Thursday, November 21, 2013

चंद्रकळा

दुपारीनं दिलेला जरा जास्तच कोरडा
रखरखीत, पिवळट-पांढुरका रंग पुसत
तिनं उगवतीचे चटक रंग दिले मावळतीला.
जरासा भगवा, चिमुटभर किरमिजी, थोडा सोनेरी पिवळा, बोटभर लाल, कणभर जांभळा अन् इवलासा करडा.
रंगवायच्या नादात जरा जास्तच होत गेला करडा.
नुकतीच घडी मोडलेल्या 
भरजरी पैठणीच्या काठपदरातले रंग
अंगभर डागाळल्यासारखे पसरून तिचं पार पोतेरं करावं 
अवेळी आलेल्या पावसानं, तसं
सगळं चित्रच बिघडत चाललं,
तर तिनं अख्खं आभाळ काळंभोर रंगवलं न् दिली ओंजळभर चंदेरी चमकी उधळून.
पैठणीच्या पोतेर्याचं रंगरूप बदललं
न्
काळीभोर, खडीमाखली चंद्रकळा सजली!

हल्ली ती फक्त चंद्रकळाच मिरवते
कौतुकानं, अभिमानानं ....

Wednesday, November 13, 2013

सीमा

ताणले तेवढे ताणते
दु:ख सीमा कुठे जाणते?

शब्द तोलून बोलायचे
तत्व अंगी पुन्हा बाणते

भेट घेण्यास आसावले
त्या व्यथा, वेदना, ताण ते

मूढ मी, माणसे सोडुनी
सावल्यांनाच वाखाणते!

आर्द्रता भावनांची कुठे?
चित्त नाहीच, पाषाण ते!

नेहमी फायद्याचे नसे
मौन गोत्यातही आणते 

Saturday, November 9, 2013

गणित

सोपी समिकरणे चुकलेली
कठिण प्रमेये भरकटलेली
काळ-काम-वेगाची सांगड
केव्हाची हातुन तुटलेली

कधी लघुत्तम कधी महत्तम
स्थानबदल तर रीतीपुरते
विभाज्य किंवा असो विभाजक
साधारणपण तसेच उरते

दशांशचिन्हापुढे किति घरे
भाग पुरेसा जातच नसतो
उधारीत दशकाची भरती
कुठे हातचा राखिव असतो?

'क्ष'च्या शोधामध्ये निरंतर
अस्तित्वाचा क्षय ठरलेला
सूत्र बरोबर, उत्तर चुकते
अंदाजहि फसतो धरलेला

उरल्या आयुष्यात तरी मी
अचूक गणिते करीन म्हणते
अधिक वेदना, वजा शांतता
शून्याला शून्याने गुणते!

थरथर

नितळ निळ्या शांत पाण्यावर
पावलं टेकली न टेकलीशी वाटावीत
असा भिरभिरत्या पाखराचा पदस्पर्श
अन् त्यानं कळत नकळत उठवलेली
हळुवार, नाजुक, हवीहवीशी मोहक थरथर.....

अत्तराची कुपी रिती झाली
तरी गंध जपून ठेवते अंतरात,
तशीच जपलीय ती थरथर पाण्यानं
अजूनही काळजात खोलवर.....

मी पाहिलीय, अनुभवलीय
आतून...... !

अर्धा डाव

जवळ असुनही कधीच त्याचा ठाव गवसला नाही 
मैलोगणती मुक्कामाचा गाव गवसला नाही 

एक इशारा तिचा, अन् पुरा जन्म पांगळा झाला 
विफलशरण मी, अगतिकतेचा डाव गवसला नाही 

वृथा लादल्या महानतेला जपणे नसते सोपे 
ओढुनताणुन आणू म्हणता आव गवसला नाही 

लिहिल्या म्हणण्यापुरत्या झाल्या भ्रामक गाथा-पोथ्या
केवळ शब्दांचेच फुलोरे, भाव गवसला नाही

आकांताच्या पल्याडचेही दु:ख सोसले होते
गोंदवलेल्या नक्षीमधला घाव गवसला नाही

पट फरपटला आणि सोंगट्या हवेत उधळुन गेल्या
पुन्हा कुठेही उरला अर्धा डाव गवसला नाही 

वाकळ

लाथाडत राही दैव राजरोस
जसा पायपोस फाटलेला
जितेपणी राही घरदार ओस
जगण्याचा सोस आटलेला

कातळात गंगा, सुके पाणओघ
तसा राही जोग संसारात
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे भोग
वंचनेचा रोग जन्मजात

कुठे विकारांची लावू विल्हेवाट?
मन काठोकाठ भरू आले
थोपवू पाहिले जरी आटोकाट
पापण्यांचे माठ झरू आले

जिवापार गेली काळजाची कळ
भावनांचा छळ सोसवेना
जळे प्राण अशी वास्तवाची झळ
देहाची वाकळ सोडवेना