Friday, November 26, 2010

आई, तुझ्या अंगणात

आई, तुझ्या अंगणात आले हरवून
एक खट्याळ बाहुली, सानुलीशी भातुकली,
कोजागिरीचा चांदवा, हळदीचं ऊन!

आई, तुझ्या अंगणात धुंद निशिगंध,
लाजबावरी अबोली, निळ्या गोकर्णाच्या वेली,
जाई, मोगरा, चमेली, प्राजक्ताचा गंध!

आई, तुझ्या अंगणात विसावे उन्हाळा,
कुरड्या, पापड, सांडगे, शुभ्र शेवयांचे चोंगे,
थंडगार सरबत, त्यात लिंबू-वाळा!

आई, तुझ्या अंगणात भिजली हिरवळ
पावसात चिंब चिंब, वेचलेले थेंब थेंब.
वाफाळल्या चहातल्या आल्याचा दरवळ!

आई, तुझ्या अंगणात दिवाळी पहाट
तुझे भूपाळीचे सूर, आकाशदिव्याचा नूर,
पणत्यांच्या रांगा आणि रांगोळ्यांचा थाट!

आई, तुझ्या अंगणात आनंदाच्या राशी
लपाछपी, काचापाणी, रात्री पर्‍यांची कहाणी,
आता फक्त आठवणी, तुझ्यामाझ्यापाशी!

Sunday, November 21, 2010

त्रिधारा - आठवणी

त्रिधारा - आठवणी

* आठवणींचे शंखशिंपले
बालपणीच्या नदीकिनारी
मोठेपण विसरून वेचले!

* थंडी मरणाची, गोठले आभाळ,
जात्या जिवासाठी आता हवी आई
तुझ्या आठवांची उबदार शाल!

* काचाकवड्या, सागरगोटे,
आठवणींचे खेळ रंगता
प्रौढत्वाला हेवा वाटे!

* आठवणींच्या पडद्याआडून
एक निरागस, लोभस चेहरा,
मलाच शोधतोय लपून-छपून!

* आठवणींचे किरण कोवळे
भल्या पहाटे जागविती अन्
आठवणींतच सांज मावळे!

Thursday, November 18, 2010

अर्थ आहे

आज हा जाई, उद्याला अर्थ आहे
का जुने आता? नव्याला अर्थ आहे

जायचे आहे पुढे, जाणार आहे,
व्यर्थ मागे थांबण्याला अर्थ आहे?

भेकडांचे टोमणे झाले निकामी,
काय त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे?

दाट काळोखास मी का घाबरावे?
दीप नाही? काजव्याला अर्थ आहे!

का उगा चिंता, उद्या येईल कैसा?
जे जसे होईल, त्याला अर्थ आहे!

सूर ल्याले सूर्यबिंबाची झळाळी, 
सांजवेळी मारव्याला अर्थ आहे

माळ ना या मोकळ्या केसांत थोडे,
त्याविना का चांदण्याला अर्थ आहे?

Sunday, November 14, 2010

म्हटले होते

आषाढघनांचे गाणे वेचावे म्हटले होते
रंध्रांत सुरांचे नाते पेरावे म्हटले होते

जो माझ्या वाटेवरती पेरून चांदणे गेला,
त्या लोभस आनंदाला भेटावे म्हटले होते

एकाकी अभिमन्यू मी, लढले पण अंती हरले
नियतीच्या चक्रव्युहाला भेदावे म्हटले होते

हातात उरे इतकासा  चतकोर फाटका तुकडा,
आभाळ तुझे सवडीने झेलावे म्हटले होते

मी ऐन क्षणी चुकले अन् सोंगट्या पटावर थिजल्या
हा डाव जिंकण्यासाठी खेळावे म्हटले होते

Saturday, November 13, 2010

त्रिधारा - स्वप्न

* स्वप्न खुळे डोळ्यांतच थिजले
पापणीस ना नीज जराशी,
थकून भागुन स्वप्नच निजले!

* तुझे स्वप्न चंचल पार्‍याचे
क्षणात दिसते, क्षणात लपते
भिरभिरणारे घर वार्‍याचे

* स्वप्न पाहणे राहून गेले
काजळकाळे काठ भिजवुनी
आसवांसवे वाहून गेले!

* आतुर मनाला स्वप्नाची चाहूल
सांजेपासूनच डोकावे दारात,
कधी अंगणात वाजेल पाऊल?

* काचेचं स्वप्न, ते टोचेलच ना?
डोळ्यांतून पडलं, खळ्ळकन फुटलं,
काळजाला तुकडा बोचेलच ना?

Wednesday, November 10, 2010

पापण्यांना भार झाली आसवे

चांदणेही ढाळते माझ्यासवे
पापण्यांना भार झाली आसवे

मी कधी त्याचीच होते, अन् अता,
नावही माझे न त्याला आठवे

वेदना माझ्या किती मी साहिल्या,
आज का त्याची व्यथा ना साहवे?

सांग ना हा कोणता आला ऋतू?
अंतरी आशा नव्याने पालवे

जा, मला बोलायचे नाही सख्या,
[बोलल्यावाचूनही ना राहवे!]

त्रिधारा - शब्द

त्रिधारा हा माझा एक नवा प्रयत्न. तीन ओळींच्या कविता हा प्रकार तसा नवा नाही. गुलजारजींची त्रिवेणी आपण सारेच जाणता. जपानी हायकू हाही तीन ओळींच्या कवितेचा प्रकार.
माझ्या या तीन ओळींच्या धारा मिळून बनलेली त्रिधारा. प्रत्येक ओळीत दहा ते अकरा अक्षरे आहेत, बाकी मात्रा-वृत्त असं काही बंधन नाही. यमक पहिल्या आणि तिसर्‍या ओळीत.
या पाच त्रिधारा "शब्द" या एकाच विषयावरच्या आहेत.


* शब्द जसे गंधहीन वारा
उघडे अत्तर उडून जावे,
तसा उडाला अर्थच सारा!

* शब्दांच्या पलिकडले काही,
अर्थ जयाचा गहन, गूढसा
मौन एकटे बोलत राही!

* शब्द उमाळे, शब्द उसासे
बघता बघता विरून गेले,
उधार दे ना शब्द जरासे!

* तुझे शब्द की गाणे सुंदर?
की माझा अंधार उजळते,
लखलखते तेजस्वी झुंबर?

* भिरभिर शब्दांचा पाचोळा
वार्‍याने उधळला नभावर,
ओंजळीत मी केला गोळा!