Sunday, December 22, 2013

वादळ

तो कोसळत रहातो बाहेर,
अखंड, अपरिमित, अनंत, अथांग.
भर दिवसा अंधारून येतं,
खिडकीच्या काचांवर फांद्यांचा बेभान झुलवा,
अंगात वारं आल्यागत!
कडाडत कोसळणाऱ्या बेफाम विजा,
थेट काळजात, राखरांगोळी करत!
काळोखल्या घरांच्या निर्जीव सावल्या,
पिसाटल्या वाऱ्याचं उन्मत्त तांडव.

मीही कोसळत रहाते आतल्याआत
अखंड, अपरिमित, अनंत, अथांग,
त्याच्यासारखीच.
घुसमटत्या भावनांचं गच्च मळभ,
भरकटत्या विचारांची दिशाहीन वावटळ,
अर्थहीन शब्दांचं अनाठायी थैमान,
भिऊन, भिजून थरथरणारं,
काळोखात काळोखाचाच आधार शोधणारं बावरं मन........

आतबाहेर सगळं तेच, तसंच,
फरक एकच 
त्याला ठाऊक आहे तो कोणत्या वादळासाठी कोसळतोय 
आणि मला..............................?

Tuesday, December 3, 2013

दोष

तुझी तीच माझी व्यथाही, कथाही 
सुखे साचला डोह, दु:खे प्रवाही 

जरी मोकळे हास्य सांगे खुशाली 
छुपे मौन बोले निराळेच काही 

रित्या कोटराला लळा लावला मी 
निवारा जपावा, असो तो कसाही 

निराळ्या दिशा दैव देऊन गेले 
दुरावा म्हणे 'हे पुरे सत्य नाही'

किती धोरणी वार होता फुलांचा 
न फांदीस अंदाज आला जराही 

तुला झेलणे चूक माझीच होती
तुझा जीवना दोष नाही तसाही