Thursday, May 31, 2012

कारण

पत्रास कारण की तुझ्या पत्रास नाही मायना 
आहे कुणासाठी, कसे मी ओळखावे सांग ना ! 

पत्रास कारण की तुझ्या पत्रात मी आहे कुठे?
स्वगतात बोलावे तसे संवाद सगळे एकटे !

पत्रास कारण की तुझ्या पत्रात भाषा कोरडी 
भावूक, हळवी, आतली शिकशील का बाराखडी? 

पत्रास कारण की तुझे हे पत्र फसवा आरसा
प्रतिबिंब ना दिसते तुझे, नुसताच कागद नितळसा !

पत्रास कारण की जरी नक्षी फुलांची लाघवी,
तरि गंध प्रीतीचा तुझ्या नाही, मना जो मोहवी

पत्रास कारण की तुझी असुनी तुझी नाहीच मी
तू तोच की परका कुणी? आहे तशी अन् तीच मी !

पत्रास कारण की किती नुसत्याच तक्रारी करू?
पत्रात शोधू मी तुला की स्वप्नलोकी वावरू?

पत्रास कारण की तसे पत्रास कारण का हवे?
तू कारणावाचूनही पत्रात भेटाया हवे ! 

Monday, May 28, 2012

तो वसंत मोहरलेला


निमिषाचे अंतर होते,
बहराचा गंधित वारा
आला अन् परतुन गेला
चुकलेच जरासे माझे,
मी गंध दिला बकुळीला
अन् श्वास मोकळा केला !

प्राजक्त बहरला तेव्हा
मी सुकले पानोपानी
माळून उन्हाचा शेला
ग्रीष्मात मात्र फुलले मी
गुलमोहर ल्याले देही
वैशाखझळा प्यालेला

तो मात्र फुलांच्या गावी
बहराची अलखतुतारी
घुमवीत प्रकट झालेला
साधून सुरांची किमया
फुलतो अन् फुलवित जातो
रस-रूप-सुगंध तजेला

तो फुलतो अन् मी सुकते
हे प्राक्तन त्याचे-माझे
आकांत किती जरि केला,
निष्पर्ण ऋतूंच्या काळी
रुजलेला अंकुर मी अन्
तो वसंत मोहरलेला 

Wednesday, May 23, 2012

मनासारखे झाले


मनासारखे झाले जे जे, तेवढेच मी जपले
घडले काही मनावेगळे, ते काळाने टिपले 
 
मनासारखे घडावेच ही जन्माची अभिलाषा
कुठे जराशी ठेच लागता सलते घोर निराशा
आशा येते, लेप लावते, बघते दुखले-खुपले

करायचे ते कर्म करावे, मिळायचे फळ मिळते
विश्वासाने प्रयत्न करता दैव अकल्पित फळते
जे घडते ते भले-चांगले, मंत्र मनी हे जपले

अमोल मानवजन्म मिळाला, सार्थ कराया झटले
मुक्तपणाने मनासारखे व्यक्त व्हायला शिकले
परमेशाची कृपा अलौकिक, त्या तेजाने दिपले

Friday, May 18, 2012

काउंट डाऊन



हातात मोजकी हलकी पानं हुकुमाची
आणि तरीही जिंकलेला प्रत्येक डाव
अक्कलहुशारीनं, जिद्दीनं, सचोटीनं
येईल त्या स्थितीचा स्थितप्रज्ञपणे सामना करत
धोरणीपणानं यशस्वी करून दाखवलेला खेळ

आज सगळं काही अनुकूल
हुकुमाच्या एक्क्यापासून गुलामापर्यंत
सगळा दरबार अदबीनं कुर्निसात करत
प्रतिस्पर्ध्याला खिजवत पुढे थांबलेला
पण तरीही हल्ली तिचा एकही डाव रंगत नाही
ती चुकूनसुद्धा जिंकत नाही.

काय बदललं आहे नक्की?
खेळ, वेळ, ती की तिची नियती?
की कधीकाळी तिने जिंकलेले डाव
उलटले आहेत तिच्यावर?
की कुणी जाणलंय तिचं जिंकायचं रहस्य?
की  काउंट डाऊन सुरु झालंय?


Tuesday, May 15, 2012

पुन्हा


पान पान चालले गळून पुन्हा 
तोच ग्रीष्म आणि तेच ऊन पुन्हा 

छेड तोच चंद्रकौंस नादखुळा
त्या सुरांत जायचे विरून पुन्हा

हे नसे अखेरचे तुझे घरटे
जायचे नव्या घरी इथून पुन्हा

कालची नसेन मी, असेन नवी
भेटशील वेड पांघरून पुन्हा

भग्न, छिन्न चित्त, मात्र ताठ उभा
देह कैक वार कोसळून पुन्हा

वेदने, निवांत हो, मजेत रहा
सौख्य चालले पहा दुरून पुन्हा

Saturday, May 12, 2012

सांगता

व्याकूळ होणे स्वभावात नाही, अशांना व्यथा आठवाव्यात का?
आनंदरागावलीच्या स्वरांनी विराण्या उगा आळवाव्यात का?
झाकोळलेल्या जरी पायवाटा, कुणी चालणे सांग सोडेल का?
नाते फुलांचे गळा फास झाले तरी दैव ते बंध मोडेल का?

तू लाखदा माग, साऱ्या अपेक्षा कधी पूर्ण होतात का या जगी?
जाणूनही वेड का पांघरावे, निराशेत गुंतून जावे उगी?
धारेत झोकून द्यावे मनाला प्रवाहातल्या ओंडक्यासारखे 
वाहील तेथे खुशालीत राहो, नको दु:ख त्याचे खुळ्यासारखे

लाभेल केव्हा किनारा, कशाला तुला व्यर्थ चिंता, बुडे वा तरे
वाळूत बांधून झाली कितीदा, पुन्हा लाट वाहून नेई घरे 
आकांत वेड्यापिशा भावनांचा विरू दे, झरू दे जरा शांतता 
तेव्हाच यात्रा पुरी व्हायची, या प्रवासास ना तोवरी सांगता

Tuesday, May 8, 2012

चंद्रा

गुलजारजींच्या कवितेपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. तरीही तिचा स्वैर भावानुवाद करण्याचा एक तोकडा प्रयत्न 

सोनपिवळ्या पानांचा पुन्हा झरतो पाऊस 
तुझ्या स्मृतींच्या छायेत एक सरता दिवस 
झुळझुळ हवेची की तुझे गीत, तुझी धून?
आणि मेघ एक वेदनेचा सांजछायेतून

मन आज पुन्हा चिंब प्रीततुषार झेलून
वितळत झरणाऱ्या नभस्पर्शाने फुलून
अनावर सागरात जेव्हा लाटा उसळल्या
सरलेल्या चांदण्यांच्या राती मनी उफाळल्या

चंद्रा, तूही आज का उदास माझ्यासारखा रे?
एकटा तू माझ्यापरी, भोवताली लाख तारे
सांग तुझ्या चांदण्यात आज का दु:खाची ओल?
आसवांच्या सागरात तुझ्या उतरता खोल

वाटे संपेल प्रतीक्षा की मी अशीच झुरेन
की या प्रेमाच्या वाटेत मीही एकाकी फिरेन?
चंद्रा, असेल का माझा तुझ्यासारखा प्रवास?
रात्रंदिन एकट्याची वाटचाल ती उदास!


आणि ही मूळ कविता

आज फिर शाख से सुनहरे पत्तों को
ज़मीं पर बरसते देखा
फिर तेरी याद के साये में
एक दिन को गुज़रते देखा
हवाओं की सरसराहट में सुनी फिर
तेरे गीतों की धुन

और फिर शाम के गहराते सायों में
गम की एक बद्ली सी उठी
आज फिर तेरे प्यार की तुषार से
भीगा मेरा मन्

पिघलते आसमा के स्पर्श से
मचल उठ्ठी जब सागर की लहरें
कुछ मेरे दिल में भी बीती हुई
रुपहली रंगीं रातों का तूफान उठा

फ़िज़ाओं में ऐ चाँद
तू क्यूँ है आज इतना गमगीन
सितारों की इस भीड़ में
क्या तू भी है मेरी तरह तनहा
क्यूँ आज तेरी चांदनी में
गम की नमी सी है
आज फिर यूँही नहाकर
तेरे अश्कों के समन्दर में
सोचती हूँ कि होगा क्या ये इन्तेज़ार ख़त्म
या फिर ऐ चाँद तेरी ही तरह
मुझको भी इक तन्हा मुसाफिर बनके
प्यार की राहों में युहीं दिन रात
भटकना होगा

- गुलजार .

Monday, May 7, 2012

कुणासाठी?

माय म्हणायची, 'सकाळी उठलं की त्याच्या पायी लागावं'
तो दिसायचाच नाही, पण मायसाठी
कुजल्या लाकडी देव्हाऱ्यापुढं वाकायचं.
त्यात भरलेले दगड, पत्र्याचे तुकडे, 
झिजलेल्या पितळी मूर्ती, सुकले नारळ,
जुन्यापुराण्या फाटक्या पोथ्या, कुबट वास ......
एकदाच विचारलं होतं 'हे दगड का ठेवले?'
आणि उत्तराऐवजी पोटभर मार खाल्ला होता 
उपाशीपोटी........

रात्री झोपताना आजी सांगायची 
त्याच्या चमत्कारांच्या नवनवीन गोष्टी 
'त्यानं याला वाचवलं, त्याला घडवलं'
मग पटत नसलं तरी आजीसाठी 
म्हणायची त्याची स्तोत्रं, करायच्या प्रार्थना 
मिटल्या डोळ्यांनी. 
म्हणायच्या आरत्या टिपेच्या स्वरांत
बाबाच्या आवाजाला जोर यावा म्हणून.

बाबा तर देवाचाच होता 
गावातल्या मोठ्या मंदिराचा फाटका पुजारी, 
देवाचा सेवक, रखवालदार
दारिद्र्य मिरवणारा देवाच्या राज्याचा अनभिषिक्त सम्राट.......
देवळाच्या कोपऱ्यातल्या टीचभर खोलीत 
देवानं जेवढं दिलं त्यावर कसाबसा चालणारा संसार,
तोही मायचाच. 
बाबानं तर केव्हाच देवाला अर्पण केलेला! 
बाबा देवाचं करतो, म्हणून यानंही करावं,
केवळ बाबासाठी. 

अन् एक दिवस देवाचे दागिने चोरल्याचं 
बाबावर आलेलं किटाळ,
त्याचा भेदरलेला, भकास तरी निष्पाप चेहरा,
हाय खाऊन जागेवरच लाकूड झालेली आजी,
झडतीच्या निमित्तानं देवळाच्या अंगणात
विस्कटून, उधळून पडलेला 
गाडग्या-मडक्याचा संसार,
याचे-त्याचे पाय धरत विनवण्या करणारी अगतिक माय 
आणि सगळं वादळ उघड्या डोळ्यांनी बघणारा 
गाभाऱ्यातला निर्ढावलेला तो! 
दगड, हो दगडच फक्त.

चला, सुटला एकदाचा! 
तुरुंगात खितपत पडून बाबा गेला,
धसक्यानं अन् उपासमारीनं मायला नेलं
आजी तर कधीच संपलेली.
आता कुणासाठी मानायचं त्याला? 

बाकी

निर्माल्य होता जाणले, फुलणेच बाकी राहिले 
नुसता पसारा मांडला, जगणेच बाकी राहिले

माझे-तुझे केले किती याची नसे काही क्षिती
कोशात गुरफटले जसे सुरवंट, ती झाली स्थिती
उघडून डोळे विश्व हे बघणेच बाकी राहिले

केला स्वत:चा भावही, जपली सुखाची हावही
अन् पूर्ततेसाठीच केली अथक धावाधावही
आभाळ होते मोकळे, उडणेच बाकी राहिले

उसळायचे नव्हते जरी भरतीतल्या लाटेपरी
वाळूतले घर मोडले, अन् शिंपले रुतले उरी
हरवून गेलेल्या खुणा स्मरणेच बाकी राहिले

राहील खंतच नेहमी, काही जरी नाही कमी
आहे समाधानात मी याची कुणी द्यावी हमी?
ओसाड बेटासारखे झुरणेच बाकी राहिले

काही न आशा राहिली, मग साद मी त्याला दिली
डोळ्यांत आणुन प्राण जेव्हा वाट त्याची पाहिली,
तो बोलला, 'नेऊ कसे? जगणेच बाकी राहिले!'

पैल

अडे सूर्याचे पाऊल
सांज थोडी घुटमळे
परतीच्या वाटेवर 
हलकीशी मागे वळे

केशराला गालबोट 
तसे झाकोळून येते 
अशा कातरवेळेला 
जिणे अंगावर येते

सुन्न मनाचे अंगण
नाही क्षणभर रिते
कोन्याकोन्यात तेवती
आठवणींचे पलिते

फूल निर्माल्य होताना
देठ काळजात रुते
जुनी जखम नव्याने
तशी उमलून येते

नको नको वाटे आता
संग घराचा, दाराचा
किती धरणार लोभ
खचणाऱ्या आधाराचा?

वाटे बोलावते कुणी
पार क्षितिजापल्याड
उघडून अज्ञातात
नव्या घराचे कवाड

रात पसरण्याआधी
मला निघायला हवे
काळोखता पापण्यांत
कोण लावणार दिवे?

जरी एकाकी प्रवास,
तरी एकटी मी नाही
थोडे इथेच ठेवते,
सवे नेते खूप काही

श्वास संपता संपता
ऐल सोडण्याच्या क्षणी
पैल प्रवासात माझ्या
सोबतीला आठवणी 

मावळायचे.....

जरा पुढे वळायचे, 
वळून मावळायचे 

तुला उजेड द्यायला 
मलाच ना जळायचे? 

पहा, भिजेल पापणी 
जपून ओघळायचे!

तुझ्यात काय गोडवा,
तुला कसे कळायचे?

परस्परांत गुंतलो,
कुणी कुणा छळायचे?

जिथे-तिथे तुझ्या खुणा,
किती, कुठे पळायचे?

जिथून वेचशील तू,
तिथे मला गळायचे! 

वारूळ

जरी पायांतली मी धूळ झाले,
तरी साऱ्या व्यथांचे मूळ झाले! 

शहाणी संगती होती तरीही 
पुरे आयुष्य माझे खूळ झाले 

गळ्याचा फास झाले शब्द केव्हा,
कधी संवेदनांचे सूळ झाले 

करावी याचना, अन श्वास घ्यावा
जिणे का एवढे व्याकूळ झाले ?

घराची तीच रूपे, भिन्न व्याख्या
कुठे कारा, कुठे राऊळ झाले

कुणी वेळीच नाही ठेचल्या त्या,
चुकांचे केवढे वारूळ झाले!

अनेकदा

जसे दिसे ते तसेच नसते अनेकदा 
कळूनही मी बळेच फसते अनेकदा 

कधी कधी काळजात खुपतात चांदण्या 
मुकी कळीही फुलून डसते अनेकदा 

मला हव्या त्या सुरांत नसले तरी कसे 
तुझेच गाणे मनात वसते अनेकदा?

बरे नव्हे हे अखंड कवितेत गुंतणे
मनात येती विचार नसते अनेकदा

हवेहवेसे कधी न सहजी मिळायचे,
नको नको ते कसे गवसते अनेकदा?

न मानणे हा गुन्हाच ठरतो खरोखरी
तुझी विनंती हुकूम असते अनेकदा