Showing posts with label त्रिधारा. Show all posts
Showing posts with label त्रिधारा. Show all posts

Sunday, November 21, 2010

त्रिधारा - आठवणी

त्रिधारा - आठवणी

* आठवणींचे शंखशिंपले
बालपणीच्या नदीकिनारी
मोठेपण विसरून वेचले!

* थंडी मरणाची, गोठले आभाळ,
जात्या जिवासाठी आता हवी आई
तुझ्या आठवांची उबदार शाल!

* काचाकवड्या, सागरगोटे,
आठवणींचे खेळ रंगता
प्रौढत्वाला हेवा वाटे!

* आठवणींच्या पडद्याआडून
एक निरागस, लोभस चेहरा,
मलाच शोधतोय लपून-छपून!

* आठवणींचे किरण कोवळे
भल्या पहाटे जागविती अन्
आठवणींतच सांज मावळे!

Saturday, November 13, 2010

त्रिधारा - स्वप्न

* स्वप्न खुळे डोळ्यांतच थिजले
पापणीस ना नीज जराशी,
थकून भागुन स्वप्नच निजले!

* तुझे स्वप्न चंचल पार्‍याचे
क्षणात दिसते, क्षणात लपते
भिरभिरणारे घर वार्‍याचे

* स्वप्न पाहणे राहून गेले
काजळकाळे काठ भिजवुनी
आसवांसवे वाहून गेले!

* आतुर मनाला स्वप्नाची चाहूल
सांजेपासूनच डोकावे दारात,
कधी अंगणात वाजेल पाऊल?

* काचेचं स्वप्न, ते टोचेलच ना?
डोळ्यांतून पडलं, खळ्ळकन फुटलं,
काळजाला तुकडा बोचेलच ना?

Wednesday, November 10, 2010

त्रिधारा - शब्द

त्रिधारा हा माझा एक नवा प्रयत्न. तीन ओळींच्या कविता हा प्रकार तसा नवा नाही. गुलजारजींची त्रिवेणी आपण सारेच जाणता. जपानी हायकू हाही तीन ओळींच्या कवितेचा प्रकार.
माझ्या या तीन ओळींच्या धारा मिळून बनलेली त्रिधारा. प्रत्येक ओळीत दहा ते अकरा अक्षरे आहेत, बाकी मात्रा-वृत्त असं काही बंधन नाही. यमक पहिल्या आणि तिसर्‍या ओळीत.
या पाच त्रिधारा "शब्द" या एकाच विषयावरच्या आहेत.


* शब्द जसे गंधहीन वारा
उघडे अत्तर उडून जावे,
तसा उडाला अर्थच सारा!

* शब्दांच्या पलिकडले काही,
अर्थ जयाचा गहन, गूढसा
मौन एकटे बोलत राही!

* शब्द उमाळे, शब्द उसासे
बघता बघता विरून गेले,
उधार दे ना शब्द जरासे!

* तुझे शब्द की गाणे सुंदर?
की माझा अंधार उजळते,
लखलखते तेजस्वी झुंबर?

* भिरभिर शब्दांचा पाचोळा
वार्‍याने उधळला नभावर,
ओंजळीत मी केला गोळा!