Wednesday, July 28, 2010

माझी जन्माची शिदोरी

तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी

तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते

दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत

तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी

Wednesday, July 21, 2010

अरूपाचे रूप

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई


भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत


दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग


भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात


मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

Thursday, July 15, 2010

किती सुखाचे असेल

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे,
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

Monday, July 12, 2010

गाणी

आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली  गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||
दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम  लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||
भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून  झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||
नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||
निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||
असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?





  

Sunday, July 4, 2010

निरुत्तर

वाट बघण्याच्या क्षणांची यातना कळली पुन्हा
डोह भरले पापण्यांचे, माळ ओघळली पुन्हा
तो म्हणे, "ही  वाट माझी वेगळी, अगदी नवी"
लोक आले, येत गेले, वाट ती मळली पुन्हा
कैकदा ठरवून झाले जायचे नाही तरी,
का तुझ्या रस्त्याकडे ही पाउले वळली पुन्हा?
मी उमेदीने नव्या  फुलता जरा चैत्रापरी,
पेटला वैशाख वणवा, बाग का जळली पुन्हा?
वादळे आली किती, त्यांची मला नव्हती तमा,
बांधले घरटे तिथे का वीज कोसळली पुन्हा?
 कोरड्या डोळ्यापरी का कोरडे झाले ऋतू?
मी असे पुसता निरुत्तर सांज मावळली पुन्हा!