Tuesday, February 28, 2012

चमत्कार

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळीवर कविता लिहिणं म्हणजे शिवधनुष्य पेलणं! हा माझा तोकडा प्रयत्न.


माझ्या जीवनाचा मीच शिलेदार 
म्हणा अहंकार किंवा गर्व 

चंचल मनाचा खेचला लगाम
प्रज्ञेचा गुलाम झालो नित्य

केली मी कधी ना दैवाची हाकाटी
माझ्या मनगटी माझे दैव

कुंडलीत काही मांडले गणित
तरी माझी जीत होत गेली

विचार, विवेक, संयमाची साथ
घेता आयुष्यात आले सौख्य

दगडांच्या पायी अर्पिला ना भाव
माणसांत देव पाहिला मी

सज्जनांचा संग, दु:खितांची सेवा
हाच पुण्यठेवा साठविला

नमस्कारावीण झाला चमत्कार
माझा साथीदार देव झाला! 

महायुद्ध

सनातन, चिरंतन समस्यांचं विराट, 
अठरा अक्षौहिणी सैन्य घेऊन चालून येणारा दिवस 
आपल्या भात्यातलं एकेक अमोघ अस्त्र
नेम धरून माझ्यावर सोडत जातो 

मी माझ्या तोकड्या निराकरणांची गंजलेली शस्त्रं घेऊन 
माझ्या तकलादू शिरस्त्राणावर 
आणि लेच्यापेच्या चिलखतावर 
त्याचे तीक्ष्ण वार झेलत 
स्वत:ला सावरायच्या, वाचवायच्या विफल प्रयत्नांत .........

त्याचं वाढत जाणारं बळ, कणाकणानं चढत जाणारा जोर,
माझा क्षणोक्षणी कमजोर पडत जाणारा क्षीण प्रतिकार 

अखेरीस युद्धबंदीचा शंखध्वनी ऐकताच 
क्रूर जेत्याचं विकट हास्य चेहऱ्यावर मिरवत, 
विजयपताका फडकवत जाणारा तो 
आणि 
हरून रणात कोसळलेली 
विकल, अगतिक, असफल, गलितगात्र मी 
शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखी 
उत्तरायणाची वाट पहात............
किंवा 
अस्वत्थाम्यासारखी शापित,
भळभळत्या चिरंजीव जखमा घेऊन 
नव्या दिवसाच्या युद्धघोषणेची वाट पहात ................

Monday, February 20, 2012

तो..... श्रावणशिरवा होता

गुलजार यांच्या 'एक बौछार था वो' या स्व. जगजितसिंग यांच्यावर लिहिलेल्या कवितेचा स्वैर भावानुवाद

श्रावणशिरवा होता 

वर्षल्याविनाही कसा
ओल मेघांची शिंपून
चिंब भिजवून गेला

हो, तो श्रावणशिरवा
कोवळ्या उन्हाची थोडी
चमकी घेऊन हाती
उधळून देई साऱ्या
श्रोतृवृंदाच्या दिशेने
आणि अंधुक प्रकाशी
रंगलेल्या मैफलीत
चकाकून उठायचे
ऐकणारे लाख डोळे!

कधी ताना घेत मान हलवी,
डहाळी जशी
जसा वाऱ्याचा हिंदोळा
कुणीसा स्पर्शून जावा
जरा खट्याळपणाने

उमलता कृष्णमेघ
तशी त्याची गुणगुण
आणि निखळ हास्य
की झुंबराची किणकिण
आनंद झंकारे त्यात

कुणा शायराच्या दारी
गझलेच्या पैंजणांची
नाजूकशी रुणझुण
तसा सुरेल होता तो
तरल, मधाळ गोड
स्वरांचा तो शिडकावा
श्रावणशिरवा होता ............

आणि ही मूळ कविता 
एक बौछार था वो -

एक बौछार था वो शख्स 
बिना बरसे
किसी अब्र की सहमी सी नमी से 
जो भिगो देता था

एक बौछार ही था वो
जो कभी धूप की अफ़शां भर के दूर तक
सुनते हुए चेहरों पे छिड़क देता था...
नीम तारीक से हॉल में आँखें चमक उठती थीं

सिर हिलाता था कभी झूम के टहनी की तरह
लगता था झोंका हवा का है
कोई छेड़ गया है..

गुनगुनाता था तो खुलते हुए बादल की तरह
मुस्कुराहट में कई तर्बों की झनकार छुपी थी

गली क़ासिम से चली एक ग़ज़ल की झनाकर था वो
एक अवाज़ की बौछार था वो.

- गुलजार

Saturday, February 18, 2012

हद्द

अंधूक होत जात्या गावातल्या खुणा अन् 
अस्पष्ट होत जाणारी गाज सागराची 
आता इथून माझी संपेल हद्द तेव्हा 
शोधीन वाट मी त्याच्या दूरच्या घराची

एकांत छेदणारी व्याकूळ, आर्त गाणी
गातील भोवताली आवाज चांदण्यांचे
काळोख कापणारे टेंभे दिपून जावे
होईल गर्द इतके आभाळ काजव्यांचे

या वेगळ्या दिशेला प्रस्थान ठेवताना
भेटायचेच नाही ठरवून भेट व्हावी
ही भेट सोबतीला घेऊन मी निघावे
तृष्णेसवेच तृप्तीची पालखी वहावी

काही हवेहवेसे देऊन मुक्त झाले
जे जे नकोनकोसे, सोडून तो पसारा
जाईन दूर तेव्हा येऊ नकोस मागे
ही योजना विधीची, समजून घे इशारा

ही हद्द संपताना, ती वाट शोधताना
मागे वळून आता नाही बघावयाचे
खेचून पाश घेती तरि 'निर्विकार आहे'
हे सोंग जीवघेणे आहे करावयाचे

माझ्या मुशाफिरीला प्रारंभ होत आहे
रोखू नको मला तू, हा नाद सोड आता
माझ्या नवीन यात्रेची रोज एक वार्ता
चंद्रात वाच किंवा ताऱ्यांत शोध आता 

Thursday, February 9, 2012

अर्पण


ज्यांच्या उन्नत लाटांनी दु:खाला येते भरती 
ही कातरवेळ तुझ्या त्या स्मरणांच्या नावावरती 

सहजीच गुंफले धागे, आता न उकलती गाठी
ही हुरहुर आंदण घे त्या चुटपुटत्या भेटींसाठी

कधि पापण्यांत अडखळते, कधि नकळत झरझर झरते
अलवार तुझ्या स्वप्नांना ते अर्घ्य दान मी करते

ज्या शपथा नाही सुटल्या, त्यांचे हे अस्फुट तारे

वचने न पुरी जी झाली, घे त्यांना व्याकुळ वारे

हृदयाच्या अंतर्हृदयी जपले प्रत्येक क्षणाला
चल, बहाल जन्मभराचे संचित त्या खुळेपणाला

आत्म्याचे परमात्म्याशी, ते तुझे नि माझे नाते
आयुष्य उर्वरित मी त्या नात्याला अर्पुन जाते 

Monday, February 6, 2012

एक हुंदका, दोन शिंपले


शब्द संपले, सूर संपले, भाव आणि भावार्थ संपले जाता जाता

काय जोडले, काय तोडले, द्वंद्व हे कसे कोण जिंकले जाता जाता ?


कोण कोणती वाट चालले, कोणत्या क्षणी सौख्य पांगले कोणा ठावे ?

एकरूपता, एकतानता का न साधली, वाद रंगले जाता जाता


गुंफण्यास या ओंजळीत ती कोवळी फुले राहिली कुठे प्राजक्ताची ?

मी म्हणेन 'निर्माल्य राहिले' तो म्हणेल 'तू गंध गुंफले जाता जाता!'


शांत होइतो मंदिरातली सांजवातशी मंद तेवले या संसारी 

स्नेह संपला जाणले तरी पाश कोणते सांग गुंतले जाता जाता 


रोज सावल्या चंद्रदेखण्या व्हायच्या तसे स्वप्न यायचे मागे मागे 

आज एकटा चंद्र राहिला सावल्यांसवे, स्वप्न भंगले जाता जाता


ठेवलेत मी चार शब्द, काही सुरावटी आणि बंदिशी त्याच्यासाठी 

सोबतीस घेऊन चालले एक हुंदका, दोन शिंपले जाता जाता


Friday, February 3, 2012

नकळत सुचलेलं, इथं तिथं सांडलेलं

* वर्षात एकदा होते
हे संभाषण ओझरते
तो दूरदूर दरवळतो,
मी आत आत मोहरते !

*फुटतो दगडांनाही पाझर, म्हणती सारे
इथल्या दगडांना ही जाणिव नसते का रे ?

* तसे फार नाही, जरासे मिळाले
कधी चांदणे अन् कधी काहिली
अपेक्षा तशी फार तेव्हा न होती,
न आता मनी आस ती राहिली

* आखलेल्या, रूढ वाटांशी समांतर
होतसे माझ्यातल्या माझे स्थलांतर

* उगाच पत्र किती मायन्यात लांबवले
सुरू जिथून करावे, तिथेच थांबवले !

* शब्द दिल्या-घेतल्यानं स्वप्नं वाहून जातात
पापण्यांच्या काठावर ठसे राहून जातात

* तिला मोत्यांची झळाळी
तिची काया सोनसळी
माझ्या वेदनेची आहे
वेगळीच जातकुळी

* सांग माझ्या दैवात काय आहे?
गूढ जन्माला घेरुनीच राहे
घालते मी नौकेस ज्या प्रवाही,
तो क्षणी का भलत्या दिशेस वाहे ?

जलतरंग

पुसट पुसट सांध्यरंग
मन अवखळ स्मृतित दंग
अधिर, मदिर, मधुर हवा
उठवि अंतरी तरंग

स्वर घुमती, रुणझुणती
तरल गीत गुणगुणती
चंचल मनि किणकिणती
स्वप्नांचे जलतरंग