Thursday, March 25, 2010

चैत्रगौर

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

Wednesday, March 24, 2010

अक्षय

नाही मनाला कुंपण, कल्पनेला नाही भय
नाही स्वप्नांना बंधन, भावनेला नाही वय

अंतराची नाही क्षिती, मन जाणते मनाला,
शब्द वेगळे तरीही एक सूर, ताल लय

क्षितिजाशी भेटण्याची ओढ गगनधरेची,
सूर्योदय उषेसंगे, संध्येसाठी चंद्रोदय

दारी मोगरा फुलतो आठवणींच्या फुलांनी,
मन पाकळी पाकळी होते येता तुझी सय

मृदु रेशमाचे गोफ तसे ऋणानुबंध हे,
तुझ्या माझ्या नात्यापरी नित्य अभंग, अक्षय

Tuesday, March 16, 2010

समर्थ

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

Friday, March 12, 2010

नाटक

वहिवाटीच्या रस्त्यांना कधि वळण भेटते भलते
मन नव्यानव्या क्षितिजांच्या शोधात अखंडित फिरते

कधि जुन्याच शब्दांमधुनी मी अर्थ वेचते नवखे
परिचयातले जग होते कधि क्षणात उपरे, परके
कधि अनोळखी स्वप्नांशी हक्काचे नाते जुळते

कधि कुणी कुठे गुंतावे, हे संचित ज्याचे-त्याचे
या जन्मजन्मिच्या गाठी, हे ऋणानुबंध युगांचे
तो मोहजाल पसरवितो, मन त्या चकव्याला भुलते

कधि शब्दसुरांशी गट्टी, कधि मौनातुन बोलावे,
कधि पायवाट फुललेली, कधि काट्यांतुन चालावे
त्यानेच ठरविले सारे, तो म्हणेल ते मी करते

नेपथ्य, कथा, पात्रांच्या निवडी त्याने केलेल्या,
मंचावर येण्याआधी भूमिका सिद्ध झालेल्या
मी अलिप्त होउन माझ्या जन्माचे नाटक बघते

Thursday, March 4, 2010

कृतार्थ

माझ्यापाशी चार कोन, तुला वर्तुळाचा ध्यास
कुंपणात माझं जग, तुला क्षितिजाची आस

माझ्या अंगणी कोरांटी, तुला गुलाबाचा छंद
दु:ख माझे गणगोत, तुझा सोयरा आनंद

माझ्या कापल्या पंखांत खोल वेदनेची कळ,
तुझ्या पंखांत पेरते नभ जिंकायाचे बळ

माझी चंदनाची काया, झिजे तरी नाही खंत
वात्सल्याच्या सुगंधाने दर्वळू दे आसमंत

माझ्या चिमणपाखरा, तुझी वाढू दे रे भूक
तुझ्या बोलक्या डोळ्यांत खुळ्या मायेचं कौतूक

तुझी स्वप्नं, तुझा ध्यास, तुझे यत्न व्हावे सार्थ,
तुझी गगनभरारी, माझं आयुष्य कृतार्थ