Thursday, October 15, 2015

आतून

कृत्रिमतेच्या सजावटीविण
सुंदरतेची व्याख्या होते
जेव्हा ती आतून उमलते

दाहक शब्दांवाचुनसुद्धा
धगधगणारी ज्वाला होते
जेव्हा ती आतून उमलते

कल्पकतेची कोमल काया
अन् प्रतिभेची छाया होते
जेव्हा ती आतून उमलते

वादळवारा, चांदणपारा
श्रावण, मोरपिसारा होते
जेव्हा ती आतून उमलते

कविता कविता उरतच नाही
ती आत्म्याची भाषा होते
जेव्हा ती आतून उमलते


Sunday, December 28, 2014

हरवलेलं आभाळ

चल शोधू हरवलेलं आभाळ
तुझं अन् माझंही
गवसेलच कुठंतरी, कधीतरी
क्षितिजाच्या त्या काठावर
जिथं हरवलेलं सारं काही गवसतं
अनायास, अवचित
नव्या नवलाईच्या रुपड्यात.
दिसेल तिथं आपलं आभाळ, निळंसावळं, कृष्णदेखणं
कोवळ्या जावळाच्या लेकरासारखं
इवलीशी मूठ चोखत खुदुखुदु हसत
निळ्याशार दुलईत लपेटलेलं!
तुझीमाझी वाट पहाणारं
आपल्याला पाहताच हात पसरून
कवेत येऊ पहाणारं
लाडिकशा हुंकारांनी तुझं-माझं मन भारून टाकणारं
मखमली स्पर्शाचं इवलं आभाळ!

Tuesday, January 28, 2014

आयुष्या

नकोसा होतसे हल्ली तुझा शेजार आयुष्या
तुलाही वाटतो ना सांग माझा भार आयुष्या?

कुणीही कोणत्याही कारणांनी फायदा घ्यावा
कशासाठी असा झालास तू लाचार आयुष्या?

तुला जाळून तू केल्या खुल्या वाटा प्रकाशाला
दिव्यांनी माखला माथी तुझ्या अंधार आयुष्या

सुखांनी ताप वाढावा, व्यथांनी प्राण गोठावा
तुला हा कोणता झाला नवा आजार आयुष्या?

नको थोटी अपेक्षा अन् नकोसे पांगळे नाते
तुझा तू घे, मला माझा पुरे आधार आयुष्या

तुला नाकारण्याचाही नकोसा वाटतो धोका
तुला सांभाळणेही जोखमीचे फार, आयुष्या!

जरासा स्पर्श होण्याने मने रक्ताळती का रे?
कट्यारीची तुझ्या निष्पापतेला धार आयुष्या

पुरे खंतावणे आता, निरोपाच्या क्षणाआधी
दिले तू जे तुझे, घेऊन जा साभार आयुष्या