Thursday, January 17, 2013

बिनघोर

कंबरेपासनं काटकोनात वाकलेली  
ताठ मानेची काटकुळी बाई
रोज भल्या पहाटेला रस्त्यावरचा 
कागद-कपटा वेचत जाई

पाठीवरच्या पोत्यात वेचून भरते 
भंगार, प्लास्टिक, बाटल्या न् खिळे
खांद्यावरच्या मळकट झोळीत 
जपून ठेवते तुकडे शिळे

लिंबाइतका अंबाडा, तोंडाचं बोळकं
सत्तरीच्या वरची असेल ती नक्की 
तोंडानं फटकळ पण मनानं निर्मळ 
कामात चोख अन् हिशेबाला पक्की 

भंगारवाल्यानं कधी काटा मारताच 
चवताळून ती कचाकचा भांडते 
पुन्हा शांत होऊन रस्त्याकडेच्या 
चिंचेखाली आपला पसारा मांडते 

टपरीवरचा पेलाभर पाणीदार चहा,
मळकट झोळीतले शिळे-पाके तुकडे 
इतकंच पूर्णब्रह्म पोटात ढकलून 
निवांत पसरते विसरून झगडे 

घर-नवरा, लेकरं, सगे-सोयरे कुणी 
असेल का कुठं तिचं हक्काचं जग?
ती स्वस्थ झोपते न् तिच्या विचारात 
माझ्या जिवाची मात्र होते तगमग

हक्काचं घरदार, फिरायला गाड्या,
समृद्धीची रेलचेल, कष्ट मुळी नाही 
गाद्या-गिरद्या, गालिचांवर सुख मला खुपतं
तिच्यासारखी बिनघोर झोप कशी नाही? 

1 comment:

  1. फेसबुक वर वाचली होती हि रचना अगोदर ... बारीक बारीक डीटेल्स त्या म्हातारीच व्यक्ती विशेष छान रंगवतात..स्वताच्या भोवती घेरलेल्या समृध्धीची रिक्तता पण छळते मनात . nice work ....

    ReplyDelete