Monday, September 23, 2013

जीवनसंगीत

'जीवनसंगीत शिकवतो' म्हणालास,
खूप छान वाटलं.
गवसणीतून हळुवारपणे काढून
सुरेलपणे षड्ज-मध्यमात लावून
भला-थोरला देखणा तानपुरा सोपवलास हाती.
दोन बोटांनी चार तारा छेडायला सांगितल्यास
अथकपणे!
'षड्ज आणि मध्यम? पंचम हवा ना?' मी चमकून विचारलं.
'तू मध्यमच छेडत रहा, तुझ्यासाठी तोच उचित आहे.'
गूढ हसत बोललास!
किती आनंदले होते मी! इतकं सोपं असतं जीवनसंगीत?
माझ्या डोळ्यांतल्या या प्रश्नाला जाणून पुन्हा गूढ हसलास.
'बस, इतकंच? आणि पुढे काय?'
माझ्या ओठांवर येऊ पाहणाऱ्या प्रश्नाला तुझं उत्तर होतं,
'मी आहे ना!'
फिरून तेच गूढ हसू चेहऱ्यावर खेळवत
विस्मयचकित, आल्हादित मला
तानपुऱ्यासह सोडून
निघून गेलास, आलास तसाच, वळवाच्या सरीसारखा.
उत्सुकतेनं, नव्या ओढीनं, उत्साहानं
छेडत राहिले षड्ज-मध्यमात चार तारा दोन बोटांनी,
तू आहेस या दृढ विश्वासावर.

दिवस, महिने, वर्षं, तपं सरली,
तू फिरकलाही नाहीस परत.
बधीर झालेली बोटं रक्ताळून गेलीत,
तारांचा ताण विरत-सरत त्या सैलावून गेल्यात,
आता तर पार तुटायला आल्यात.
तानपुराही बेसूर झालाय,
तू जुळवायला कुठं शिकवलंस?

आता एकदाच ये, तसाच गूढ हसत,
अवचित येणाऱ्या वळवाच्या सरीसारखा,
अन् घेऊन जा तुझा तानपुरा परत
हळुवारपणे गवसणीत घालून.
एक मात्र कर, जाताना पुन्हा एकदा तारा जुळवून
छेडून दे त्याला
त्याच पहिल्या सुरेल षड्ज-मध्यमात.
माझ्या परतीच्या वाटेवर
तेच जीवनसंगीत संगत करील
तुझ्या असण्याची ग्वाही देत.

1 comment: