Saturday, November 17, 2012

फाईल

एक भली मोठी फाईल गहाळ झालीय म्हणे.
त्याच्या मृत्युपत्राची.
त्याचं मृत्युपत्र? आणि तेही भलीमोठी फाईल होण्यासारखं? खरंच असेल हे?
तो तर एक भणंग कवी, आत्ममग्न, मनस्वी, एकटा, अगदी एकटा. 
आपल्याच धुंदीत जगणारा, मस्तमौला. 
एकटा असला तरी एकाकी नसलेला.
मातीच्या कुशीत लोळत आकाशातल्या ताऱ्यांशी गुजगोष्टी करणारा.
किनाऱ्यावरच्या कातळावर रेलून ओहोटीच्या लाटांशी अंताक्षरी खेळणारा.
फुलांच्या कानांत भुंग्याची चोरटी गुपितं सांगणारा.
अवखळ बालकानं साबणाच्या फेसाचे फुगे बनवून 
आपल्याच नादात उडवत जावेत, तसे 
भावनांच्या द्रावणात स्वप्नांची नळी बुचकळून 
हलकीशी फुंकर घालत तरल, हळुवार, सुंदर कवितांचे 
सप्तरंगी फुगे उडवत जाणारा. 
नजरा खिळवून ठेवणारे लहानमोठे असंख्य फुगे!

अंगानं अन् खिशानंही फाटका,
पण प्रतिभेची अचाट, अफाट श्रीमंती लाभलेला तो कवी. 
पायांखालची जमीन जराही हलू न देता आभाळाहून उंच झालेला.
काय लिहिलं असेल त्यानं आपल्या मृत्युपत्रात?
त्याच्या मोहिनी मंत्रानं भारलेल्या कवितांची मालकी? 
कुणाला दिली असेल?
त्याच्या अमोघ, अद्वितीय प्रतिभेचा वारसाहक्क?
कुणाच्या नावे केला असेल तो?
कुणाला सांगितला असेल त्याच्या अनन्यसाधारण शब्दसंपदेचा ठावठिकाणा?
त्याच्या अमर्याद, उत्कट प्रतिमांच्या खजिन्याची किल्ली 
कुणाच्या वाट्याला आली असेल?
हेच सारं असेल त्यात की आणखी काही असेल?

की मृत्युपत्र नसेलच त्या फाइलमध्ये? 
इतरच काही असेल त्यानं लिहिलेलं?
त्याच्या ऋतूंशी रंगलेल्या कानगोष्टींची टाचणं,
रात्र-रात्र चंद्राशी चालणाऱ्या गजालींची टिपणं, 
माणसातला माणूस शोधताना त्यानं गोळा केलेले पुरावे, 
त्याच्या दिव्यत्वाशी होणाऱ्या गाठीभेटींचे व्यापक संदर्भ,
की असेल त्याची आणखी एखादी अलौकिक दीर्घ कविता,
त्या जगाच्या गूढ वाटेवर निघता निघता सुचलेली?
असलीच, तर कशी असेल ती? 
तरल, आर्त, व्याकुळ, हळवी, उदात्त, विलक्षण, अभूतपूर्व,
जी वाचून वाटावं की बस! इथून पुढे काहीही वाचायचं नाही! 
[तशा त्याच्या सगळ्याच कविता अशा विस्मयचकित करणाऱ्या, जागीच खिळवून ठेवणाऱ्या असतात.]

तर मृत्युपत्र, की त्याच्याच काही खास गोपनीय गोष्टी की कविता?
काय असेल त्या फाईलीत? शोध घ्यायलाच हवा!
खरंच गहाळ झाली असेल ती? कशी, कुठं, कधी?
कुणी घेतली असेल? कशासाठी?
की त्यानंच नेली असेल कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून? 
आता तर ती फाईल मिळायलाच हवी आहे!
मग त्यासाठी तो गेला, त्याच वाटेनं जावं लागलं तरी चालेल,
ती फाईल शोधणं आवश्यक आहे! 

3 comments: