Saturday, July 13, 2013

मर्म

निद्रिस्त होत्या मुक्या जाणिवा तेवढा काळ होता सुखाचा जरा 
निर्भेळ, निर्लेप, निष्पाप आनंद देई प्रवाही, कुठे तो झरा?
जागा जसा होय ज्वालामुखी, जागली का जिगीषा तशी या मनी? 
आवेग ओसंडणारा नवे जाणण्याचा गळा फास झाला खरा!

आनंद घ्यावा तसा तो लुटावा अशी फक्त होती मनोकामना
उत्साह, उल्हास, उत्कर्ष, उन्मेष यांचीच भक्ती तशी साधना 
वाटे करावी, पुजावे गुणांना उगाळून ही चंदनाची कुडी 
येथे परंतू भल्याच्याच भाळी कुठारी रुताव्या, तशा यातना

होणे हतोत्साह आहे चुकीचे, मनाला कळूनी वळावे कसे?
वाळून गेली जळू देत पाने, नव्या पालवीने जळावे कसे?
आरंभ झालाच नाही जिचा ती कहाणी असावी, तसा जन्म हा 
अंतास येऊन संदिग्ध आहे, खरे मर्म त्याचे कळावे कसे?

आसक्त व्हावे असा ध्यास नाही, निरासक्त होणे नको वाटते 
दाही दिशांतून येतात हाका, तरी मुक्त होणे नको वाटते 
का मांडला खेळ लावून आयुष्य सारे पणाला, कुणी जाणले?
आता तरी आवरावा पसारा, इथे व्यक्त होणे नको वाटते

'जाणून घे आत्मक्लेशातली फोलता आत्मघाताहुनी पातकी 

अस्तित्व आहे तुझे फक्त ओझे अशी भावना सार्थका घातकी 
ही हीनता कालसापेक्ष व्हावी, नसावी सदा-सर्वदा सोबती 
झाकोळलेल्या दिशाही धुके पिंजता पांगता स्वच्छ होतात की!'

कष्टी मनाला असा धीर देता निमाली क्षणी संभ्रमी वादळे 
उद्विग्नता दूर झाली, पळाली निराशा नि आकाश हो मोकळे 
कर्तृत्व, कर्तव्य, धैर्यामुळे लाभते जीवनाला हवीशी गती,
आयुष्य नाही पटी मांडल्या आंधळ्या सोंगट्यांचा पसारा, कळे


[वृत्त - मंदारमाला]

No comments:

Post a Comment