Tuesday, January 28, 2014

आयुष्या

नकोसा होतसे हल्ली तुझा शेजार आयुष्या
तुलाही वाटतो ना सांग माझा भार आयुष्या?

कुणीही कोणत्याही कारणांनी फायदा घ्यावा
कशासाठी असा झालास तू लाचार आयुष्या?

तुला जाळून तू केल्या खुल्या वाटा प्रकाशाला
दिव्यांनी माखला माथी तुझ्या अंधार आयुष्या

सुखांनी ताप वाढावा, व्यथांनी प्राण गोठावा
तुला हा कोणता झाला नवा आजार आयुष्या?

नको थोटी अपेक्षा अन् नकोसे पांगळे नाते
तुझा तू घे, मला माझा पुरे आधार आयुष्या

तुला नाकारण्याचाही नकोसा वाटतो धोका
तुला सांभाळणेही जोखमीचे फार, आयुष्या!

जरासा स्पर्श होण्याने मने रक्ताळती का रे?
कट्यारीची तुझ्या निष्पापतेला धार आयुष्या

पुरे खंतावणे आता, निरोपाच्या क्षणाआधी
दिले तू जे तुझे, घेऊन जा साभार आयुष्या


2 comments:

  1. फारच सुरेख झालीये गजल। मी जवळ जवळ ८ महिन्यंनी आलेय ब्लॉग वर पण आता येईन नियमीत.

    ReplyDelete
  2. क्रांती . मनस्वी

    ReplyDelete