Thursday, March 29, 2012

नि:संग

सांग माझ्या दैवात काय आहे?
गूढ जन्माला घेरुनीच राहे 
घालते मी नौकेस ज्या प्रवाही, 
तो क्षणी का भलत्या दिशेस वाहे?

व्यक्त होताहोताच मूक होते 
तोल गेला की जागरूक होते 
काळजाचे तुटतात बंध तेव्हा 
जाण येते कोठून चूक होते

कोण आकांक्षा, कोणती अपेक्षा ?
या जिवा ठावी वंचना, उपेक्षा
मी अखेरी समजावते मनाला
लाभले ना काहीतरी नपेक्षा?

थोर काव्ये दु:खात जन्म घेती
अन् व्यथेलाही गूढ अर्थ देती
यातनांशी संधान सर्जनाचे
वेदनेच्या मागून शब्द येती

याचसाठी ही वेदना दिली का?
दु:ख लेण्याची प्रेरणा दिली का?
की निराळे काहीतरी कराया
जीवघेणी संवेदना दिली का?

सोसण्याचा हा हट्ट कशासाठी?
सोडताना उरणार काय पाठी?
या विचारांचे बंध उकलताना
आणखी का कसतात नीरगाठी ?

अक्षरांचे होतात फास तेव्हा
शब्द घेती अंतीम श्वास तेव्हा
मीच जावे लंघून प्राण माझे
राहतो हा अस्वस्थ ध्यास तेव्हा

चेतना ना चित्ती न प्राण देही
आणि हरवुन जातात स्पंदनेही
त्या क्षणी मी नि:संग का न व्हावे?
का न तोडावी व्यर्थ बंधने ही ?

Tuesday, March 27, 2012

घे जरा विसावा

घनदाट, गर्द वनराई 
म्हणते 'का इतकी घाई?
पथिका, या रम्य स्थळाची 

तू जाणुन घे नवलाई
घे जरा विसावा !'

बेधुंद खळाळ झऱ्यांचे
गहिऱ्या अन् गूढ दऱ्यांचे
व्यापून विश्व उरलेले
संगीत अमूर्त पऱ्यांचे
'घे जरा विसावा !'

आभाळगोंदले तारे
वेळूवन घुमवित वारे
अन् चंद्र कवडशांमधला
आर्जवी, 'थांब, ये ना रे
घे जरा विसावा !'

पथिकाचे कार्य न सरले
हाती वेचक क्षण उरले
तो पुढे धावता मागे
घुमतात सूर मंतरले
'घे जरा विसावा !

ते शब्द नि सूर प्रवाही
स्पर्शून दिशांना दाही
आसमंत छेदित गेले
मग पथिक बोलला काही,
'घे जरा विसावा ?'

दम आता पळभर नाही
मजपाशी अवसर नाही
या कालगतीचक्राला
क्षणिकही खीळ जर नाही,
तर कसा विसावा ?

मज संचितकर्म करू दे
हे जीवितकार्य सरू दे
तो चक्र थांबविल तेव्हा
हे गीत खुशाल झरू दे,
घे जरा विसावा !' 

Monday, March 26, 2012

म्हणावे कशाला ?

झुगारून वैशाख आषाढगाणे म्हणावे कशाला ?
झरे मेघ तेव्हा उन्हाचे तराणे म्हणावे कशाला ?

कुणी बद्द वाजे, कुणी चेपलेले, कुणी गंजलेले
मला सांग आता, खरे चोख नाणे म्हणावे कशाला ?

खरी प्रीत सर्वस्व देण्यात आहे असे जाणुनी जे
जिवा जीव देती, अशांना दिवाणे म्हणावे कशाला ?

कधी सूर नाही जरी लागले, गीत का थांबवावे ?
मनाने म्हणावे, सुरांच्या प्रमाणे म्हणावे कशाला ?

खुळ्यांचाच बाजार आहे जगी, थोर सांगून गेले
असावे खरे ते, स्वत:ला शहाणे म्हणावे कशाला ?

जशी येत जाती, तशी सोडवावीत आयुष्यकोडी
'उगा ईश्वरा घालसी का उखाणे' म्हणावे कशाला ?

इथे गुंतला जीव का एवढा, ही घडीची सराई
प्रवासात आयुष्य जाते, रहाणे म्हणावे कशाला ? 
 

कवितेची एक ओळ

इवलीशी चांदणी धुक्यामधे फिरली 
दहिवर झेलत झिरमिर झरली 
रानभरी वाऱ्यानं लुकलुक ताऱ्यानं 
चांदणीची परडी फुलांनी भरली 
चांदणी लेकीच्या रुपात विरली 
कवितेची एक ओळ काळजात झरली 

छुनछुन तोरड्यांनी अंगणभर नाचली 
झुळझुळ झुळूक खुद्कन हासली 
चंद्रकोर टिकली, पावलांत बिजली 
'बघतंय का कुणीतरी?' चमकुन लाजली 
लाजली न् आईच्या पदरात शिरली 
कवितेची एक ओळ काळजात झरली 

कलाबतू झालर झग्याला लावली 
मिरवत दुडूदुडू घरभर धावली 
गरगर गिरकी भिंगरीसारखी 
धरायला बघते आपलीच सावली 
गाभुळ्या दुपारी झड सरसरली
कवितेची एक ओळ काळजात झरली 

परक्याची सावली माहेरी वाढली 
ज्याची होती त्यानं पालखी धाडली 
रुणुझुणू मासोळी, गळा पोत काळी 
मोहऱ्या ओवाळुन अलाबला काढली 
खणानारळानं ओटी तिची भरली 
कवितेची एक ओळ काळजात झरली 

सांजेला पाहुणी परतून चालली 
डोळाभर माया आसवांत दाटली 
मागे मागे वळे, जीव तळमळे 
गळा मिठी पडली न् माय गहिवरली 
कवितेची एक ओळ काळजात झरली 

अमर

भगवतीचरण वर्मा यांच्या  रचनेचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न 

वसंत होता कधी पाहिला प्रिये फिकटल्या पाचोळ्याने 
हास्य फुलवले होते ओठी कधी आजच्या मुसमुसण्याने 
ओघळली आता नेत्रांतुन आणि विखुरली जी तुकड्यांतुन 
त्या स्वप्नांना मीही केव्हा जपले होते विश्वासाने

प्रीतरसाने ओथंबित किति हृदये, किति उन्मादक लोचन,
जनन-मरण ओघात अकल्पित कोमल भावे दृढ आलिंगन
तरी एकटी तूच कशी झालीस भार माझ्या आयुष्या?
प्रिये, बांधले ज्याने, तोडुन जाई तो प्रीतीचे बंधन

स्पंदनात तू लहरत होतिस केव्हा माझ्या अंतर्हृदयी ?
मीही प्राणांचे प्राणांशी जपले नाते कुठल्या समयी ?
कुणा दुज्याच्या इच्छेखातर दोघे येथे भेटत होतो,
एक विचारू? खरेच होते प्रेम तुझ्या वा माझ्या हृदयी ?

अमृत निघते ज्यातुन, असते त्याच सागरी कटू हलाहल
पंचम छेडत त्यात गुंफतो व्यथागीत प्राणांचे कोकिळ
ज्याला म्हणती अंत, तीच असते नांदी नव आरंभाची
काय तुला ठाऊक किती वैभवात माझे विराण घरकुल ?

काल विवश होतो तुजसाठी, आज स्वत:साठीच, स्वत:चा
चौकटीत जे बांधत होते, नाद सोडला त्या स्वप्नाचा
पावलांस मी गती दिली अन् आयुष्याची ज्योत शिरावर
रडतकुढत तू ताप म्हणालिस, खेळच होता तो चेष्टेचा

क्षणोक्षणी मी पुढे चाललो, गती खालती गतीच वरती
फिरतच राही गगन सारखे आणि राहते फिरतच धरती
भ्रमात या मी भ्रमलो आणिक भ्रमित जगी या तुला भेटलो 

जग क्षणभंगुर, तू क्षणभंगुर, अमर मीच केवळ या जगती  आणि ही मूळ रचना पतझड़ के पीले पत्तों ने प्रिय देखा था मधुमास कभी;
जो कहलाता है आज रुदन, वह कहलाया था हास कभी;
आँखों के मोती बन-बनकर जो टूट चुके हैं अभी-अभी
सच कहता हूँ, उन सपनों में भी था मुझको विश्वास कभी ।

कितने ही रस से भरे हृदय, कितने ही उन्मद-मदिर-नयन,
संसृति ने बेसुध यहाँ रचे कितने ही कोमल आलिंगन;
फिर एक अकेली तुम ही क्यों मेरे जीवन में भार बनीं ?
जिसने तोड़ा प्रिय उसने ही था दिया प्रेम का यह बन्धन !

कब तुमने मेरे मानस में था स्पन्दन का संचार किया ?
कब मैंने प्राण तुम्हारा निज प्राणों से था अभिसार किया ?
हम-तुमको कोई और यहाँ ले आया-जाया करता है;
मैं पूछ रहा हूँ आज अरे किसने कब किससे प्यार किया ?

जिस सागर से मधु निकला है, विष भी था उसके अन्तर में,
प्राणों की व्याकुल हूक-भरी कोयल के उस पंचम स्वर में;
जिसको जग मिटना कहता है, उसमें ही बनने का क्रम है;
तुम क्या जानो कितना वैभव है मेरे इस उजड़े घर में ?

कल तक जो विवश तुम्हारा था, वह आज स्वयं हूँ मैं अपना;
सीमा का बन्धन जो कि बना, मैं तोड़ चुका हूँ वह सपना;
पैरों पर गति के अंगारे, सर पर जीवन की ज्वाला है;
वह एक हँसी का खेल जिसे तुम रोकर कह देती 'तपना'।

मैं बढ़ता जाता हूँ प्रतिपल, गति है नीचे गति है ऊपर;
भ्रमती ही रहती है पृथ्वी, भ्रमता ही रहता है अम्बर !
इस भ्रम में भ्रमकर ही भ्रम के जग में मैंने पाया तुमको;
जग नश्वर है, तुम नश्वर हो, बस मैं हूँ केवल एक अमर !


रचनाकार: भगवतीचरण वर्मा

अखेरची चर्चबेल

दु:खाचे महाकवी ग्रेस यांना त्यांच्याच शब्दांच्या संगतीने वाहिलेली भावपूर्ण श्रध्दांजली........

संध्यामग्न पुरुषाची ओल्या वेळूची बासरी
रान वाऱ्याने हलते, तिथे गुंगते वैखरी

चंद्रमाधवीच्या देशी संध्याकाळच्या कविता
सांजभयाच्या साजणी, तुझा देवचाफा रिता

सांध्यपर्वात वैष्णवी मृगजळाला बांधून
राई निष्पर्ण तरूंची माया भगवी सांधून

घर थकले संन्यासी, गवाक्षात नादनक्षी
कुठे अनाम धुळीत दडे हतबल पक्षी

हिऱ्यातल्या कट्यारीनी केला नक्षत्रांचा चुरा
मोक्ष चरणगतीचा राही प्रवास अधुरा

स्वामी कावळे उडाले, शब्दपालखी चालली
मितवा रे, अखेरची चर्चबेल निनादली 

Sunday, March 25, 2012

सख्या आज तरी ये ना रे

मराठी कविता समुहाच्या काव्यछंद - लावणी या उपक्रमासाठी   लावणी रचण्याचा हा माझा पहिलावहिला [नवसाचा] प्रयत्न.  या प्रकारच्या लावणीला बैठकीची लावणी म्हणतात, असं जाणकारांनी सांगितलं. 

मनी रातराणी दरवळे, तरी तळमळे जीव हा सजणा
जशी रात अनावर चढे, जाऊ कुणिकडे सांग मनरमणा
तुझी याद अशी गुलजार, करी बेजार, सोसवेना रे 
सख्या आज तरी ये ना रे

बघ गर्द निळी पैठणी, नार देखणी आज ही नटली
ठुशी, चंद्रहार, गळसरी, सुबक साजिरी अंगठी सजली
तुजवीण सुना शृंगार, जिवाला भार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

पदी पैंजण शोभुन दिसे, मेंदीचे ठसे लाल हे भलते
हातात काकणे-चुडे, घडवुनी विडे वाट मी बघते
तुझी प्राणसखी सुकुमार, विरह आजार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

कुठे गुंतलास राजसा, येईना कसा अजून दारात
तुझ्या वाटेवर बावरा, जीव घाबरा झुरतो दिनरात
बरसावी शीतल धार, उरी अंगार सोसवेना रे
सख्या आज तरी ये ना रे

Saturday, March 10, 2012

तेथ नेई पांडुरंगा

जेथ अमृताचे तळे
त्यात वैराग्यकमळे 
कैवल्याचे दाट मळे 
तेथ नेई पांडुरंगा

जेथ नाही द्वेष, क्षोभ
मोह-माया, क्रोध-लोभ
दु:ख, व्यथेचा प्रक्षोभ
नाही जाणिवांचा दंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ जीव विसावेल
भावसमाधी लावेल
माझ्या तृषेला लाभेल
तुझ्या चरणीची गंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ मांगल्याचा गंध
तुझ्या नामाचा मरंद
जेथ गातील स्वच्छंद
सूर तुझिया अभंगा
तेथ नेई पांडुरंगा

जेथ ब्रम्हांडाचे मूळ
संतचरणांची धूळ
असे अद्भुत राऊळ
दावी लोचनां श्रीरंगा
तेथ नेई पांडुरंगा 

Friday, March 9, 2012

गोपाळा

मिळावा जन्मजन्मी आगळा सत्संग गोपाळा 
कधी जाणार जो नाही, असा दे रंग गोपाळा 

नसे मी सत्यभामा, रुक्मिणी, कुब्जा, सखी राधा
खुळी मीरा तुझ्या ध्यानात राही दंग गोपाळा

तुझ्या कंठात मी माला, तुझ्या ओठांत मी वेणू
तुझ्या वेणूत मी वृंदावनी सारंग गोपाळा

नसे राज्ञीपदाची लालसा, ना सोस रत्नांचा
नको धनसंपदा, झाले पुरी नि:संग गोपाळा

तशी आसक्त मी नाही, तरी ही आस जीवाला,
दिसावा एकदा माझा सखा श्रीरंग गोपाळा