Friday, February 25, 2011

फक्त दे तू हात या हातात माझ्या

फक्त दे तू हात या हातात माझ्या,
सप्तसागर लंघुनी जाईन मित्रा,
दूर अज्ञातात मी राहीन मित्रा,
गीत मुक्तीचे नवे गाईन मित्रा,
फक्त दे तू हात या हातात माझ्या!

फक्त दे तू हात या हातात माझ्या,
श्वास उरलेले क्षणांचे बुडबुडे रे,
कंठ दाटे, पापणी का फडफडे रे?
प्राणपाखी झेप घेई तुजकडे रे,
फक्त दे तू हात या हातात माझ्या

फक्त दे तू हात या हातात माझ्या,
आणि होइल अंत माझ्या वेदनांचा,
साचलेल्या, कोंडलेल्या भावनांचा,
जाणिवांचा, वंचनांचा, यातनांचा,
फक्त दे तू हात या हातात माझ्या!

फक्त दे तू हात या हातात माझ्या,
स्पंदनांचा भार आता वाहवेना,
क्षणभराचाही दुरावा साहवेना,
ये सख्या मृत्यो, तुझ्याविन राहवेना,
फक्त दे तू हात या हातात माझ्या!
Sunday, February 20, 2011

पडू नये


येते मनात ते का सारे घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
वाटा नव्या जगाच्या हाकारती मला,
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
आनंदसोहळ्याला हे दार वर्ज्य का?
का नौबती सुखाच्या येथे झडू नये?
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये
काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?
आजन्म जीवनाचा मी शोध घेतला,
हे दैवजात होते, ते सापडू नये!

Thursday, February 17, 2011

जोगी

सृजनाचा अनवट राग,
तशी अलवार फुलांची जाग
कुणि अलख गर्जतो जोगी,
त्याला स्वप्न हवे ते माग

दंवभरल्या डोळ्यांतून सांडते
सांजनिळे आभाळ,
ऋतुस्पर्शी आर्जव त्याच्या ओठी,
तुझा मूक अनुराग!

अव्यक्तामधुनी व्यक्त विलक्षण भाव,
जसा घननीळ
मुरलीतनु स्पर्शुनी उधळित जाई
धुंद रंग-रस-राग!

अनुरक्त तुझ्यावर चंद्र
घुमवितो चांदणहळवी शीळ
उतरेल खुळा ग, धरून येइल
चंद्रकळेचा माग!

देहावर गोंदणखूण,
प्राण स्पर्शून सखा वेल्हाळ
जाईल घेउनी नीज,
तुला ग जन्मभराची जाग!

Wednesday, February 2, 2011

तुझा दोष नाही


तुझ्या पातिव्रत्यास अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही
खरे नेहमी भोगती हीच शिक्षा, तुझा दोष नाही!
तुझ्या सोबतीला कुणीही न येथे, तुझा आसरा तू,
तुझ्या सावलीला तुझी ना प्रतिक्षा, तुझा दोष नाही
तुझा धर्म मानव्य, त्याला नसे आकृतीबंध काही,
नसे ग्रंथ, ना चौकटी की न दीक्षा, तुझा दोष नाही!
तुझ्या मुक्त काव्यातही छंद आहे, खुला बंध आहे
कुणा लेख वाटो, कुणाला समीक्षा, तुझा दोष नाही!
दिली लक्ष्मणाने तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही!
तुझी तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा तूच कैदी,
तुझा तू गुन्हा अन् तुझी तूच शिक्षा, तुझा दोष नाही?