Friday, July 31, 2009

निष्प्राण

निष्पर्ण मी, वैराण मी, निर्जीव मी, निष्प्राण मी
माझे मला ना उमगले अभिशाप की वरदान मी


मी सावल्यांची सावली, अस्तित्व मज नाही दुजे
आवेग माझा पोरका, आभाळही माझे खुजे
माझीच ओंजळ कोरडी, देऊ कशाचे दान मी ?


माझ्याचसाठी उघडली दारे सुखाची नियतीने
माझ्याच पायी घातली बेडी भयाची नियतीने
त्या शृंखलांनी बांधले, पेलू कसे आव्हान मी ?

का वंचना आलोचनांनी विश्व माझे घेरले ?
का रिक्त एकाकीपणाचे बीज दारी पेरले ?
शोधू कुठे मी आसरा ? मागू कुणा वरदान मी ?

प्रारब्ध

मालवत्या ज्योतीला मी पुन्हा उजळले नाही
कधी मंदावले दीप मलाही कळले नाही

ता-यांनी फुलांना दिले, फुलांतून ओघळले
पापण्यांनी साठवले, मोती उधळले नाही

किती वैशाख पेटले, किती सोशिली काहिली
काळजात गोठलेले दु:ख वितळले नाही

ओठांवर नाही आले हुंकार मुक्या कळीचे
मनी दाटलेले भाव सुरांना कळले नाही

दैवदत्त दान भोगण्यात सारा जन्म गेला,
भाळावर गोंदलेले प्रारब्ध टळले नाही

विठू

पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

संतसंगती सदा घडो
अता कुठे ते दिवस विठू ?

नित्य तुझा सहवास हवा,
तुलाच करते नवस विठू


तुझ्या दयेचे अमृत दे
जळते माझी तुळस विठू


घराकडे जा, नको करू
रखुमाईचा विरस विठू

Tuesday, July 21, 2009

वाट स्वप्नांची

सांग का होते असे रे?
वाट स्वप्नांची दिसे रे

थेंब झेलुनि चिंब ओले
पाखरू धुंदीत डोले
कूजनी गंधार बोले
गीत ते लावी पिसे रे

सांडते आभाळ खाली
गंधवारा साद घाली
की तुझी चाहूल आली ?
बावरे मन का फसे रे ?


पावसाचा धीट दंगा
दामिनी खेळीत पिंगा
छेडिते मनिच्या अनंगा
मी मला रोखू कसे रे ?

नवे ऋतू

जेव्हा नव्या ऋतूंनी बोलावले मला
माझ्याच सावल्यांनी वेडावले मला

जेव्हा दिल्या फुलांनी जखमा अजाणता,
हलकेच वेदनांनी जोजावले मला

घरट्यात ऊब, दाणा चोचीत घातला
फुटताच पंख त्यांनी धुडकावले मला

मी का, कसे, कधी अन् कोठून जायचे
ते मार्ग प्राक्तनाने समजावले मला

आताच वादळांशीं झुंजून थांबले
वा-यावरी पुन्हा का भिरकावले मला ?

कित्येकदा सुखाच्या मागून धावले
प्रत्येकदा सुखाने हुलकावले मला

मी संभ्रमात अजुनी शोधीत उत्तरे
आयुष्य हे कसे अन् का भावले मला?

Wednesday, July 15, 2009

भूमिका

पाठ वा-याने फिरविली ती दिशा माझीच होती
मूक, हळवी दीन, शापित नायिका माझीच होती

दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी,
राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती

एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही,
चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती

भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे ?
वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती

संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या
जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती

काळजाला विंधणा-या आप्तस्वकियांच्या विषारी
बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती

ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती

राख झाल्या भावना फासून पिंगा घालणा-या
सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती

मला

बांध बंधनात मला
ऐक स्पंदनात मला

जडवुन घे मानसिच्या
रत्नकोंदणात मला

वेढतात सूर तुझे
मालकौंस गात मला

दे दंवात भिजलेली
रिमझिमती रात मला

जग फसवे, हे चकवे
छळती दिनरात मला

प्रीत लपेटून तुझी
ठेव काळजात मला

भिजुन चिंब होऊ दे
रंगपावसात मला

कुंचले नको नुसते,
दे तुझेच हात मला

Sunday, July 5, 2009

अलिप्त

का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही?
परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ?

दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?

पातकी, पतित, पथभ्रष्ट, पापाची मूर्ति जरी मी ,
कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ?

रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे
एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ?

का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

दान

मी दिवस मोजते सरते
पण जगणे मात्र विसरते

तू इतरांसाठी झटसी,
मी माझ्यापुरती उरते

कितिही तू दिले तरीही
ते मला कसे ना पुरते ?

जे मला न मागुन मिळते
तितक्याने मन ना भरते

का हाव ? कशी अतृप्ती ?
मिळुनही सर्व मी झुरते

तू देउन विसरून जाशी,
मी घेउन दान विसरते

कसे झाले

मी तुला फुले दिलेली, त्यांचे काटे कसे झाले ?
माझ्या भाबड्या शब्दांचे शस्त्रसाठे कसे झाले ?

थोडी तुझी, थोडी तुझ्या घराची, थोडी पिलांची,
एका माझ्या अस्तित्वाचे लाख वाटे कसे झाले ?

माझ्या-तुझ्या मुक्कामाचा काल एक मार्ग होता,
चालता चालता त्याचे दोन फाटे कसे झाले ?

केव्हा लुटली वा-याने वेड्या मनाची तिजोरी ?
चोहिकडे गुपितांचे हे बोभाटे कसे झाले ?

जीव ओतून केली मी विदुषकाची भूमिका
आयुष्याचे हसे झाले, कुणा वाटे कसे झाले ?