Sunday, May 22, 2011

सोयरीक

तुला वेदनांचा छळ, तुला यातनांचा जाच
भोग मागल्या जन्मीचे म्हणतात ग यालाच!

आगीतून फुफाट्यात तुझा चालतो प्रवास
जानकीचा चौदा वर्षं, तुझा जन्म वनवास!

नशिबाच्या गुर्‍हाळात जीव सोसतो काहिली,
तुझं आयुष्य चिपाड, गोडी गुळाला राहिली

विरी गेलेल्या पिठाची भाकरी, तसा संसार,
किती आधण ओतलं, तरी कडा फाटणार!

तुला व्यथेचा शेजार, तुझा भोगांचा आजार
जिथंतिथं मांडू नये त्याचा दरिद्री बाजार!

जरी नाठाळ जखमा करतात जवळीक,
तरी भरल्या डोळ्यांना नाही घालायची भीक

तुझा असंगाशी संग, जरी प्राणांशीच गाठ,
तरी आल्या दिवसाला नको दाखवू ग पाठ

तुझा दु:खाशी घरोबा, दुर्दैवाशी जवळीक,
तोलामोलाच्याच घरी व्हायची ना सोयरीक?

Monday, May 16, 2011

नको विचारू


तुझ्याच वार्ता, तुझ्या कहाण्या सगळ्या कविता-गझला माझ्या
तुझी प्रीत गीतांत वर्णिली, द्विपदी तुझ्याच तक्रारींच्या!
तुलाच अर्पण करतो सारे तुझ्यात गुंतुन जगलेले क्षण
नव्या जीवनाच्या वाटेवर कधीतरी जे स्मरशिल तू पण
श्वासांच्या पांघरून शाली अक्षर-अक्षर जिवंत होइल
उदास एकांताच्या प्रहरी रास तयांचा रंगुन जाइल!

तुझीच नव्हती केवळ, माझी होती अन्यहि कितीक दु:खे
मला नि माझ्या आयुष्याला शोधत होती अनंत दु:खे
हेहि जाणतो दु:खच केवळ पदरामध्ये तुझ्या बांधले
स्पर्शाने पण तुझ्या त्यासही मेंदीचे रंग-गंध चढले
जखमांच्या फुलबागा झाल्या, तप्त उसासे श्रावण झाले!

तुझ्याच झाल्या अस्तित्वाच्या खुणा, फुले अन् जखमा आता
माझी होती, तुझीच झाली आनंदगाणी, विलापगाथा
तुझ्यासंगती, तुझ्याविना सरलेला काळहि तुझाच आता
विक्षिप्तच वागे तो खुळचट कवी, तुला गायचा, ध्यायचा
राजेशाही थाट दाखवत फकिराचे जीवन जगायचा
कमनशिबी, जगण्याच्या इच्छा तशाच दुर्दैवी, जपायचा!

नको विचारू, कधीचाच तो आयुष्यातुन उठला आहे
शीरीनचा फरहाद नव्हे, तरि पर्वतांसही भिडला आहे,
आपल्याच शस्त्राचा झेलुन वार उरावर, पडला आहे!


आणि ही मूळ रचना

ये मेरी गज़लें, ये मेरी नज़्में, तमाम तेरी हिकायतें हैं
ये तज़्कीरें तेरी लुत्फ़ के हैं, ये शेर तेरी शिकायतें हैं
मैं सब तेरी नज़र कर रहा हूँ, ये उन ज़मानों की सतें हैं
जो ज़िंदगी के नए सफ़र में तुझे किसी रोज़ याद आएँ
तो एक एक हर्फ़ जी उठेगा, पहन के अन्फ़ास की कबाएँ
उदास तनहाईयों के लम्हों में नाच उठेगी ये अप्सराएँ

मुझे तेरी दर्द के अलावा भी और दुख थे, ये जानता हूँ
हज़ार ग़म थे जो ज़िंदगी की तलाश में थे, ये जानता हूँ
मुझे खबर है की तेरे आँचल में दर्द की रेत छानता हूँ
मगर हर एक बार तुझको छू कर ये रेत रंग-ए-हीना बनी है
ये ज़ख्म गुलज़र बन गए हैं, ये आहें-सोज़ाँ घटा बनी है

और अब ये सारी मता-ए-हस्ती, ये फूल, ये ज़ख्म सब तेरे हैं
ये दुख के नौहे, ये सुख के नग्में, जो कल मेरे थे, अब तेरे हैं
जो तेरी कुरबत, तेरी जुदाई में कट गए रोज़-ओ-शब तेरे हैं
वो तेरा शायर, तेरा मुग़न्नी, वो जिस की बातें अजीब सी थी
वो जिस के अंदाज़ ख़ुसरो-वाना थे और अदाएँ गरीब सी थीं
वो जिसके जिने की ख़्वाहीशें भी खुद उसके अपने नसीब सी थीं


न पुछ उसका की वो दिवाना बहूत दिनों का उजड चुका है
वो कोहकन तो नहीं था, लेकीन कडी चट्टानों से लड चुका है
वो थक चुका है और उस का तेशा उसी के सीने में गड चुका है...


- अहमद फ़राज़

Saturday, May 14, 2011

तुझे भास होतेकधी चांदण्याला तुझी आस होती
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

निजेच्या क्षणी जोजवाया मनाला
तुझे शब्द होते, तुझे सूर होते
पहाटे जशी जाग आली, उशाला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

गळा हुंदका दाटता सावराया
तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते
जरा एकटे वाटता साथ द्याया
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्‍याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते