Sunday, September 29, 2013

पडाव

पडाव कोठे टाकावा हे ठरले नाही
प्रवास संपत आला, अंतर सरले नाही

खुशाल दे तू  दिशा हवी ती मनास माझ्या
तुला कधीही मात्र गृहित मी धरले नाही

समीप होता, दूर कसा भासला किनारा?
अभंग होती नाव तरी मी तरले नाही

तुडुंब भरल्या नद्या, नकोसा पाउस झाला
तहानलेले पात्र मनाचे भरले नाही

नसो, कदाचित नसेल अव्वल स्थान कुठेही
भिऊन मागे सरले नाही, हरले नाही

सदैव माझ्या चुका, उणीवा उगाळल्या तू
तुझे रितेपण मला कधी का स्मरले नाही?

मनानिराळ्या साच्यामधले शिल्प तशी मी
मनाप्रमाणे घडेन इतकी उरले नाही 

Monday, September 23, 2013

जीवनसंगीत

'जीवनसंगीत शिकवतो' म्हणालास,
खूप छान वाटलं.
गवसणीतून हळुवारपणे काढून
सुरेलपणे षड्ज-मध्यमात लावून
भला-थोरला देखणा तानपुरा सोपवलास हाती.
दोन बोटांनी चार तारा छेडायला सांगितल्यास
अथकपणे!
'षड्ज आणि मध्यम? पंचम हवा ना?' मी चमकून विचारलं.
'तू मध्यमच छेडत रहा, तुझ्यासाठी तोच उचित आहे.'
गूढ हसत बोललास!
किती आनंदले होते मी! इतकं सोपं असतं जीवनसंगीत?
माझ्या डोळ्यांतल्या या प्रश्नाला जाणून पुन्हा गूढ हसलास.
'बस, इतकंच? आणि पुढे काय?'
माझ्या ओठांवर येऊ पाहणाऱ्या प्रश्नाला तुझं उत्तर होतं,
'मी आहे ना!'
फिरून तेच गूढ हसू चेहऱ्यावर खेळवत
विस्मयचकित, आल्हादित मला
तानपुऱ्यासह सोडून
निघून गेलास, आलास तसाच, वळवाच्या सरीसारखा.
उत्सुकतेनं, नव्या ओढीनं, उत्साहानं
छेडत राहिले षड्ज-मध्यमात चार तारा दोन बोटांनी,
तू आहेस या दृढ विश्वासावर.

दिवस, महिने, वर्षं, तपं सरली,
तू फिरकलाही नाहीस परत.
बधीर झालेली बोटं रक्ताळून गेलीत,
तारांचा ताण विरत-सरत त्या सैलावून गेल्यात,
आता तर पार तुटायला आल्यात.
तानपुराही बेसूर झालाय,
तू जुळवायला कुठं शिकवलंस?

आता एकदाच ये, तसाच गूढ हसत,
अवचित येणाऱ्या वळवाच्या सरीसारखा,
अन् घेऊन जा तुझा तानपुरा परत
हळुवारपणे गवसणीत घालून.
एक मात्र कर, जाताना पुन्हा एकदा तारा जुळवून
छेडून दे त्याला
त्याच पहिल्या सुरेल षड्ज-मध्यमात.
माझ्या परतीच्या वाटेवर
तेच जीवनसंगीत संगत करील
तुझ्या असण्याची ग्वाही देत.

Saturday, September 21, 2013

द्वंद्व

कुजबुजता, अस्फुट बोल जिवाचा हळवा
प्रत्यक्ष, भास की हुलकवणारा चकवा?
हा कुण्या दिशेने येतो, थांग न लागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

हातून निसटल्या तरल क्षणांची खंत
आकांत उरी अन् दाटुन आला कंठ
निद्रिस्त व्यथेचा लाव्हा उसळू लागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

संदिग्ध भीतिचा जागर अवतीभवती
सर्पिणी रात्रिच्या जहरजिव्हा लवलवती
हो पिशाच्च भीषण गतकाळाचे जागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

जाळ्यात अडकल्या कृमीसारखा जीव
ओलांडू बघतो जन्म- मृत्युची शीव
सोडती न त्याला चिवट स्मृतींचे धागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

Monday, September 9, 2013

सावट

करा अंगारे-धुपारे
मीठमोहऱ्या ओवाळा
करकरीत सांजेला
ऊद-कापूर की जाळा

गुण्यागोविंदानं नांदे
हिला दीठ ग लागली
हिच्या आगेमागे फिरे
कुणी अदृश्य सावली

काळवंडली ग काया
हिचा उतरला रंग
जीवघेणा ठरला ग
कुणा पातक्याचा संग

वैद्य-हकीम बोलवा
लेप मागवा चंदनी
विष चढे, सुन्न पडे
सखी नाजूक, देखणी

हिच्या लख्ख रुपावर
पडे सावट कसलं?
नव्हाळीच्या वेदनेला
जिणं जहरी डसलं 

Wednesday, September 4, 2013

बंदिशी

शुभ्र जीवघेणे काहीसे
लख्ख अभ्रकी वेशामधले
निळ्या नदीच्या काठावरचे
दूत दूरच्या देशामधले

असावीत स्वच्छंद पाखरे
की मेघांच्या मोहक लहरी
की वा-यावर भिरभिरणा-या
स्मरणफुलांची खुळी सावरी?

गुणगुण काही अस्फुट कानी
येते, फिरते, विरून जाते
डोह मनाचा थरथरतो अन्
वलय वलय मोहरून जाते

मौनाच्या घुमतात बंदिशी
आभासाच्या पार तळाशी
शब्द तुझे निष्पाप, निरागस
विखुरतात निर्मळ आकाशी

कवेत घ्यावे त्या शब्दांना
असे येतसे मनात काही
कवळू जाता हरवुन जाते
भवतालाला आणि मलाही