Tuesday, January 29, 2013

अज्ञात

असेल कोणी खुळा गुंतला जीव तुझ्या मोहात सखे,
असेल कोणी यथेच्छ डुंबत डोळ्यांच्या डोहात सखे 

कुणास भुलवित असेल गोऱ्या भाळीची गोंदणटिकली 
असेल कोणी शोधत वेडा प्रीत तुझ्या नजरेमधली

तुझी पैंजणे नादतील अन् कुणी बावरा वळेल ग
तुला जाणही नसेल, त्याची दिठी तुझ्यावर खिळेल ग

कुठेतरी ग असेल कोणी तुझ्याचसाठी झुरणारा
खट्याळ वारा सुगंध उधळित तुझ्याभोवती फिरणारा

असेल कोठे तुझी अर्चना, तुझी साधना करत कुणी
तुझे शब्द-स्वर, तुझीच गाणी असेल चित्ती स्मरत कुणी

असेल तो तर असेल केवळ तुझ्या गोड स्वप्नात सखे
नकोस शोधू वास्तवात, तो असू देत अज्ञात सखे


http://yasakhyannoya.blogspot.in/p/blog-page_26.html या माझ्या सख्यांच्या अंकात प्रकाशित :)

Thursday, January 24, 2013

नांदी

कुंदकळ्यांच्या लागुन कानी
भ्रमर गुणगुणे कुठली गाणी?

स्वरलीपीने नटली फांदी
प्रीतीनाट्याची ही नांदी
भुरळ घालिते मंजुळ वाणी

वसंतातली मोहक रंगत
शरदचांदण्यामधली संगत
रंग-गंध-रसभरित कहाणी

वचने देई मुग्ध आगळी
खुलवित जाई कळी-पाकळी
फुले उमलती गोजिरवाणी


'रोज रोज डाली-डाली क्या लिख जाये भंवरा बावरा' या गुलजार गीतासाठी ही कविता.

बावरा..............

आशापक्षी

[एमिली डिकिन्सन या सुप्रसिद्ध इंग्लिश कवयित्रीच्या Hope is the thing with feathers या कवितेच्या स्वैर भावानुवादाचा प्रयत्न]

आत्म्याच्या हिंदोळ्यावरती 
आशापक्षी घेत विसावा 
शब्दांवाचुन सूर छेडितो
घुमवित जातो अखंड पावा 

झुळुकीमधुनी सुरस मधुर स्वर,
वादळात घायाळ जरासे 
ओशाळे करिती जे त्याला
जरि तो भारी जन उल्हासे

गारठल्या भूमीवर गातो,
नवख्या दर्यावर गुणगुणतो
कठिण काळ किति आला तरिही
अपेक्षेविना मला रिझवितो

मूळ रचनाकार : एमिली डिकिन्सन
स्वैर भावानुवाद : क्रांति

आणि ही मूळ कविता

Hope is the thing with feathers
That perches in the soul
And sings the tune without words
And never stops at all

And sweetest in the Gale is heard
And sore must be the storm
That could abash the little Bird
That kept so many warm

I've heard it in the chillest land
And on the strangest sea
Yet never, in Extremity
It asked a crumb of me.

Emily Dickinson

Sunday, January 20, 2013

वृत्तपत्र

आज छापखान्यात काहिसे अघटित घडले 
वृत्तपत्र प्रतिबिंब आपले बघून रडले!

"रोज कुठे हत्या, चोरी अन् मारामारी 
त्याच भयंकर, क्रूर बातम्या अत्याचारी 
अपराधांच्या कैदेतच अस्तित्व जखडले!

येते जे माझ्या कानी, ते वदवत नाही 
भले-चांगले शोधू जाता गवसत नाही 
माणुसपण कुठल्या काळ्या दाराशी अडले?

चालत असते फसवाफसवी ही नित्याची 
धूसर झाली सत्वशील प्रतिमा सत्याची 
जनसेवा, जागृती, चेतना ध्येयच सडले!

अभद्रतेचा, भीषणतेचा कलंक भाळी
लेवुन दारोदारी पडतो रोज सकाळी 
अपशकुनी मी झालो, माझे रूप बिघडले

मीच गांजलो, कशी कुणा देईन प्रेरणा?
कुणी करे अन् भरते माझी पूर्ण यंत्रणा
थिजून गेली शाई, कागद काळे पडले!"

Thursday, January 17, 2013

बिनघोर

कंबरेपासनं काटकोनात वाकलेली  
ताठ मानेची काटकुळी बाई
रोज भल्या पहाटेला रस्त्यावरचा 
कागद-कपटा वेचत जाई

पाठीवरच्या पोत्यात वेचून भरते 
भंगार, प्लास्टिक, बाटल्या न् खिळे
खांद्यावरच्या मळकट झोळीत 
जपून ठेवते तुकडे शिळे

लिंबाइतका अंबाडा, तोंडाचं बोळकं
सत्तरीच्या वरची असेल ती नक्की 
तोंडानं फटकळ पण मनानं निर्मळ 
कामात चोख अन् हिशेबाला पक्की 

भंगारवाल्यानं कधी काटा मारताच 
चवताळून ती कचाकचा भांडते 
पुन्हा शांत होऊन रस्त्याकडेच्या 
चिंचेखाली आपला पसारा मांडते 

टपरीवरचा पेलाभर पाणीदार चहा,
मळकट झोळीतले शिळे-पाके तुकडे 
इतकंच पूर्णब्रह्म पोटात ढकलून 
निवांत पसरते विसरून झगडे 

घर-नवरा, लेकरं, सगे-सोयरे कुणी 
असेल का कुठं तिचं हक्काचं जग?
ती स्वस्थ झोपते न् तिच्या विचारात 
माझ्या जिवाची मात्र होते तगमग

हक्काचं घरदार, फिरायला गाड्या,
समृद्धीची रेलचेल, कष्ट मुळी नाही 
गाद्या-गिरद्या, गालिचांवर सुख मला खुपतं
तिच्यासारखी बिनघोर झोप कशी नाही? 

Wednesday, January 16, 2013

सवयी


[पुन्हा एका 'गुलजार' रचनेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न]

कसा सवयीचा श्वास असे
जगणे का इतिहास असे?
चाहुल ना देही काही
नेत्री बिंब न छायाही
सुन्नपणे पावले चालती
प्रवास हा की नदी वाहती?
कितीक वर्षे, कितीक शतके
जगत चाललो, जगत चाललो
विचित्र किति असती सवयी!

मूळ रचनाकार : गुलजार
स्वैर भावानुवाद : क्रांति

ही मूळ रचना

सांस लेना भी कैसी आदत है
जिये जाना भी क्या रवायत है
कोई आहट नहीं बदन में कहीं
कोई साया नहीं है आंखों में
पांव बेहिस हैं, चलते जाते हैं
इक सफर है जो बहता रहता है
कितने बरसों से, कितनी सदियोंसे
जिये जाते हैं, जिये जाते हैं
आदतें भी अजीब होती हैं!

गुलजार

Monday, January 14, 2013

दु:ख दे ना

जीव सौख्यात माझा रमेना 
औषधाला तरी दु:ख दे ना ! 

काळजाची व्यथा काय सांगू?
बोलवेना, मुके राहवेना 

सोडताही न येई मनाला,
आणि सांभाळणे सोसवेना 

वेदना, यातना, खेद, त्रागा 
कोण कोठून आले, कळेना !

दे पुन्हा एक खोटा दिलासा,
वेड काही जगाया हवे ना !

मी वसंतातले फूल आहे 
ग्रीष्म माझा तरी पालटेना 

विस्मृतीची पुरी हद्द झाली,
नाव माझे मला आठवेना !

जीवना, सोड रे नाद माझा,
गोत्र माझे तुझ्याशी जमेना ! 

Friday, January 4, 2013

अन्यथा

जीवना, भेट केव्हातरी
अंतरीच्या उमाळ्यापरी

आसवांच्या उधाणातही
पापण्यांच्या रित्या घागरी

भांडणावाचुनी व्हायची
भेट माझी-तुझी का खरी?

नाव मी भोवऱ्याला दिली
साद देती किनारे जरी

जीवघेणा कडाका इथे,
सांत्वनाच्या तिथे चादरी!

पाचवीलाच मी पूजिली
शब्द झेलायची चाकरी

अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!