कुणाची?
वाहून प्रश्न गेले ओघात उत्तरांच्या

का उत्तरे मुकी ते प्रश्नांस आकळेना
की शब्द कैद झाले ओठांत उत्तरांच्या ?

ती उत्तरे अशी की अस्वस्थ प्रश्न झाले,
चक्रावले, बुडाले डोहात उत्तरांच्या !

उलटून प्रश्नचिन्हे गळ टाकुनी बसावे,
का जन्म घालवावा शोधात उत्तरांच्या ?

त्याला तमा न होती या प्रश्न-उत्तरांची,
माझेच प्रश्न होते मोहात उत्तरांच्या

वाचून उत्तरांना मी प्रश्नचिन्ह व्हावे,
दडलेत प्रश्न इतके पोटात उत्तरांच्या ! 

Friday, October 19, 2012

हरवून जाते

भास-आभासात ती तरळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

रोज होते गूढ, कातर सांज थोडी
घालते काही अनाकलनीय कोडी
उत्तरांआधी मला रडवून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

त्याच गुंत्यातून धूसर रात्र येते
चांदण्यांनी ओंजळी सजवून देते
मात्र जाताना दिशा बदलून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

देशकाराची सुरावट छेडताना
पाखरे स्वच्छंद गगना वेढताना
रंगते प्राची, जुई बहरून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

सूर्य होतो स्वर्णवर्खी लख्ख पाते
तापली मध्यान्ह सारंगात न्हाते
सावलीसाठी उन्हे उजळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

अन् पुन्हा ती गूढ कातर सांजछाया
लागते स्वर मारव्याचे आळवाया
त्या क्षणी कविता पुन्हा जवळून जाते
भेटलीशी भेटते, हरवून जाते

Thursday, October 18, 2012

पाऊस पडतो

पाऊस पडतो 
धारांनी वेढतो 
ओढ लावी जाता जाता 
एकटी गाठतो 
डोळ्यांत दाटतो 
कशी मी सावरू आता ?

येताना दिलेली 
भिजून गेलेली
वचने मागतो सारी
स्वप्नात घेतली
त्याच्या-माझ्यातली
शपथ नेतो माघारी

पाऊस पडतो
जिवाला भिडतो
कोसळतो अतोनात
सागर बेभान
लाटांचं थैमान
किनाऱ्याचा सुटे हात

रानात वनात
तनात मनात
असोशी की हुरहूर
स्वप्न दाखवून
आस जागवून
साजण चालला दूर

पाऊस पडतो
आतून रडतो
लपतो निळ्या तळ्यात
डोळ्यांतून सरी
झरतात तरी
हळवे गाणे गळ्यात 

गोंधळ

आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ 
जळे प्राणांची दिवटी, वाजे श्वासांची संबळ 
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

दहा दिशांचा मंडप, चौक ग्रहांचा मांडला 
सूर्य चंद्र दोन दिवे, घट सागर भरला 
नऊ दिस, नऊ रात्री गर्जे ब्रम्हांड सकळ 
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

गणराया, सरस्वती, रखुमाईचा विठ्ठल
तेहतीस कोटी देवांना ग आवतण दिलं
तुझं आसन मांडलं आई काळजाजवळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

माझा जीव कुरवंडी, तुझी काढते ग दीठ
घाल लेकराच्या परडीत कृपा पीठ-मीठ
तुझ्या मायेचा जोगवा देई सोसायाचं बळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

देह कवडीमोलाचा, त्याची माळ ही गळ्यात
स्वार्थ, वासना चिंध्यांचा पोत जळतो हातात
आई, करुणेच्या ज्योतीनं या जन्माला उजळ
आदिमाये तुझ्या मंदिरात मांडला गोंधळ
गोंधळा ये, गोंधळा ये | आई भवानी गोंधळा ये 

घेई धाव रे विठ्ठला

देह चिखल-मातीचा 
आत्मा साजिरे कमळ
राहो पवित्र, निर्मळ 
हेच मागणे विठ्ठला 

जन्म काजळला डोह 
मन अवसेची रात 
वाट दावी अंधारात 
तुझे चांदणे विठ्ठला

वासनांच्या जलाशयी
देह भागवी तहान
आत्म्यासाठी समाधान
तुला पाहणे विठ्ठला

जीव प्रपंची गुंतला
व्याप-ताप चिंता शिरी
आत्मा तुळसमंजिरी
तुला वाहणे विठ्ठला

पाण्याबाहेरचा मासा
तसा जीव कासावीस
काय करणी केलीस ?
घेई धाव रे विठ्ठला

पुरे पुरे झाला आता
जन्म-मरणाचा फेरा
कधी नेशील माहेरा
मायबापा रे विठ्ठला ?

Sunday, October 14, 2012

तुझीच

तुझ्या प्रतिसादाच्या अज्ञात वाटेवरच्या 
या शेवटच्या वळणावर येऊन थांबलेय मी 
एकटी, अगदी एकटी 

बरेचसे उन्हाळे-पावसाळे सोडून आलेय मागे 
तोडून आलेय सगळेच हवेसे-नकोसे धागे 
भूतकाळाची जीर्ण, विदीर्ण, भेसूर, रंगहीन लक्तरं,
वर्तमानातल्या प्रश्नांची अनाकलनीय, प्रश्नांकित उत्तरं,
भविष्याच्या धुरकट पाटीवरची जराशी पुसट, काहीशी अस्पष्ट अक्षरं 
सगळं पार धुवून-पुसून आलेय 

कोमेजलेल्या भावना, हताश जाणिवा,
भरकटलेले विचार, मोडून पडलेले करार,
पिसाटलेल्या वासना, खिजवणाऱ्या वंचना 
आणखी बरंच काही, भलतंसलतं काहीबाही 
गाईडमधल्या वहिदानं साधू झालेल्या राजूला भेटायला येताना 
एक-एक दागिना वाटेत टाकत यावा, 
तसं टाकत आलेय सगळं सगळं.

आता इथे माझ्या सोबतीला कुणीही नाही
आता फक्त कानांत प्राण आणून तुझ्या हाकेची वाट पहात
एकाग्रपणे तुझ्या अदृश्य चाहुलींचा कानोसा घेत 
निर्विकारपणे उभी आहे 
जन्मापासून तुझी आणि फक्त तुझीच 
मी 

Saturday, October 13, 2012

तारण

तो माझे, मी त्याचे तारण व्हावे 
मी-तूपण त्यागावे, आपण व्हावे 

ओलेत्या मातीच्या गंधासाठी 
वैशाखाला वाटे, श्रावण व्हावे 

नकोत मोहक स्वप्ने आकाशाची 
मी मायाळू मातीचा कण व्हावे 

भाळावरती लिहून गेली नियती,
मी माझ्या दु:खाचे कारण व्हावे 

प्रदीर्घ, नीरस जीवनयात्रेपेक्षा
एक अलौकिक सृजनाचा क्षण व्हावे 

चेतना

तुला असेल एकटे झुरायचे 
तरी मला तुझ्यासवे झुलायचे !

स्वत:च घातली असंख्य कुंपणे, 
म्हणे रडून, 'राहिले उडायचे'

उरेल दु:ख शून्य या भ्रमामधे
व्यथेस सौख्य मानुनी गुणायचे 

कठीण केवढे जगायचे धडे,
शिकायचे, तरी पुन्हा चुकायचे !

वसंत लाख पेरशील अंगणी,
मनातले ऋतू कसे फुलायचे?

तुझ्या उण्यास घ्यायचे जमेत अन्
बळेच खर्च होत मी उरायचे

कधी खरेच संचरेल चेतना,
असेल श्वास तोवरी घुमायचे ! 

Wednesday, October 3, 2012

छळवादी

पुन्हा एकदा गुलजार रचना, पुन्हा एकदा अनुवादाचा मोह!

सुरांत वाजत असता नकळत 

झण्ण वाजुनी तार तुटावी,
आणि रेशमी लड उलगडता 
अवचित बोटे छिलून जावी,
तसे काहिसे विजेसारखे 
काळिज जाळत जाळत जाते,
नजर गुंतली तुझ्यात जेव्हा 
खेचुन मी माघारी घेते 

किती कठिण, किति छळवादी हे 
तुझ्या दूर जाण्याचे पळ-क्षण..............

ही मूळ रचना


जैसे झन्नाके चटख जाये किसी साज का इक तार
जैसे रेशम की किसी डोर से कट जाती है उँगली
ऐसे इक जर्ब सी पडती है
कही सीने के अंदर
खींचकर तोडनी पड जाती है जब तुझसे निगाहें

तेरे जाने की घडी . . .
बडी सक्त घडी है ! 

गुलजार