Sunday, December 22, 2013

वादळ

तो कोसळत रहातो बाहेर,
अखंड, अपरिमित, अनंत, अथांग.
भर दिवसा अंधारून येतं,
खिडकीच्या काचांवर फांद्यांचा बेभान झुलवा,
अंगात वारं आल्यागत!
कडाडत कोसळणाऱ्या बेफाम विजा,
थेट काळजात, राखरांगोळी करत!
काळोखल्या घरांच्या निर्जीव सावल्या,
पिसाटल्या वाऱ्याचं उन्मत्त तांडव.

मीही कोसळत रहाते आतल्याआत
अखंड, अपरिमित, अनंत, अथांग,
त्याच्यासारखीच.
घुसमटत्या भावनांचं गच्च मळभ,
भरकटत्या विचारांची दिशाहीन वावटळ,
अर्थहीन शब्दांचं अनाठायी थैमान,
भिऊन, भिजून थरथरणारं,
काळोखात काळोखाचाच आधार शोधणारं बावरं मन........

आतबाहेर सगळं तेच, तसंच,
फरक एकच 
त्याला ठाऊक आहे तो कोणत्या वादळासाठी कोसळतोय 
आणि मला..............................?

Tuesday, December 3, 2013

दोष

तुझी तीच माझी व्यथाही, कथाही 
सुखे साचला डोह, दु:खे प्रवाही 

जरी मोकळे हास्य सांगे खुशाली 
छुपे मौन बोले निराळेच काही 

रित्या कोटराला लळा लावला मी 
निवारा जपावा, असो तो कसाही 

निराळ्या दिशा दैव देऊन गेले 
दुरावा म्हणे 'हे पुरे सत्य नाही'

किती धोरणी वार होता फुलांचा 
न फांदीस अंदाज आला जराही 

तुला झेलणे चूक माझीच होती
तुझा जीवना दोष नाही तसाही

Thursday, November 21, 2013

चंद्रकळा

दुपारीनं दिलेला जरा जास्तच कोरडा
रखरखीत, पिवळट-पांढुरका रंग पुसत
तिनं उगवतीचे चटक रंग दिले मावळतीला.
जरासा भगवा, चिमुटभर किरमिजी, थोडा सोनेरी पिवळा, बोटभर लाल, कणभर जांभळा अन् इवलासा करडा.
रंगवायच्या नादात जरा जास्तच होत गेला करडा.
नुकतीच घडी मोडलेल्या 
भरजरी पैठणीच्या काठपदरातले रंग
अंगभर डागाळल्यासारखे पसरून तिचं पार पोतेरं करावं 
अवेळी आलेल्या पावसानं, तसं
सगळं चित्रच बिघडत चाललं,
तर तिनं अख्खं आभाळ काळंभोर रंगवलं न् दिली ओंजळभर चंदेरी चमकी उधळून.
पैठणीच्या पोतेर्याचं रंगरूप बदललं
न्
काळीभोर, खडीमाखली चंद्रकळा सजली!

हल्ली ती फक्त चंद्रकळाच मिरवते
कौतुकानं, अभिमानानं ....

Wednesday, November 13, 2013

सीमा

ताणले तेवढे ताणते
दु:ख सीमा कुठे जाणते?

शब्द तोलून बोलायचे
तत्व अंगी पुन्हा बाणते

भेट घेण्यास आसावले
त्या व्यथा, वेदना, ताण ते

मूढ मी, माणसे सोडुनी
सावल्यांनाच वाखाणते!

आर्द्रता भावनांची कुठे?
चित्त नाहीच, पाषाण ते!

नेहमी फायद्याचे नसे
मौन गोत्यातही आणते 

Saturday, November 9, 2013

गणित

सोपी समिकरणे चुकलेली
कठिण प्रमेये भरकटलेली
काळ-काम-वेगाची सांगड
केव्हाची हातुन तुटलेली

कधी लघुत्तम कधी महत्तम
स्थानबदल तर रीतीपुरते
विभाज्य किंवा असो विभाजक
साधारणपण तसेच उरते

दशांशचिन्हापुढे किति घरे
भाग पुरेसा जातच नसतो
उधारीत दशकाची भरती
कुठे हातचा राखिव असतो?

'क्ष'च्या शोधामध्ये निरंतर
अस्तित्वाचा क्षय ठरलेला
सूत्र बरोबर, उत्तर चुकते
अंदाजहि फसतो धरलेला

उरल्या आयुष्यात तरी मी
अचूक गणिते करीन म्हणते
अधिक वेदना, वजा शांतता
शून्याला शून्याने गुणते!

थरथर

नितळ निळ्या शांत पाण्यावर
पावलं टेकली न टेकलीशी वाटावीत
असा भिरभिरत्या पाखराचा पदस्पर्श
अन् त्यानं कळत नकळत उठवलेली
हळुवार, नाजुक, हवीहवीशी मोहक थरथर.....

अत्तराची कुपी रिती झाली
तरी गंध जपून ठेवते अंतरात,
तशीच जपलीय ती थरथर पाण्यानं
अजूनही काळजात खोलवर.....

मी पाहिलीय, अनुभवलीय
आतून...... !

अर्धा डाव

जवळ असुनही कधीच त्याचा ठाव गवसला नाही 
मैलोगणती मुक्कामाचा गाव गवसला नाही 

एक इशारा तिचा, अन् पुरा जन्म पांगळा झाला 
विफलशरण मी, अगतिकतेचा डाव गवसला नाही 

वृथा लादल्या महानतेला जपणे नसते सोपे 
ओढुनताणुन आणू म्हणता आव गवसला नाही 

लिहिल्या म्हणण्यापुरत्या झाल्या भ्रामक गाथा-पोथ्या
केवळ शब्दांचेच फुलोरे, भाव गवसला नाही

आकांताच्या पल्याडचेही दु:ख सोसले होते
गोंदवलेल्या नक्षीमधला घाव गवसला नाही

पट फरपटला आणि सोंगट्या हवेत उधळुन गेल्या
पुन्हा कुठेही उरला अर्धा डाव गवसला नाही 

वाकळ

लाथाडत राही दैव राजरोस
जसा पायपोस फाटलेला
जितेपणी राही घरदार ओस
जगण्याचा सोस आटलेला

कातळात गंगा, सुके पाणओघ
तसा राही जोग संसारात
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे भोग
वंचनेचा रोग जन्मजात

कुठे विकारांची लावू विल्हेवाट?
मन काठोकाठ भरू आले
थोपवू पाहिले जरी आटोकाट
पापण्यांचे माठ झरू आले

जिवापार गेली काळजाची कळ
भावनांचा छळ सोसवेना
जळे प्राण अशी वास्तवाची झळ
देहाची वाकळ सोडवेना

Saturday, October 5, 2013

वार्ता

वार्ता खरीच होती
गर्दी बरीच होती

कोठेतरीच आली
कोठेतरीच होती

छाया असून माझी
त्याच्या घरीच होती

होती कधी शहाणी?
छे, बावरीच होती!

पाऊल ठेवले मी
तेथे दरीच होती

आली, उडून गेली
संधी परीच होती

तुडवून घेत गेली
ती पायरीच होती

Sunday, September 29, 2013

पडाव

पडाव कोठे टाकावा हे ठरले नाही
प्रवास संपत आला, अंतर सरले नाही

खुशाल दे तू  दिशा हवी ती मनास माझ्या
तुला कधीही मात्र गृहित मी धरले नाही

समीप होता, दूर कसा भासला किनारा?
अभंग होती नाव तरी मी तरले नाही

तुडुंब भरल्या नद्या, नकोसा पाउस झाला
तहानलेले पात्र मनाचे भरले नाही

नसो, कदाचित नसेल अव्वल स्थान कुठेही
भिऊन मागे सरले नाही, हरले नाही

सदैव माझ्या चुका, उणीवा उगाळल्या तू
तुझे रितेपण मला कधी का स्मरले नाही?

मनानिराळ्या साच्यामधले शिल्प तशी मी
मनाप्रमाणे घडेन इतकी उरले नाही 

Monday, September 23, 2013

जीवनसंगीत

'जीवनसंगीत शिकवतो' म्हणालास,
खूप छान वाटलं.
गवसणीतून हळुवारपणे काढून
सुरेलपणे षड्ज-मध्यमात लावून
भला-थोरला देखणा तानपुरा सोपवलास हाती.
दोन बोटांनी चार तारा छेडायला सांगितल्यास
अथकपणे!
'षड्ज आणि मध्यम? पंचम हवा ना?' मी चमकून विचारलं.
'तू मध्यमच छेडत रहा, तुझ्यासाठी तोच उचित आहे.'
गूढ हसत बोललास!
किती आनंदले होते मी! इतकं सोपं असतं जीवनसंगीत?
माझ्या डोळ्यांतल्या या प्रश्नाला जाणून पुन्हा गूढ हसलास.
'बस, इतकंच? आणि पुढे काय?'
माझ्या ओठांवर येऊ पाहणाऱ्या प्रश्नाला तुझं उत्तर होतं,
'मी आहे ना!'
फिरून तेच गूढ हसू चेहऱ्यावर खेळवत
विस्मयचकित, आल्हादित मला
तानपुऱ्यासह सोडून
निघून गेलास, आलास तसाच, वळवाच्या सरीसारखा.
उत्सुकतेनं, नव्या ओढीनं, उत्साहानं
छेडत राहिले षड्ज-मध्यमात चार तारा दोन बोटांनी,
तू आहेस या दृढ विश्वासावर.

दिवस, महिने, वर्षं, तपं सरली,
तू फिरकलाही नाहीस परत.
बधीर झालेली बोटं रक्ताळून गेलीत,
तारांचा ताण विरत-सरत त्या सैलावून गेल्यात,
आता तर पार तुटायला आल्यात.
तानपुराही बेसूर झालाय,
तू जुळवायला कुठं शिकवलंस?

आता एकदाच ये, तसाच गूढ हसत,
अवचित येणाऱ्या वळवाच्या सरीसारखा,
अन् घेऊन जा तुझा तानपुरा परत
हळुवारपणे गवसणीत घालून.
एक मात्र कर, जाताना पुन्हा एकदा तारा जुळवून
छेडून दे त्याला
त्याच पहिल्या सुरेल षड्ज-मध्यमात.
माझ्या परतीच्या वाटेवर
तेच जीवनसंगीत संगत करील
तुझ्या असण्याची ग्वाही देत.

Saturday, September 21, 2013

द्वंद्व

कुजबुजता, अस्फुट बोल जिवाचा हळवा
प्रत्यक्ष, भास की हुलकवणारा चकवा?
हा कुण्या दिशेने येतो, थांग न लागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

हातून निसटल्या तरल क्षणांची खंत
आकांत उरी अन् दाटुन आला कंठ
निद्रिस्त व्यथेचा लाव्हा उसळू लागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

संदिग्ध भीतिचा जागर अवतीभवती
सर्पिणी रात्रिच्या जहरजिव्हा लवलवती
हो पिशाच्च भीषण गतकाळाचे जागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

जाळ्यात अडकल्या कृमीसारखा जीव
ओलांडू बघतो जन्म- मृत्युची शीव
सोडती न त्याला चिवट स्मृतींचे धागे
मी पुढे निघावे की परतावे मागे?

Monday, September 9, 2013

सावट

करा अंगारे-धुपारे
मीठमोहऱ्या ओवाळा
करकरीत सांजेला
ऊद-कापूर की जाळा

गुण्यागोविंदानं नांदे
हिला दीठ ग लागली
हिच्या आगेमागे फिरे
कुणी अदृश्य सावली

काळवंडली ग काया
हिचा उतरला रंग
जीवघेणा ठरला ग
कुणा पातक्याचा संग

वैद्य-हकीम बोलवा
लेप मागवा चंदनी
विष चढे, सुन्न पडे
सखी नाजूक, देखणी

हिच्या लख्ख रुपावर
पडे सावट कसलं?
नव्हाळीच्या वेदनेला
जिणं जहरी डसलं 

Wednesday, September 4, 2013

बंदिशी

शुभ्र जीवघेणे काहीसे
लख्ख अभ्रकी वेशामधले
निळ्या नदीच्या काठावरचे
दूत दूरच्या देशामधले

असावीत स्वच्छंद पाखरे
की मेघांच्या मोहक लहरी
की वा-यावर भिरभिरणा-या
स्मरणफुलांची खुळी सावरी?

गुणगुण काही अस्फुट कानी
येते, फिरते, विरून जाते
डोह मनाचा थरथरतो अन्
वलय वलय मोहरून जाते

मौनाच्या घुमतात बंदिशी
आभासाच्या पार तळाशी
शब्द तुझे निष्पाप, निरागस
विखुरतात निर्मळ आकाशी

कवेत घ्यावे त्या शब्दांना
असे येतसे मनात काही
कवळू जाता हरवुन जाते
भवतालाला आणि मलाही

Saturday, August 31, 2013

शेजार

दोघे आपापल्या जागी
जसा डोळ्यांचा शेजार
त्याची प्रकाशाची वाट
माझे अंधाराचे दार

कोसळते माझे घर
सावरायचेही होते
चार किरण घेऊन
त्याला यायचेही होते

भलत्याच जागी नेले
त्याला खुणेच्या ताऱ्याने
आणि पाउले बांधली
मूढ, पिसाट वाऱ्याने

त्याच ठायी उतरला
लख्ख किरणांचा भार
अधिकच काजळला
माझा अहेव अंधार

आता त्याचा पायरव
मनातच थिजणार
आणि कोरड्या कढांनी
रिते घर भिजणार 

Wednesday, August 28, 2013

ठिगळ

कधी उकलते, कधी न कळते मनाची कथा
निवांत असता कशी उमळते पुराणी व्यथा?
नको असुनही गळ्यात पडते अभागी जिणे
कुठे परवडे अशा अडनिड्यासवे चालणे?

मना, उमलत्या कळ्या नकळता सुकाव्या जशा
तुला सतत का उदास प्रतिमा स्मराव्या अशा?
क्षणात हसणे, क्षणात रुसणे, क्षणी तापणे
तुलाच जमते हवा बदलते तसे वागणे

जरा निवळता उदासपण का ऋतू पालटे?
छळे कलह आतला फिरुन पाहुनी एकटे
दुकान सजते जुने नवनव्या विकारांसवे
शिळेच दुखणे नव्या चटकदार स्वादांसवे

उणे-अधिक बोलणे विसरुनी पुढे जायचे
असे ठरविले तरी समर संगती यायचे
मनास म्हणते पुरी करुन येथली संगरे
निघून दुसऱ्या दिशेस वळवायचे मोहरे

जुनी जखम जागते, विव्हळते तशी वेदना
अखंड झिजण्यामधून कुठली नवी प्रेरणा?
अनादि जगणे, अनंत मरणे कुणा भावते?
तरी ठिगळ पैठणीस मखमालिच्या लावते !

वृत्त - पृथ्वी 

मायबापा

विकल, विवश चित्ती वासनांचा विखार 
जनन-मरण यांचा व्यर्थ हा येरझार 
विफलपण हरोनी शांतवी अंतरंगा 
अगणित करुणेच्या सागरा पांडुरंगा

सगुणपण तुझे मी नित्य नेत्री भरावे 
अनवरत हृदी या निर्गुणाला स्मरावे 
समचरण पुजावे टेकुनी नम्र माथा 
विनित पतित भक्ता उद्धरी विश्वनाथा 

जड तनु वितळावी आणि मी मुक्त व्हावे 
चरणरजरुपाने पायरीशी रमावे 
भ्रमित जगत मिथ्या भौतिकाचा पसारा 
शरण तुज अरूपा, तूच अंती निवारा 

पसरुन विरलेली फाटकी जन्मझोळी 
विनवित विठुराया भाबडी, दीन, भोळी 
हरण करुनि न्यावे भोग, संताप, व्यापा 
चल-अचल जगाच्या एकल्या मायबापा

वृत्त - मालिनी 

विणकाम

विणीचं गणित जमावं लागतं ग 
नुसतेच टाके मोजून नाही चालत,
थोडं डोकंही चालवावं लागतं.

एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ 
इतकंच ऐकून उतावीळपणे केलेली सुरुवात, 
अन् मग न संपणारा बेढब, बेंगरूळ पसारा 
आवरता आवरेना, म्हणून वैतागून अर्धवट टाकलेला 

युक्तीनं एकेक कमी करत करत 
वाढवलेल्या आठांचा पुन्हा एक करायचा असतो 
हे जर वेळीच जाणून घेतलं असतंस 
तर सोपं नसतं झालं विणकाम?
पसरली असती अधुऱ्या-अपुऱ्या विणींची चळत, 
विसविशीत बेरंग लोकरींची गुंतवळ,
बोथट, गंजलेल्या सुयांची अडगळ घरभर?
घडलं नसतं काही सुबक, सुंदर, उबदार, हवंसं?

आता कधी शिकणार आहेस नेटकं न् नेमकं विणायला,
अख्खं आयुष्य विस्कटल्यावर?

सांग माझ्या अंतरा

सौख्य नाकारून का घेसी व्यथेचा आसरा?
सांग माझ्या अंतरा

पाखरांचे सूर ओले आर्जवी अन् भाबडे
कोवळ्या ताज्या फुलांचे गंधस्मित ना आवडे
व्यर्थ पाचोळा जपावा का झुगारत मोगरा?
सांग माझ्या अंतरा

वाट बहराची तरीही वेदना का संगती?
सप्तरंगांच्या महाली फक्त काळ्या आकृती
का तुला आकर्षिती, रंगांधता येते भरा
सांग माझ्या अंतरा

शांत आलापीत येते आर्तता का अल्पशी?
मारवा, बागेसरी अन् जोगियाच्या बंदिशी
आळवीसी, का न गासी नंद, दुर्गा, शंकरा?
सांग माझ्या अंतरा

Wednesday, August 21, 2013

घर

घर होते की नव्हतेच कधी?
साक्षी न कुणी, पुसणार कुणा?
भरतीच्या लाटांनी पुसल्या 
उरल्यासुरल्या अस्तित्वखुणा

उरल्यासुरल्या अस्तित्वखुणा
पुसण्याने जगणे सुटते का?
गळली पाने, वठल्या फांद्या
फुटण्याची ऊर्मी वठते का?

फुटण्याची ऊर्मी वठते का?
बहरेनच, जिद्द जरी होती
स्वातीच्या थेंबांतुन टिपले
कितिएक शिंपल्यांनी मोती?

कितिएक शिंपल्यांनी मोती
घडवून दिले अन् किति गळले
पाठी उरले अवशेष रिते
भर ओसरला तेव्हा कळले

भर ओसरला तेव्हा कळले
घटका भरली, सरला अवधी
निमिषातच होत्याचे नव्हते
घर होते की नव्हतेच कधी?


[वृत्त - पादाकुलक]

Tuesday, August 20, 2013

फुंकर

धुपाटण्यातल्या मंदशा निखाऱ्यावर 
झपाटून टाकणारा सुगंधी ऊद जाळत
हातातला मोरपिसांचा पंखा जोरजोरात हलवत 
घुमटातल्या घंटेच्या दीर्घकाळ घुमणाऱ्या प्रतिध्वनीसारखा 
घनगंभीर अलख जागवत दारी आलेल्या 
गूढ, करुणामय डोळ्यांच्या फकिराच्या झोळीत 
पसाभर धान्य घातल्यावर 
मोरपिसांचा पंखा मस्तकावर अलगद टेकवून 
शुभ्र दाढी-मिशांच्या जंजाळात दडलेल्या ओठांनी
अनाकलनीय आशिर्वाद पुटपुटत
अन् डोळ्यांत रहस्यमय हसू खेळवत
त्यानं धुपाटण्यातली चिमूटभर राख तळहाती घेऊन
दात्याच्या दिशेनं फुंकून टाकावी,

तसं, अगदी तस्संच, माझ्या मोरपिशी स्वप्नांचा पंखा
मस्तकी अलगद टेकवून फुंकून टाकलंय माझं आयुष्य
तुझ्या दिशेनं, कुणा अदृश्य फकिरानं .......

काय घातलं होतंस त्याच्या झोळीत,
माझ्यासाठी? 

Saturday, August 17, 2013

संभाषण

जन्मात एकदा होते संभाषण हे ओझरते 
तो दूर दूर दरवळतो, मी आत आत मोहरते 

तो व्यापुन अंतर माझे, मी अविरत त्याच्या चित्ती 
मनस्मरणीवर स्मरणांना जपताना पुलकित वृत्ती 

मी मूर्त समर्पण, त्याच्या मीलनात माझी मुक्ती 
तो भावपूर्ण कवितेचा आशय अन् मी अभिव्यक्ती 

मी देहरूप, तो माझ्या गात्रांत फुंकतो प्राण 
तो वचनपूर्तिचा शब्द, मी शतजन्माची आण

मी उत्कटता, संयम तो; आरंभ तो नि मी पूर्ती
अद्वैताची परिसीमा, तो सृजन आणि मी स्फूर्ती 

Friday, August 16, 2013

निरुत्तर

सहज कुणीसा प्रश्न टाकला 
क्षणात सारी सभा निरुत्तर 
'सहजीवन की असह्य जीवन?'
सरळ प्रश्न पण अवघड उत्तर 

बसुन तटावर खेळ कुणाचा 
शांत डोह खळबळे निरंतर 
अगणित वलये, लाख बुडबुडे 
जसे निखळले नाजुक झुंबर

सरळ वाट, सुखकर यात्रेला
भुलवी कुठले जंतरमंतर
चार दिशांना चार प्रवासी
जवळिकीत जन्माचे अंतर

सहजच घडले असा दिलासा
जाणुन उमजुन घडल्यानंतर
चुकून उघडी कुपी ठेवता
वाऱ्यावर उडते ना अत्तर?

Wednesday, August 14, 2013

अश्वथाम्याची छाया

माझ्यातुन माझ्याकडची
ही वाट निबिड, एकाकी
संपत आले मी, सरले
निर्वाण तरीही बाकी

जरतार वस्त्र विरले की
लक्तरेच उरती हाती
जाणते, तरीही जपते
क्षणकालिक फसवी नाती

मीपण माझे फुलवावे
इतकाच मनाला चाळा
घालून गळा मिरवाव्या
निर्माल्यामधल्या माळा

झोकून जीव द्यावा मी
अक्षय संकल्पासाठी
तो कुणी अनामिक शक्ती
लोटून देतसे पाठी

मी फुले वेचली तेथे
पसरावे कोणी काटे
घरकुल माझे मोडावे
का अन्य त्रयस्था वाटे?

चिरकाल जिव्हारी आता
भळभळणाऱ्या जखमा या
आयुष्य अमर तळमळत्या
अश्वथाम्याची छाया 

Monday, August 12, 2013

सांजऋचा

तुरळक मेघ निळ्या फलकावर फुंकर मारुन पांगवले 
अलगद रंगछटा बदलून भुरे-पिवळे-भगवे-ढवळे
उधळुन लाल गुलाल तशातच स्वर्णिम-केशर वर्ख दिला 
पसरून किंचित श्यामल रेशिम सुंदरसा पट रंगविला 

अतिरस त्यागुन तांबुस मोहक भास्कर-रूप प्रसन्न दिसे 
दिनभर तापुन जीवन व्यापुन स्वत्व समर्पुन तृप्त असे 
परतुन जात असे तरिही अनुपम्य प्रभा रमणीय किती 
अधिकच सात्विक आणि अलौकिक तेजशिखा किरणे दिसती

किलबिल चंचल वाढतसे, घरट्यात पुन्हा फुलणार सुखे
भरवुन घास पिलांस, निरागस स्नेह मिळून प्रसन्न मुखे
परत घरी निघतात गुरे गिरवीत धुळीतुन पायखुणा
अगणित भावुकशा कविता, हळवी कवने सुचतात कुणा

प्रतिपल एक नवीनच दृश्य प्रशांत क्षितीजतळी दिसते
नवल किती, मन कुंठित बालक होउन त्यात रमे नुसते
बहुविध अद्भुत सांजऋचा घनगंभिरशा श्रवणी घुमती
सहज नितांत सुरेख चितारुन चित्र प्रभू करि गुंग मती


[वृत्त - श्रवणाभरण]

Friday, August 9, 2013

चकवे

इथला वनवास नकोच मना
विषघोट नकोस गिळू कडवे
चल दूर, निबीड तमात बुडू
असतील जिथे गहिरे चकवे

निमिषात निशा, निमिषात उषा
प्रहरात जगू क्षणमात्र जरी
असतील जिथे ढग कोंदटसे
झरतील तिथेच कधी शिरवे

अभिजात इथे न कुणास रुचे
इथल्या सगळ्याच रिती भलत्या
हरवून निरामयता, शुचिता
उरलेत दुवे नकली, नटवे

घनदाट असेल अरण्य जरी
करतील सुसह्य तुझ्या मनिषा
चकव्यातुन दाविल वाट खरी
चिरकाल तुझे असणे हळवे

विसरून जगास जगेन तरी
वगळून तुला कुठले जग रे?
सगळेच तुझे अलवार किती,
शपथा, वचने, रुसवे-फुगवे


[वृत्त - तोटक]

प्रतिभे

दिस दोन हवेत मनोज्ञ असे 
मग संततधार झरो दुविधा 
क्षण मी तळपेन जशी चपला 
जरि जन्म पुरा जळती समिधा 

घनदाट तृणात भुजंग, तरी
फुलतात निरागस रानफुले 
अवसेपुरते तमजाल, पुन्हा 
झुलणार नभावर चंद्रझुले

पथ दुर्गम आणि अरुंद जरी,
सृजनासमवेत प्रवास हवा
मळभातुन, सांद्र धुक्यातुनही
उजळेल प्रसन्न प्रकाश नवा

कुठल्या वळणावर भेट तुझी
अनमोल घडेल सखे कविते
इतके अवधान कुठे? तरिही
घट अंतरिचे करतेच रिते

निमिषार्ध पहा थबकून जरा,
मन मूढ तुझ्या पदि शांत उभे
कवळून नको हृदयास धरू,
पण उज्ज्वल आशिष दे प्रतिभे


[वृत्त - तोटक]

Monday, August 5, 2013

हासता मी

कोणत्या जन्मातले हे गूढ नाते?
हासता मी हास्य कोमेजून जाते 

भोवताली गल्बला होतो नको तो,
हासता मी केवढा उत्पात होतो 

क्षार मागे शांतवाया ती भुकेला,
हासता मी कंठ फुटतो वेदनेला 

भाबडा आनंद होतो वीतरागी
हासता मी वादळे होतात जागी

जाणते ती आतली अव्यक्त भाषा
हासता मी मावळे दुर्दम्य आशा

वाटते त्याला, पुन्हा आघात झाला
हासता मी दु:ख येते सांत्वनाला

जन्म अवघा मारवा रंगून गातो
हासता मी आसवांचा तोल जातो

फिकटला, विटला मुखवटा हा गळेना
हास्य माझे बेगडी, तरिही ढळेना 

अपेक्षा

अपेक्षेप्रमाणेच आयुष्य जावे 
असे वाटणे केवढी मूढता 
विधीच्या विधानास आव्हान देत्या 
निराळ्या कथेला नसे मान्यता 

इथे जे घडे, पूर्वसंचीत सारे 
तुला भोगणे प्राप्त आहे मना 
सुखे लाभती त्याहुनी जास्त दु:खे 
तुलावी कशी प्रेरणा-वंचना?

न किंतू धरावा, न काही अपेक्षा
सभोती असो वा नसोही कुणी
स्वतः आखुनी घेत जाव्यात कक्षा
वसावे कुठे आणि कोण्या क्षणी

धरावा असा मार्ग जेथे न थांबा,
निघावे दिशा घेउनी संगती
असो घाट वा वाट साधीसुधी ती,
मिळो सारखी पावलांना गती

जिथे शांततेच्या निनादासभोती
घुमाव्यात मौनातल्या बंदिशी
अशा गूढ देशी उषा जागवावी,
अशा मुक्त क्षेत्री विरावी निशी


[वृत्त - सुमंदारमाला]

भातुकलीचा खाऊ

शिंग मोडल्या कपिलेचं गोंडस वासरू 
कोवळासा चिगूर, गाभुळलेली चिंच 
कैरीच्या चिकानं माखलेली सकाळ,
आजोळची आमराई हिरवीकंच

नरसोबाच्या पारावर गणपतीचा मेळा
नऊवारी गुंडाळून चवळीची शेंग
भक्त बाळ प्रल्हादाचं रंगलेलं कीर्तन,
खारुलीच्या डोळ्यांवर साईसारखी पेंग

आजोबांच्या फेट्यात जास्वंदीचा तुरा
आजीच्या हातावर मेंदीचा काला
मुरमुऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची चिक्की,
कान्होबाची दहीहंडी, गोविंदा आला!

कौलावरच्या वानराला दावलेल्या वाकुल्या
ओसरीवर मांजरींच्या भांडणाची नक्कल
मोत्याशी झटापट, पाडीमागे पळापळ
रोज नवी खोडी, रोज नवी शक्कल

लडिवाळ, खोडसाळ, खळाळतं बालपण
मोठेपणात शिरलं पुस्त्या-वह्या गिरवुन
सरलं, थोडंफार उरलेलं जपलंय
भातुकलीचा खाऊ, तसं पुरवुन पुरवुन ...... 

अलख

नकोसे वाटे हे समर, दुबळा जीव थकला
दिशांच्या गर्भाशी तम वितळले, सूर्य झुकला
जराशा श्वासाने मरण सरले, दु:ख उरले
हवी होती मुक्ती, क्षण निसटला, नेम हुकला

निळ्या डोहाकाठी गळुन पडले पंख इवले
तरंगांच्या ओठी शिशिरहळवे गीत दबले
कुणा पाकोळीचा करुण भिजला आर्त स्वर तो
भुलावा होता की पुसट चकवा हे न कळले

फकीराचा यावा अलख घुमता ती गहनता
भरे संध्याकाळी गगन तमरंगात ढळता
तिथे माझी काया सरण नसुनी मूक जळते
तुझी गीते गाती सजल नयनांची विकलता


[वृत्त -शिखरिणी]

Wednesday, July 24, 2013

ओजस दान

रेशिमधारा झुळझुळती 
की स्फटिकमण्यांचे ओघळ झरझर पाणी?
पाण्यावर थेंब थिरकती 
घुमतात दिशागर्भात ऋतूची गाणी 

पाचूची लखलख पाने 
मिरवती हिरकण्या की पाऱ्याची नक्षी?
नक्षीचे पंख भिजवुनी
पाऊस पांघरुन थेंब उधळती पक्षी 

अभ्रांतुन रत्नतुषार 
ऋतु सळसळता उल्हास पेरतो चित्ती 
चित्ती उन्मेषतरंग 
यमनात लख्ख गंधार, उजळती वृत्ती

रंध्रांरंध्रांतुन गंध 
तृप्तीने गहिऱ्या दरवळणारी माती
मातीची फुलते काया 
सृजनाचे ओजस दान लाभता हाती 

Saturday, July 13, 2013

भरारी

संकल्प मोडवेना अन् ध्यास सोसवेना 
हल्ली मलाच माझा सहवास सोसवेना 

फांदीस होत ओझे, देठास भार वाटे
वाऱ्यासही कळ्यांचा निश्वास सोसवेना

झटक्यात जायचा तो थांबून जीव राही
अस्वस्थ भावनांचा गळफास सोसवेना

जाणीव शब्दवर्खी अन् शब्द मर्मस्पर्शी
माझीच मांडलेली आरास सोसवेना

वेड्या वसंतकाळी ग्रीष्मात गुंतले मी
आता अखंड झरता मधुमास सोसवेना

वाटे असेल काही अस्तित्व सावलीला
कोठे, कसे, किती हा अदमास सोसवेना

कापून पंख केला उन्माद जायबंदी
स्वप्नातली भरारी सत्यास सोसवेना

मर्म

निद्रिस्त होत्या मुक्या जाणिवा तेवढा काळ होता सुखाचा जरा 
निर्भेळ, निर्लेप, निष्पाप आनंद देई प्रवाही, कुठे तो झरा?
जागा जसा होय ज्वालामुखी, जागली का जिगीषा तशी या मनी? 
आवेग ओसंडणारा नवे जाणण्याचा गळा फास झाला खरा!

आनंद घ्यावा तसा तो लुटावा अशी फक्त होती मनोकामना
उत्साह, उल्हास, उत्कर्ष, उन्मेष यांचीच भक्ती तशी साधना 
वाटे करावी, पुजावे गुणांना उगाळून ही चंदनाची कुडी 
येथे परंतू भल्याच्याच भाळी कुठारी रुताव्या, तशा यातना

होणे हतोत्साह आहे चुकीचे, मनाला कळूनी वळावे कसे?
वाळून गेली जळू देत पाने, नव्या पालवीने जळावे कसे?
आरंभ झालाच नाही जिचा ती कहाणी असावी, तसा जन्म हा 
अंतास येऊन संदिग्ध आहे, खरे मर्म त्याचे कळावे कसे?

आसक्त व्हावे असा ध्यास नाही, निरासक्त होणे नको वाटते 
दाही दिशांतून येतात हाका, तरी मुक्त होणे नको वाटते 
का मांडला खेळ लावून आयुष्य सारे पणाला, कुणी जाणले?
आता तरी आवरावा पसारा, इथे व्यक्त होणे नको वाटते

'जाणून घे आत्मक्लेशातली फोलता आत्मघाताहुनी पातकी 

अस्तित्व आहे तुझे फक्त ओझे अशी भावना सार्थका घातकी 
ही हीनता कालसापेक्ष व्हावी, नसावी सदा-सर्वदा सोबती 
झाकोळलेल्या दिशाही धुके पिंजता पांगता स्वच्छ होतात की!'

कष्टी मनाला असा धीर देता निमाली क्षणी संभ्रमी वादळे 
उद्विग्नता दूर झाली, पळाली निराशा नि आकाश हो मोकळे 
कर्तृत्व, कर्तव्य, धैर्यामुळे लाभते जीवनाला हवीशी गती,
आयुष्य नाही पटी मांडल्या आंधळ्या सोंगट्यांचा पसारा, कळे


[वृत्त - मंदारमाला]