Tuesday, January 28, 2014

आयुष्या

नकोसा होतसे हल्ली तुझा शेजार आयुष्या
तुलाही वाटतो ना सांग माझा भार आयुष्या?

कुणीही कोणत्याही कारणांनी फायदा घ्यावा
कशासाठी असा झालास तू लाचार आयुष्या?

तुला जाळून तू केल्या खुल्या वाटा प्रकाशाला
दिव्यांनी माखला माथी तुझ्या अंधार आयुष्या

सुखांनी ताप वाढावा, व्यथांनी प्राण गोठावा
तुला हा कोणता झाला नवा आजार आयुष्या?

नको थोटी अपेक्षा अन् नकोसे पांगळे नाते
तुझा तू घे, मला माझा पुरे आधार आयुष्या

तुला नाकारण्याचाही नकोसा वाटतो धोका
तुला सांभाळणेही जोखमीचे फार, आयुष्या!

जरासा स्पर्श होण्याने मने रक्ताळती का रे?
कट्यारीची तुझ्या निष्पापतेला धार आयुष्या

पुरे खंतावणे आता, निरोपाच्या क्षणाआधी
दिले तू जे तुझे, घेऊन जा साभार आयुष्या


Thursday, January 16, 2014

व्यक्त

मन रान
रान घनदाट
मिळेना वाट
कसे विहरावे?
मन तान
तान जणु लाट
कवळिते काठ
किती लहरावे?

मन डोह
डोह तमव्याप्त
गहन खोलात
भाव दडलेले
मन मोह
मोह तनव्याप्त
रोम-रंध्रांत
गूज अडलेले

मन सुप्त
सुप्त नागीण
आत्मरत क्षीण
कात सांभाळी
मन गुप्त
गुप्त जाखीण
अतर्क्य कठीण
समज कवटाळी

मन नीज
नीज अलवार
स्वप्न सकवार
तरी तुटते का?
मन वीज
वीज जरतार
कुठे पडणार
कुणा कळते का?

मन मूढ
मूढ भयभीत
खोल खाईत
निखळता तारा
मन गूढ
गूढ संगीत
अगम्य लयीत
घुमतसे वारा

मन ताप
ताप अनुताप
भरेना माप
भलेपण गळते
मन व्याप
व्याप अभिशाप
कुणाचे पाप
कुणाला छळते

मन मुक्त
मुक्त अशरीर
विरक्त फकीर
झुगारुन माया
मन व्यक्त
व्यक्त गंभीर
तरीही अधीर
भास कवळाया