Saturday, July 30, 2011

देणगी

दैवयोगे देणगी दोघांस काही लाभली,
चांदणे त्याला, मला त्या चांदण्याची सावली

वेढता त्याच्या दिठीने जागल्या संवेदना,
जाणिवा झंकारल्या अन् स्पंदने नादावली

बोललो जागेपणी झोपेत बोलावे तसे,
काल झाली भेट ती स्वप्नातली का वाटली?

ही फुले, ही वेल कुठली? गंध नवखा कोणता?
बोलला, "कविता तुझी बागेत माझ्या लावली!"

मी म्हणाले, "भेट काही तू मला नाही दिली"
एक गाणे ठेवले, अन् मूठ माझी झाकली!

Wednesday, July 27, 2011

बहाणे

तसे फार नाही, न होते तुला मागण्यासारखे
तरी शोधले तू बहाणे किती टाळण्यासारखे

कुणी कापले पंख आभाळ देऊन झेपावण्या?
दुजे पाप नाही अशी बंधने लादण्यासारखे

कसे अन् किती काळ न्यावे निभावून मी, सांग ना
असे काय आहे इथे एवढे भावण्यासारखे?

किती वाद, चर्चा, भल्या अन् बुऱ्या बातम्या रंगल्या,
गुन्हेगार आयुष्य होते खरे गाजण्यासारखे!

खुल्या पुस्तकासारखी आज झाली मनाची दशा,
नसे या कहाणीत काहीच रे झाकण्यासारखे!

Monday, July 25, 2011

अन् दिवस सरतसे झराझरा

स्व. हरिवंशराय बच्चन यांच्या 'दिन जल्दी जल्दी ढलता है' या कवितेचा स्वैर भावानुवाद.


वाटेत न यावी रात कुठे
मुक्काम तसाही दूर कुठे?
हे जाणून थकला वाटसरू पाउले उचलतो भराभरा
अन् दिवस सरतसे झराझरा

असतील पिले आतुर, कातर
घरट्यातून नजरा वाटेवर
ही माया देते पंखांना बळ आणि सांगते, ‘त्वरा करा!’
अन् दिवस सरतसे झराझरा

आतूर कोण माझ्यासाठी?
व्याकुळ होऊ कोणासाठी?
मन कळवळते, पाउल अडते, टोचणी उराशी जराजरा
अन् दिवस सरतसे झराझराआणि ही मूळ कविता 


दिन जल्दी-जल्दी ढलता है!


हो जाय न पथ में रात कहीं,
मंज़िल भी तो है दूर नहीं -
यह सोच थका दिन का पंथी भी जल्दी-जल्दी चलता है!
दिन जल्दी-जल्दी ढलता है!

बच्चे प्रत्याशा में होंगे,
नीड़ों से झाँक रहे होंगे -
यह ध्यान परों में चिड़ियों के भरता कितनी चंचलता है!
दिन जल्दी-जल्दी ढलता है!

मुझसे मिलने को कौन विकल?
मैं होऊँ किसके हित चंचल? -
यह प्रश्न शिथिल करता पद को, भरता उर में विह्वलता है!
दिन जल्दी-जल्दी ढलता है!


- हरिवंशराय बच्चन

Thursday, July 14, 2011

वाटा भुलावणाऱ्या

वाटा भुलावणाऱ्या तू टाळ पावसाच्या 
नादी नकोस लागू ओढाळ पावसाच्या 

रेशीमधार झिरमिर पडद्यातला पिसारा 
दारी फुलून आला वेल्हाळ पावसाच्या 

मी ओंजळीत गोळा केली फुले सरींची 
केसांमध्ये लडी तूही माळ पावसाच्या

दाटून गच्च येते, काळे क्षणात होते 
संमोहनात येते आभाळ पावसाच्या

गाठून एकटीला भिजवून चिंब केले,
खोड्या तरी किती या नाठाळ पावसाच्या!

काचेवरील चित्रे थेंबांत रंगलेली,
वेड्या कलाकृती या सांभाळ पावसाच्या 

Monday, July 11, 2011

तुझ्याचसाठी मी लिहिलेली प्रीतीगीते सारी

साहिर लुधियानवी यांच्या फ़नकार या कवितेचा हा स्वैर भावानुवाद.

तुझ्याचसाठी मी लिहिलेली प्रीतीगीते सारी
अगतिकतेने आज आणली विकायला बाजारी

प्रीतीचे मंदिर ज्यांच्यावर बांधलेस, ती गाणी
लोक लावतिल त्यांची बोली, लिलाव होइल त्यांचा
चिंतन माझे, विचार माझे, काव्य-जाणिवा माझ्या,
होइल धातूच्या तुकड्यांनी मोल-भाव सार्‍यांचा

तुझ्याच व्यक्तित्वाशी निगडित असणार्‍या गीतांना
गरिबी माझी केवळ वस्तूमात्र जाणते आहे
तुझ्या रूप-रंगाच्या गाथा विसरुन आयुष्याची
भूक घरगुती गरजांची तक्रार मांडते आहे

कष्ट-कमाई यांची मी सांगड घालत असताना
काव्य-गीत ना माझे माझ्या संगे रहावयाचे
रूपसंपदा तुझी ठेव धनवानाची असताना
अशक्य केवळ तुझे चित्र मी जवळी जपावयाचे!

अगतिकतेने आज आणली विकायला बाजारी
तुझ्याचसाठी मी लिहिलेली प्रीतीगीते सारी


आणि ही मूळ कविता

फ़नकार
मैंने जो गीत तेरे प्यार की खातिर लिखे
आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ...

आज दुकान पे नीलाम उठेगा उनका,
तूने जिन गीतों पर रख्खी थी मोहब्बत की असास...
आज चांदी की तराज़ू में तुलेगी हर चीज़,
मेरे अफ़कार, मेरी शायरी, मेरा एहसास...

जो तेरी ज़ात से मनसूब थे, उन गीतों को
मुफ़्लिसी, जिन्स बनाने पर उतर आई है...
भूख, तेरे रूख-ए-रंगीं के फ़सानों के इवज़
चंद आशीया-ए-ज़रूरत की तमन्नाई है...

देख इस अरसागह-ए-मेहनत-ओ-सरमाया में
मेरे नग़्में भी मेरे साथ नहीं रह सकते...
तेरे जल्वे किसी ज़रदार की मीरास सही,
तेरे खाके भी मेरे पास नहीं रह सकते...

आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ
मैंने जो गीत तेरे प्यार की खातिर लिखे...

- साहिर लुधियानवी

Saturday, July 9, 2011

ती वादाला घाबरते!


कुणी म्हणे "ती खुळीच आहे! संवादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!
चर्चांचा पाऊस रंगतो, ती छत्रीतच बसुन रहाते
गलेलठ्ठ परिसंवादांचे द्वंद्व, धुमाळी दुरुन पहाते
कुणी म्हणे, "निर्बुद्ध, मठ्ठ ती, आस्वादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!
इवल्याशा कोशात स्वतःच्या गुंतुन करते काहीबाही
प्रवाहात झोकून द्यायचे तिला कधीही जमले नाही
कुणी म्हणे, "भित्री मुलखाची, उन्मादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!
समारंभ, सोहळे, मैफली याच्यापासुन अलिप्त असते,
तिच्याभोवती दाहक, जाचक रुढी-प्रथांचे कुंपण असते
कुणी म्हणे, "भलतीच घमेंडी, प्रतिसादाला घाबरते!"
ती वादाला घाबरते!

Friday, July 8, 2011

अर्थाने

भौतिकार्थाने सुखी अन् लौकिकार्थाने?
तृप्त अन् समृद्ध झालो फक्त अर्थाने!

याज्ञसेनी वंचनेची आहुती झाली,
द्रौपदीला जिंकले का व्यर्थ पार्थाने?

सावलीचे दैव पायाखालची माती,
सावली झालीस तूही त्याच अर्थाने 

जीवनाच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू 'मी'
चालले आयुष्य झाकोळून स्वार्थाने

एवढी होती अपेक्षा [फोल ठरलेली]
वंचितांचे दु:ख जाणावे समर्थाने!

वाट थोडी वेगळी चोखाळण्या गेले,
हासली तेव्हाच नियती गूढ अर्थाने!

नकळत सुचलेलं, इथं तिथं सांडलेलं

अखंडित वाहे
आसवांची गंगा
येई रे श्रीरंगा
राधेसाठी!
***************
खेळ संचिताचा
तुझी माझी भेट
आता एक वाट
तुझी-माझी

***************
घर तुझे दूर
क्षितिजाच्या पार
केव्हा तू नेणार
मला घरी?

***************
छबी तुझी माझ्या
चित्तात रहाते
डोळ्यांत पहाते
प्रतिबिंब ॥

***************
सदा मनी राहो
एक तुझा छंद
त्यातच आनंद
पांडुरंगा

नकळत सुचलेलं, इथं तिथं सांडलेलं

साथ तुझी माझ्या
संचिताची ठेव
लेणे हे अहेव
सौभाग्याचे

**************
अजुनही वाजे
वृंदावनी वेणू
भारावल्या धेनू,
वृक्षवेली!

**************
राही सखे रूप
तुझे या मनात
जशी अंबरात
चंद्रकला!

**************
रूप तुझे राही
सदोदित मनी
हीच संजीवनी
वेड्या जीवा!

**************
तुझाच ग हात
सखे हाती यावा
श्रावण झरावा,
वैशाखात!

नकळत सुचलेलं, इथं तिथं सांडलेलं

सांडे जसा माझ्या 
अंगणी गारवा
छेडिती मारवा,
भास तुझे!
****************
सूर आठवा गाईल
तुझा माझा मुक्तछंद
धुंद, सुरेल, स्वच्छंद
प्रीतीगीत!

****************
अपूर्णतेचा ध्यास या मना,
पूर्णत्वाला अंत असे
अखंड, अक्षय आणि निरंतर,
अपूर्णतेची खंत नसे!

****************
भार होई देवा
जिवाला जिवाचा,
आता जाणिवांचा
अंत व्हावा!

****************
अंगणात नाचे माझ्या
खुळ्या पाखरांचा थवा
वृंदावनी सांजदिवा
तेवतसे शांत!


नकळत सुचलेलं, इथं तिथं सांडलेलं

येई आता पांडुरंगा
उजळीत अंतरंगा
झरा वाहू दे कृपेचा,
सुकते रे चंद्रभागा ॥
******************
वेदनांना आता
निरोप देऊ या
सुखाला घेऊ या
सोबतीला

******************
गगनात रोषणाई,
सजे पुनवेची रात
चंद्र पाहुणा दारात
साजिरा हा!

******************
तारकांचा शेला
पांघरून आली
रात्र धुंद झाली
चंद्रवेडी

******************
दर्शनाने धन्य
झाल्या नेत्रज्योती
आसुसली होती
माया वेडी

नकळत सुचलेलं, इथं तिथं सांडलेलंशब्द ना ओठी वसे,
भाव ना नयनी ठसे
बिंब माझे पाहते मी,
रूप त्याचे का दिसे?

*****************
दिसशील तू
चंद्रात, तार्‍यांत,
खट्याळ वार्‍यात
तुझाच भास!

*****************
त्या कविता जातायेता
वळणावळणावर दिसती
प्रत्येक नव्या मुक्कामी
सोबतीस माझ्या असती

*****************
माझा मला नाही
वाटला आधार
तूच तारणार
जीवनाला

*****************
मानली मी देवा
एक तुझी सत्ता
आता माझा पत्ता
तुझे द्वार!

नकळत सुचलेलं, इथं तिथं सांडलेलं

मी हारलो जरासा,
सुस्कारलो जरासा,
चाहूल तुझी आली,
झंकारलो जरासा!
***************


न दिसे कुणा या
जिवाचा आकांत
वादळ हे शांत
व्हावे आता!

***************


धाव वेगी आता
सख्या पांडुरंगा
आसवांची गंगा
वाहीन चरणी !

***************


तुझिया हाती
अदृश्य दोरी
माझी चाकोरी
मला न दिसे

मला न दिसे
माझीच वाट
दिसे विराट
रूप साकार

Thursday, July 7, 2011

संचिताचे झरे

पुन्हा भारलेल्या दिशांतून वारा
खुळावून घेतो तुझ्या चाहुली
पुन्हा त्याच वेड्यापिशा आठवांच्या
घुमू लागती घागरी राउळी

उधाणून येते नदी आसवांची
भरे पापणीकाठ, दाटे गळा
भिजे काजळाच्या प्रवाहात काया
फुटे बांध, आवेग हो मोकळा

ऋचा वेदनांच्या, व्यथांचीच स्तोत्रे
अशी अग्निहोत्रे करावी किती?
जळे होमकुंडात हा जन्म सारा
धुरातून अव्यक्त रेखाकृती


कसा पावसाळा? रिती, कोरडी मी
तुझ्या अंगणी अन् सरींचे ऋतू,
मिटे आतल्याआत माझा पिसारा,
तुझ्या नृत्यकैफात बेभान तू 


तुझा चंद्र, तारे तुला वाहिले मी,
भलेही मला काजळी रात्र दे
तुझी पायरी अमृताने भिजू दे,
मला संचिताचे झरे मात्र दे!

हवे ते कुठे आहे?

कितितरी मिळाले, हवे ते कुठे आहे?
तक्रार नसे पण खंत एवढी राहे 

शोधात कशाच्या तुडवित रानोमाळ
फिरताना अवचित धूसरले आभाळ?

या वळणावरुनी सहज पाहता मागे 
अस्पष्ट आकृती, अर्थ न त्यांचा लागे 

गवसले न काही, हाती केवळ वारा
हातून निसटला स्मरणक्षणांचा पारा

मृगजळासारखे हुलकावुन जाणारे
आयुष्य आर्जवे धुडकावुन जाणारे

कुठल्या वाटेवर भेटुन हरवुन जाते
व्याकुळ शब्दांचे आर्त सुरांशी नाते

संपतो शोध अन् केवळ हुरहुर उरते
जन्माची वणवण सरणावरती सरते


जुस्तजू जिसकी थी, उसको तो न पाया हमने,
इस बहानेसे मगर देख ली दुनिया हमने!


http://www.youtube.com/watch?v=18r1Mls0tEU

निजधामा नेई

मनाच्या अवस्था 
आसक्ती विरक्ती
विठू तुझी भक्ती 
हेच सत्य ||

तुझ्या दर्शनाचा 
अहोरात्र ध्यास
येताजाता श्वास
नाम जपे ||

नको नको झाला
मायेचा पसारा
भौतिकाचा सारा
डामडौल ||

प्रपंच मी केला
नेटकाच देवा
आता तुझी सेवा
हेच ब्रीद ||

तुवा सोपविले 
कार्य पुरे होई 
निजधामा नेई
पांडुरंगा ||

Monday, July 4, 2011

स्वामी समर्थ


वटवृक्ष छायेखाली
नांदती स्वामी समर्थ
अक्कलकोट हे तीर्थ
पुण्यभूमी ||

दत्त अवतार दिव्य
देती भक्तांना आधार
स्वामीभक्तिने उद्धार
जगी होई ||

मूर्ति भव्य, तेज:पुंज
शांत, मायाळू, सात्विक
कृपादृष्टि अलौकिक
भक्तांवरी ||

नित्य पाठीशी भक्तांच्या
स्वामींची कृपाळू छाया
जशी माउलीची माया
बालकाला ||

व्यर्थ जन्म मानवाचा
सद्गुरूवाचून होई
राहो समर्थांच्या ठायी
श्रद्धा  माझी ||

स्वामीनामाचा गजर
मनोभावे आराधना
हीच माझी उपासना
जन्मांतरी ||