Monday, March 30, 2009

अव्यक्त

ठेच तुझ्या पावलाला, कळ माझ्या काळजात
काटा तुला बोचताना सल का माझ्या मनात ?

एका अव्यक्त नात्याने बांधलेले दोन जीव
भाव तुझ्या मनातला बोले माझ्या वचनात

मला घायाळ करते तुझ्या व्यथेची जाणीव
माझ्या वेदनेची जाण तुझ्या येते का मनात ?

माझ्या भाबड्या मनाला कसे आवरू कळेना
लागे छंद तुझा त्याला, रमे तुझ्या चिंतनात

जिथे क्षितिजही नाही असे दोघांत अन्तर
तुझा उजळ गाभारा, माझे विश्व अंधारात

पाचोळा

सरे वसंत सुखाचा, लागे ग्रीष्माची चाहूल,
वा-यावर भिरभिरे जीर्ण पानांचा पाचोळा

जळे वैशाख वणवा, माथी तळपते ऊन
भुईवर पायातळी घाली रांगोळ्या पाचोळा

वा-यासंगे उडताना कुठे होता कुठे आला?
भोग पिकल्या पानांचे असा भोगतो पाचोळा

तुझ्या माथ्यावर राहो माझ्या मायेची सावली
तुझ्या पावलांशी राहो माझ्या मनाचा पाचोळा

असे काय उरणार माझ्यामागे तुझ्यासाठी?
चार शब्दांचे निर्माल्य, आणि स्वप्नांचा पाचोळा!

Sunday, March 29, 2009

मीरा

पुन्हा जन्मेन की नाही, कधी हे जाणले नाही
परी जन्मात या तुजवीण कोणा मानले नाही

तुझ्या ध्यासात मी जगले, तुझ्या नामासवे रमले
तुझ्या चरणामृताचे भाग्य का मज लाभले नाही?

तुझे करपाश ना भवती, तुझ्या अधरी न मी वसले
तुझ्या वेणूपरी तुझिया सवे मी जागले नाही

तुझ्या त्या रंगलेल्या रासलीला पाहिल्या स्वप्नी,
कधी सत्यात राधेचे जिणे मज साधले नाही

विषाचे घोट मी गिळले मुक्याने, साहिली निंदा
असे उरलेच नाही दु:ख जे मी भोगले नाही

कधी नव्हते कुणाची मी, तुझी होते, तुझी आहे
मनाला मर्त्य जगताच्या रुढींनी बांधले नाही

खुळी कोणी म्हणो की बावरी, मी उन्मनी मीरा,
मनोमन जाणते हे स्वप्नवैभव आपले नाही

माझी कविता

भाव तुझ्या मनातले जाणते माझी कविता
शब्द तुझ्या डोळ्यातले वाचते माझी कविता

कधी अज्ञाताच्या अंधारात हरवून जाते
कधी माझ्या अंगणाची वाट विसरून जाते
तुझ्यामुळे मला पुन्हा भेटते माझी कविता

तुझ्या विश्वासाने मिळे आधार या जीवनाला
तुझ्या चिंतनाने आला आकार या जीवनाला
तुझी भक्ती हेच सत्य मानते माझी कविता

न मागता मिळे सारे, आता तुला काय मागू?
अंतरंग जाणसी तू, नव्याने मी काय सांगू?
मला तुझे मूर्त रूप भासते माझी कविता

शब्द माझे, भाव माझे गुंफलेले तुझ्यासाठी
कल्पनाविश्वात मन गुंतलेले तुझ्यासाठी
आता तुझ्यातच मला पाहते माझी कविता

दैवयोग

संचिताची ठेव ही प्राक्तनाचे भोग?
जन्माचे ऋणानुबंध जन्माचा वियोग

मनाचे हे खेळ किती अगम्य, अबोध
अशाश्वत आयुष्यात शाश्वताचा शोध

अनाकलनीय, गूढ़ दैवाचे हे बोल
जसा घुमे घंटानाद गाभा-यात खोल

असे बंध, अशी नाती ज्यांना नाही तोड
ज्याची त्यालाच कळते अंतरीची ओढ़

तनु इथे प्राण तिथे कसा हा संयोग?
हेच नियतीचे दान, हाच दैवयोग!

मौन तुझे

बोल एकदा काहितरी रे
मौन तुझे घायाळ करी रे

कातर हळवी सांज छेडते
तरल विराणी दर्दभरी रे

श्रावणात ही तळमळते मी
झेलुनिया अलवार सरी रे

जाणवते ती तुझी असोशी
इथे दाटतो श्वास उरी रे

देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे

अंतरण्याने अंतर वाढे
मिटव दुरावा हा जहरी रे

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वर लहरी रे

ओळख

कोमेजल्या वेलीला या चैत्रपालवी फुटावी
विधात्याने मुक्त हस्ते सारी दौलत लुटावी

आज मनातल्या दाट काळोखाचा अंत व्हावा
उजळून जावे विश्व अशी पुनव भेटावी

वाट चालता चालता एकटेच दूर जावे
आस संसाराची, साथ जीवनाचिही सुटावी

सारे काही विसरावे, मागे वळून पाहता
आपलीच सावलीही आज परकी वाटावी

लोभ, मोह, माया, क्रोध, अहंकार ही गळावा
मुक्त व्हावा जीव आता, सारी बंधने तुटावी

असे आत्ममग्न होता अस्तित्वही विसरून
माझी मलाच नव्याने पुन्हा ओळख पटावी

आत्मा परमात्मा आता असे व्हावे एकरूप,
त्याचे चरण धरावे आणि लोचने मिटावी