Wednesday, July 24, 2013

ओजस दान

रेशिमधारा झुळझुळती 
की स्फटिकमण्यांचे ओघळ झरझर पाणी?
पाण्यावर थेंब थिरकती 
घुमतात दिशागर्भात ऋतूची गाणी 

पाचूची लखलख पाने 
मिरवती हिरकण्या की पाऱ्याची नक्षी?
नक्षीचे पंख भिजवुनी
पाऊस पांघरुन थेंब उधळती पक्षी 

अभ्रांतुन रत्नतुषार 
ऋतु सळसळता उल्हास पेरतो चित्ती 
चित्ती उन्मेषतरंग 
यमनात लख्ख गंधार, उजळती वृत्ती

रंध्रांरंध्रांतुन गंध 
तृप्तीने गहिऱ्या दरवळणारी माती
मातीची फुलते काया 
सृजनाचे ओजस दान लाभता हाती 

Saturday, July 13, 2013

भरारी

संकल्प मोडवेना अन् ध्यास सोसवेना 
हल्ली मलाच माझा सहवास सोसवेना 

फांदीस होत ओझे, देठास भार वाटे
वाऱ्यासही कळ्यांचा निश्वास सोसवेना

झटक्यात जायचा तो थांबून जीव राही
अस्वस्थ भावनांचा गळफास सोसवेना

जाणीव शब्दवर्खी अन् शब्द मर्मस्पर्शी
माझीच मांडलेली आरास सोसवेना

वेड्या वसंतकाळी ग्रीष्मात गुंतले मी
आता अखंड झरता मधुमास सोसवेना

वाटे असेल काही अस्तित्व सावलीला
कोठे, कसे, किती हा अदमास सोसवेना

कापून पंख केला उन्माद जायबंदी
स्वप्नातली भरारी सत्यास सोसवेना

मर्म

निद्रिस्त होत्या मुक्या जाणिवा तेवढा काळ होता सुखाचा जरा 
निर्भेळ, निर्लेप, निष्पाप आनंद देई प्रवाही, कुठे तो झरा?
जागा जसा होय ज्वालामुखी, जागली का जिगीषा तशी या मनी? 
आवेग ओसंडणारा नवे जाणण्याचा गळा फास झाला खरा!

आनंद घ्यावा तसा तो लुटावा अशी फक्त होती मनोकामना
उत्साह, उल्हास, उत्कर्ष, उन्मेष यांचीच भक्ती तशी साधना 
वाटे करावी, पुजावे गुणांना उगाळून ही चंदनाची कुडी 
येथे परंतू भल्याच्याच भाळी कुठारी रुताव्या, तशा यातना

होणे हतोत्साह आहे चुकीचे, मनाला कळूनी वळावे कसे?
वाळून गेली जळू देत पाने, नव्या पालवीने जळावे कसे?
आरंभ झालाच नाही जिचा ती कहाणी असावी, तसा जन्म हा 
अंतास येऊन संदिग्ध आहे, खरे मर्म त्याचे कळावे कसे?

आसक्त व्हावे असा ध्यास नाही, निरासक्त होणे नको वाटते 
दाही दिशांतून येतात हाका, तरी मुक्त होणे नको वाटते 
का मांडला खेळ लावून आयुष्य सारे पणाला, कुणी जाणले?
आता तरी आवरावा पसारा, इथे व्यक्त होणे नको वाटते

'जाणून घे आत्मक्लेशातली फोलता आत्मघाताहुनी पातकी 

अस्तित्व आहे तुझे फक्त ओझे अशी भावना सार्थका घातकी 
ही हीनता कालसापेक्ष व्हावी, नसावी सदा-सर्वदा सोबती 
झाकोळलेल्या दिशाही धुके पिंजता पांगता स्वच्छ होतात की!'

कष्टी मनाला असा धीर देता निमाली क्षणी संभ्रमी वादळे 
उद्विग्नता दूर झाली, पळाली निराशा नि आकाश हो मोकळे 
कर्तृत्व, कर्तव्य, धैर्यामुळे लाभते जीवनाला हवीशी गती,
आयुष्य नाही पटी मांडल्या आंधळ्या सोंगट्यांचा पसारा, कळे


[वृत्त - मंदारमाला]

Sunday, July 7, 2013

पाहुणा

देही-चित्ती जपुन विरत्या वेदनेच्या खुणा मी 
दु:खालाही जवळ करुनी भार केला दुणा मी
जेथे माथा झुकवु म्हटले, तेथ पाषाण होते 
ज्यांच्यासाठी करुन थकले जन्म माझा उणा मी

होते भोळी, समज नव्हती चांगल्या-वाइटाची 
दोषालाही उगिच जपले, शोधताना गुणा मी 
केले ते ते विफल सगळे, वंचना फक्त माझी 
सांगू माझ्या अदय हृदया शल्य आता कुणा मी?

झाले वाटे विधिलिखित जे मान्य दैवास होते 
मुक्तीसाठी बघ चुकविले प्राक्तनाच्या ऋणा मी
'सौख्याने मी गमन करितो, संपले कार्य माझे'
आत्मा बोले, 'शरिर जळु द्या, येथला पाहुणा मी'


[वृत्त - मंदाक्रांता]

प्रार्थना

प्रभो मुक्तियात्रेस आरंभताना 
नसावा तडा मूर्तिला भंगताना 
इथे थांबला, गुंतला तो तरीही 
जिवाला नको बांध ओसंडताना

नसावी अपूर्णात काहीच इच्छा
सवे राहु दे सज्जनांच्या सदिच्छा
विराव्यात आशा, नुरावी अपेक्षा
उरावे समाधान, तृप्ती, निरिच्छा

उठावेत साही रिपूंचे पहारे
मिटावेत संवेदनांचे पिसारे
नको सोबती दोष, दुष्कृत्य, हेवा
मिळावेत सत्संगतीचे सहारे

उधारीत ना सौख्य ना दु:ख घ्यावे
इथे येथले सर्व सोडून जावे
मुठी झाकलेल्या जरी जन्मताना
मिती लांघताना खुले हात न्यावे

नको श्राद्ध-पिंडे, नको काकस्पर्श
नको राहिल्या-साहिल्याचा विमर्श
मनासारखा जन्म गेला, न गेला
मनासारखा प्राण जावो सहर्ष


[वृत्त - भुजंगप्रयात]

Saturday, July 6, 2013

दुवे

सदाचीच माझ्या जिवा ओढ त्याची 
सदाच्याच त्याच्या दिशा वेगळ्या 
परीघात मी, केंद्रबिंदू असे तो 
मिती सर्व त्याला सदा मोकळ्या

किनारे न त्याला कधी भावलेले
मला भोवर्‍यांनी न आकर्षिले
नव्या वादळांच्याच शोधात तो अन्
किनाऱ्यास आयुष्य मी अर्पिले

न होते कधी लख्ख सौदामिनी मी
मुकी ज्योत वृंदावनी तेवले
असे मेघ तो सांद्र ओथंबलेला
विजांच्या उरी रोवतो पाउले

मला भावले तेच त्याला नकोसे
मला मात्र त्याच्या 'नको'चे पिसे
कसाही असो भाव त्याचा तरी तो
हवासा मला हे न त्याला दिसे

कसे बांधले प्राक्तनाने निराळ्या
अशा दोन वेड्या जिवांचे दुवे ?
मला ओढ मातीतल्या अंकुराची
नि उन्मुक्त आकाश त्याला हवे !


[वृत्त - सुमंदारमाला]