Friday, September 30, 2011

पाहुणी

नवरात्र जागवित आली घरी पाहुणी
माय अंबिका देखणी

मांडते मी चंदनी पाट
काय आईचा वर्णू थाट
भरजरी कुसुंबी काठ, हिरवी पैठणी
माय अंबिका देखणी

गळा शोभे माळ पुतळ्यांची
कानी कुडी मोती-पोवळ्यांची
पैंजणे सोनसाखळ्यांची, रत्ने कंकणी
माय अंबिका देखणी

साज सोन्याचा बावनकशी
चंद्रहार, वजरटिक, ठुशी
हिरकणी शोभली कशी सोन्याच्या कोंदणी
माय अंबिका देखणी

अंबा जगतजननी माउली
आली शकुनाच्या पाउली
नित्य राहो तुझी सावली माझ्या ग अंगणी
माय अंबिका देखणी 

Sunday, September 25, 2011

ध्यासपर्व


उंबरा नाही तुझा आला कधी ओलांडता
काळ आला न्यायला, दारात झाला थांबता
मान झुकवुन जी हुजूरी फक्त केली नेहमी,
हक्क नाही जाणले, नाहीच आले भांडता
विस्कटावे लागले धागे पुरे गोफातले
एकदा सुटल्या, पुन्हा गाठी न आल्या बांधता
धाडसाने घातली मीही उडी, पण शेवटी
कोठडी दैवात आली, सप्तसागर लांघता
हरवली स्वप्ने किती अन् फाटली नाती किती?
विखुरले मी एकटी हे शोधता, ते सांधता
केवढी अनमोल होती तू दिलेली आसवे,
शिंपल्यांनी कैद केली पापणीतुन सांडता
एवढा संदिग्ध नव्हता प्रश्न मी केला तुला,
ध्यासपर्वाची कधी होणार आहे सांगता?

Saturday, September 24, 2011

लेक लाडकीजशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी
तशी नाजूक, देखणी माझी लेक सोनसळी

यावी पुनवेच्या राती जशी शकुनचाहूल,
तसं अंगणात माझ्या तिचं इवलं पाऊल

हसू तिचं जशी बरसावी वळवाची सर,
चांदण्याची गोड खळी गोबऱ्याशा गालांवर

ओठी घेऊन आली ती गोड चैतन्याची गाणी
जसं पहाटेचं स्वप्न, जशी परीची कहाणी 

लाडाकोडात वाढली माझी लेक कौतुकाची,
आली जाण छकुलीला मायबापाच्या सुखाची

बरोबरीनं राबते लेक घरादारासाठी
अडचणीला उभी ही, जशी जगदंबा पाठी!

कधी दुखलं काळीज, तिच्या हास्याचा उपाय
लेक होते कधी कधी माय-पित्याचीच माय!

किती गुणाची ही पोर, आहे नक्षत्र की परी?
उद्या उडून जायची कुणा परक्याच्या घरी

जरी घोर आज लागे मायबापाच्या मनाला,
कन्या परक्याचं धन, द्यावं लागे ज्याचं त्याला!

देवा, माझ्या चिमणीला लाभो सुखाचं  सासर,
मिळो अतोनात प्रेम, देई एवढाच वर 

औक्ष लाभू दे उदंड, व्हावी नभाहून मोठी
जन्मोजन्मी लेक होऊन ती यावी माझ्या पोटी!

Tuesday, September 20, 2011

संभव

मनासारखे घडतच नाही, म्हणून इतके अकांडतांडव?
कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव?

बुद्धी सांगे स्थितप्रज्ञ हो, मन गुणगुणते हवे तसे कर!
मन-बुद्धीच्या द्वंद्वामध्ये एकदा तरी मनास जिंकव

रंग, कुंचला, कोरा कागद बघून हाती गगन बोलले,
'किती तोकडे चित्र काढशिल? घे, या साऱ्या दिशाच रंगव!'

भूतकाळ सरकत्या सावल्या, भविष्य वाळूवरचे मृगजळ
वर्तमान अनमोल देणगी, तुझी संपदा त्यातच गुंतव

जेव्हा जेव्हा तिला दिली मी मात, बोलली चिडून नियती,
'वजीर कुठला, प्यादे कुठले, आधी या वादाला संपव!'

अहंकार उन्मत्त गर्जला, 'मी हे केले, मी ते केले'
हसून मी इतकेच बोलले, 'जा, जात्या काळाला थांबव!'

माझ्या नसण्यावर केव्हाचे शिक्कामोर्तब झाले आहे,
आता उरला केवळ माझ्या नसूनही असण्याचा संभव!

Sunday, September 18, 2011

गुपित

कालिंदीच्या प्रवाहात गंध-फुलांचे ओघळ
त्याची प्राजक्ताची, तिची देवचाफ्याची ओंजळ

त्याची गुलाबी स्पंदने, तिची अबोली बंधने
त्याच्या दिठीत आभाळ, तिच्या मुठीत चांदणे

त्याचं मोगऱ्याचं हसू, तिची जाई-जुई लाज
त्याच्या मुरलीची तान, तिच्या नूपुरांचा साज

त्याची गोकर्णी निळाई, तिची केतकीची काया,
सोनसळी गौरकांती, तरी सावळ्याची छाया

निशिगंध तुरे त्याचे, तिचा बकुळगजरा
तिची झुकली पापणी, त्याच्या आर्जवी नजरा

फुलाफुलातून त्यांचे उलगडते गुपित,
जन्मजन्मीचे अद्वैत त्यांची फुलवंती प्रीत 

Saturday, September 17, 2011

तुझी भेट व्हावी असे वाटले

तुझी भेट व्हावी असे वाटले अन् तुझ्या आठवांचे थवे हासले
पिसारे किती सप्तरंगी क्षणांचे मनाच्या रित्या अंगणी नाचले

तुझी भेट व्हावी असे वाटले, मी तुझी वाट शोधीत आले खरी,
न वारा तुझा की न चाहूल आली तुझी, फक्त डोळ्यांत आल्या सरी

तुझी भेट व्हावी असे वाटले तोच आला तुझ्या वेणुचा नाद रे,
खरा तो असे की असे भास, काही कळेना मला, घाल तू साद रे

तुझी भेट व्हावी असे वाटले त्या क्षणी भेट झालीच नाही कधी,
किती वाट पाहू इथे एकटी मी? तुझा अंत ना पार लागे कधी!

तुझी भेट व्हावी असे वाटले की मनाच्या तळाशी जरा वाकते,
तुला पाहते, बोलते मी तुझ्याशी, क्षणी चोरकप्पा पुन्हा झाकते!

तुझी भेट व्हावी असे वाटले, एवढी का न आशा जगाया पुरी?
तुला भेटण्याची पदे आळवावी सख्या, जोवरी श्वास आहे उरी!

Friday, September 16, 2011

दे

दे चंद्र जडवुन गोंदणी अन् चांदण्यांची माळ दे
संध्याछटांनी रंगलेले भर्जरी आभाळ दे

ये एकदा, माझी खुळी आशा मला वेडावते
मनपाखरू माझे तुझ्या वाटेकडे झेपावते
कोमेजल्या, विझल्या दिठीला गर्द हिरवा माळ दे

प्राजक्त माझ्या अंगणी आला तुझ्या बागेतला
माझ्या व्यथेचा हातही त्यानेच हाती घेतला
दे बहर तो फिरुनी मला, तो गंधभरला काळ दे

नाहीस तू जवळी तरी जपले तुझे आभासही
सांभाळली आहे उराशी एक वेडी आसही
आयुष्य देते मी तुला, तू एक संध्याकाळ दे 

Wednesday, September 14, 2011

दिलासा

श्वास घेऊ दे जरासा पावसाला
तू बरस अन् दे दिलासा पावसाला

एकटीला तो कधी भिजवीत नाही
संग त्याचाही हवासा पावसाला

दाटण्याआधी कसा बरसून गेला?
धीर नाही एवढासा पावसाला!

चिंब भिजवावे मनाला आसवांनी,
अन् विचारावा खुलासा पावसाला?

वाटतो का आज थोडा फिकटलेला?
रंग देऊ या नवासा पावसाला!

Tuesday, September 13, 2011

गौरितनय

लंबोदर, शूर्पकर्ण, अमित, विनय
भालचंद्र, धूम्रवर्ण, गौरितनय ||धृ||

ब्रह्मतत्व तूच, तूच आत्मरूप
वाणीरूप, नामरूप, जीवरूप
अद्वितीय, ज्ञानरूप, मंगलमय ||१||

त्रिविधशक्तिरूप तूच, तू गुणेश,
उत्पत्ती, स्थिति, लय तू, श्रीगणेश
पाशांकुश धारिसी हे सांबतनय ||२||

तीन काल, तीन देह आणि त्रिगुण
यांपरता तू, निर्गुण आणि सगुण
ओंकारा, तारि भक्त देत अभय ||३||

Saturday, September 10, 2011

शून्य

म्हणायला जगणे होते पण जागोजागी मरणे होती
मरणानंतर एक तरी, जगताना लाखो सरणे होती

नदी कधीही सुसाटून वाहिलीच नाही मुक्तपणाने
तिच्याभोवती कायम दारे, भिंती, बांध नि धरणे होती

जीवनात जे जे घडले ते नव्हते कौतुक करण्याजोगे,
पूर्वसुरींच्या वाटांची ती फक्त अंध अनुकरणे होती

अशी संहिता लिहिली त्याने, सुधारणेला जागा नव्हती
टिंबांनी संवाद साधला, रिकामीच अवतरणे होती

अवतीभवती कुणीच नव्हते, तरी कधी नव्हते एकाकी,
हरेक अवघड वळणावरती सोबत हळवी स्मरणे होती

काय कशातुन उणे करावे? क्षणही नाही जमेस आता,
शून्य शेवटी हाती आले, चुकलेली समिकरणे होती!

Wednesday, September 7, 2011

चिरवेदना

मनभर उदासीचा कसा लपेल चेहरा?
असं मळभ की आत्ता कोसळेल झरझरा

आपल्यात असूनही आपल्यापासून दूर
कुणी विचारता "आज काही वेगळाच नूर?"

"काही नाही, सहजच!" हसू उसनं बोलतं,
मुकेपण उगाचच मूठ झाकली खोलतं!

काळजात खोलवर काही घुमे मंद मंद
कसे जुळून येतात नकळत मर्मबंध?

भाव आपले अचूक त्यांना कसे कळतात?
आपल्याच व्यथा त्यांच्या शब्दांतून ढळतात?

सांज-संधिप्रकाशाचं चिरवेदनेचं नातं,
जीवघेण्या सन्नाट्याचं गुलजार गीत गातं

"बस एक चुप सी लगी है,
नहीं, उदास नहीं !
कहीं पे सांस रुकी है,
नहीं, उदास नहीं!"

http://www.youtube.com/watch?v=NJeeZwBn70M

तुझी भेट व्हावी

तुझी भेट व्हावी धुक्याच्या महाली
धुक्याला रुप्याची चढावी झळाळी
जरीपैठणी लेवुनी रात यावी
खळी चांदणी, चंद्र गोंदून भाळी

तुझी भेट व्हावी, जसे स्वप्न माझे
फुलांच्या सुगंधात न्हाऊन यावे
सुरांनी तुझा गोडवा वेचुनी अन्
तुझे गीत बेभान होऊन गावे

तुझी भेट व्हावी पहाटेस, जेव्हा
निळा मोर नाचेल दारात माझ्या
तुझ्या चाहुलींच्या बनातील वारा
नवे गूज सांगेल कानात माझ्या

तुझी भेट व्हावी, जशा पावरीच्या
घुमाव्यात गोकूळ वेढीत ताना
कदंबास बांधून झोके झुलावे,
तुझ्या कृष्णडोही मला पाहताना

तुझी भेट व्हावी अशा सांजवेळी
मला पैल माझा खुणावेल जेव्हा,
तुझ्या आठवांचा उबारा मिळावा
भवातून मी पार होईन तेव्हा

शब्दावलीसरू सिंघल यांच्या या रचनेचा स्वैर भावानुवाद
उदासीत रेंगाळणाऱ्या दिसाला रवाना कराया किती यातना
निशेच्या दुशालेत जेव्हा जराशी मनाला हवी वाटते सांत्वना,
पिसाटून फिरता इथे अन् तिथे या खुळ्यासारख्या कल्पना, भावना,
रित्या जीवनाला सुखाने फुलाया दिले तूच सौंदर्य अन् चेतना

कधी दूर गेलास टाकून जेव्हा मला एकटीला लळा लावुनी
तुझे चित्र, छाया उराशी धरूनी, तुला शोधता रोज भांबावुनी
इथेही, तिथेही, कुठेही, कधीही तुला पाहण्याची असोशी मनी,
खरे रूप-लावण्य या जीवनाचे मला दाविले तूच स्वप्नांतुनी

जसे भंगले शिल्प कोणी त्यजावे, तसे त्यागता या जगाने मला,
रिती, सुन्न झाले; मुकी, खिन्न झाले, मिळे धूळ-मातीत जैसी कला
करावी न चिंता, न पर्वा कशाची, कधी मी कमी ना गणावे मला,
म्हणूनी दिली तू तुझी दिव्य वाणी, अलौकीक शब्दावली ही मला!आणि ही मूळ कविता
After a long tiring day,
When my heart seeks consoling,
In the night,
When my views are strolling,
To make me live,
You create beauty in life.

Sometimes, when you're away,
My skin feels bare.
Cuddling myself with your photo,
I look for you everywhere.
To tell me life is better than it seems,
You create beauty in dreams.

When the world makes me dumb-struck,
And I sit like a neglect art, ground struck.
To tell me not to care afterwards,
You create beauty in words.
- Saru Singhal